Wednesday, 24 November 2010

राजदीप, बरखा, वीर सिंघवी, प्रभू चावला: पंचमस्तंभी पत्रकार?

गोष्ट आहे १९३६ सालची. स्पॅनिश यादवी युद्धात फॅसिस्टांनी माद्रिदला, स्पेनच्या राजधानीला वेढा घातला आणि रेडिओवर घोषणा करण्यात आली की फॅसिस्टांच्या सैन्याच्या चार कॉलम्सनी शहराला वेढा घातला आहे आणि शहरातला पाचवा कॉलम त्यांच्या मदतीला येणार आहे. फिफ्थ कॉलम वा मराठीत पंचमस्तंभी हा शब्दप्रयोग तेव्हापासून रुढ झाला. लोकशाहीचा गळा घोटणार्‍या सैन्याला मदत करणारे फीतूर वा अस्तनीतले निखारे असा त्याचा अर्थ आहे.


टाटा आणि रिलायन्स या बड्या उद्योगसमूहांसाठी सरकार दरबारी म्हणजे अर्थातच दिल्लीत जनसंपर्काचं म्हणजे मांडवलीचं काम करणार्‍या नीरा राडिया या महिलेने विविध लोकांशी केलेल्या टेलिफोनवरील संभाषणं आयकर विभागाने ध्वनिमुद्रित केली. गेल्यावर्षी मे आणि जून महिन्यांच्या दरम्यान ध्वनिमुद्रित केलेल्या १०४ संभाषणांमध्ये पत्रकार बरखा दत्त, प्रभू चावला, वीर सिंघवी यांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ आकार घेत असताना, या तीन पत्रकारांनी काँग्रेस आणि द्रविड मुनेत्र कझघम या दोन राजकीय पक्षांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावली असा अर्थ या संभाषणांमधून लावता येतो. अर्थात या तिन्ही पत्रकारांनी या आरोपाचा इन्कार केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना ही सर्वात मोठी बातमी आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी अनेक सोर्सेशी बोलावं लागतं, माहिती काढून घ्यावी लागते. वेगवेगळ्या सोर्सेसशी बोलताना त्यांना विश्वास द्यावा लागतो, त्यामुळे संभाषणाच्या ओघात काही आश्वासनं दिली तरी ती निरर्थक असतात, अशा आशयाचा बचाव राजदीप सरदेसाईने केला आहे. “When there are fast moving Cabinet formation stories, you make every possible move to get the info out, those promises mean nothing …” Rajdeep Sardesai, IBN's editor-in-chief tweeted in response to the Open story: (http://www.thehindu.com/opinion/lead/article907823.ece?homepage=true)

बातमीदारीमध्ये सोर्सिंगला अतोनात महत्व असतं. बातमी मिळवण्यासाठी सोर्सेसेशी गोड बोलणं, त्यांना विश्वास वाटेल असं बोलावं लागतं हे मान्य. पण रिकामी आश्वासनंही द्यावी लागतात हा राजदीपचा दावा अजब आहे. म्हणजे सोर्सेसलाही हे ठावूक असतं की समोरचा पत्रकार जे काही आश्वासन देतो आहे ते निरर्थक आहे. अशा परिस्थितीत त्या पत्रकाराची विश्वासार्हता काय राह्यली. अशा पत्रकाराला कोणता सोर्स काय म्हणून आतली बातमी वा माहिती देईल. राजदीप, बरखा, वीर सिंघवी आणि प्रभू चावला इत्यादींनी बातमी मिळवण्याची वा सोर्स करण्याची आपआपल्या कंपनीची आचारसंहिता जाहीर करावी. म्हणजे त्यांचं वर्तन निदान त्यांच्या कंपनीच्या निकषांवर योग्य वा अयोग्य असल्याचं ठरवता येईल. राजदीप एका वृत्तवाहिनीचा नव्हे वृत्तवाहिन्यांच्या समूहाचा संपादक आहे तोच सांगतोय की बातमी मिळवण्यासाठी पत्रकारांनी सोर्सला कोणतीही आश्वासनं द्यावीत कारण ती पाळण्याचं बंधन पत्रकारांवर नाही. सीएनएन-आयबीन समूहाचं बातमीदारीचं म्हणजे बातमी मिळवण्याचं हे धोरण असावं.

उद्योगसमूहांसाठी जनसंपर्काचं काम करणारी एक व्यक्ती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या स्थापनेत मध्यस्थाची भूमिका निभावते आणि राष्ट्रीय पातळीवरील पत्रकार तिला साथ देतात आणि राष्ट्रीय पातळीवरील अन्य पत्रकार त्यांचं समर्थन करत आहेत. ओपन आणि आऊटलुक या दोन नियतकालिकांनी नीरा राडिया हिच्या संभाषणांचा तपशील प्रसिद्ध करेपर्यंत राष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमं या बातमीला प्रसिद्धी देत नव्हते. लोंढा प्रसारमाध्यमं (वृत्तपत्रं, रेडियो, टिव्ही, इत्यादी) उत्पन्नासाठी उद्योगांवर अवलंबून असतात. उद्योगांचे हितसंबंध म्हणजेच बाजारपेठेचे हितसंबंध दुखावले जाणार नाहीत हे ध्यानी घेऊनच त्यांना त्यांची पत्रकारिता करावी लागते. हे समजण्याजोगं आहे पण बाजारपेठेच्या हितसंबंधांसाठी राजकारणात मध्यस्थाची भूमिका निभावण्याची जबाबदारी पत्रकारांनी कशाला घ्यावी. तशी व्यवसायाची गरजही नसते. बाजारपेठ आज लोकशाहीचा गळा घोटू पहात आहे. तिच्या सैन्याचा फिफ्थ कॉलम म्हणजे लोंढा प्रसारमाध्यमं. विशेषतः टिव्ही पत्रकारिता आहे. राजदीप, बरखा, वीर सिंघवी वा प्रभू चावला यांना पंचमस्तंभी म्हणायचं का, हे आता ठरवायला हवं. प्रकरण आता कोर्टात आहे. म्हणजे संभाषणाच्या प्रती कोर्टात आहेत. त्यांच्या सत्यासत्यतेची पडताळणी होईपर्यंत थांबूया हवं तर. पण राजदीपचा बचाव पहाता तोवर थांबण्याचीही गरज नाही.

7 comments:

  1. Sunil all your articles are very informative and actually add knowledge. Topics are so interesting that many times I remember editorials of Talwalkar while reading your blog. Pls keep writing.

    ReplyDelete
  2. पाचव्या स्तंभाचा उद्गम आज पहिल्यांदाच कळाला, लेख सुरेखच आहे... विषयाची माहिती थोडीफार ट्वीटरवरून समजली होती, मात्र या लेखाने वेगवेगळे आयाम लक्षात आले

    ReplyDelete
  3. ही टीवी वाहिन्यांमधली स्पर्धा चांगल्या माणसांना ही कशी बिघडवते हे बघा.
    मंत्री मंडलातील नावे दुसर्‍या वाहिनी ला मिळण्या आधी आपल्या वाहिनी वर यावीत,
    या साठी केवढा हा आटापिटा ! काही सेकंद उशीर झाल्याने असे काय बिघडणार आहे?

    अनिल अवचट

    ReplyDelete
  4. दिव्यामागचा अंधार आणि बरखाचा खरा बुरखा आणि मध्यस्थांच्या प्रभू दर्शनाबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  5. Dear Sunilji

    Donhi lekh khup chan, nishchit ani spasht bhumika aslele. ashi bhumika alikade far kami patrakar ghetat. tumche abhinandan.
    pls tumcha email, cell no. kalava
    Gajanan Janbhor
    Lokmat, Akola
    09850304159
    gajananjanbhor@gmail.com

    ReplyDelete
  6. All of you should remember that Mr Rajdeep Sardesai was in controversy at the time of money for vote scam when left withdraw their support to the Manmohan Sing Govt whild BJP supported it two years back. Amar Sing was the key person of horse treading and Sardesai had used his camera during the course. Interestingly he had praised Amar's leadership in his Lokmat Column just a week before. Interested persons go for it.

    ReplyDelete
  7. मंत्रीमंडळातील संभाव्य नावांकरता बिझनेस लॉबिस्ट वा पीआरमधली व्यक्ती सोर्स हे जरा विचित्रच वाटते. महाराष्ट्रात इतके मंत्रीमंडळ विस्तार कव्हर करताना कधी कोणा लॉबीस्टशी किंवा पीआर कंपनीशी बोलल्याचे आठवत नाही. ठीक आहे, काळ बदलला आहे. आता राजकारणी विकले गेल्यावर लॉबीस्टच सर्व ठरवत असतील तर तेही ठीकच म्हणायचे. पण माहिती काढण्याकरता केलेल्या त्या बोलण्याची भाषा वेगळी हवी. एकमेकांकडची माहिती शेअर वा एक्सेंचज करणे समजू शकते. पण या संभाषणांमध्ये तसे दिसत नाही. इथे तर चक्क मध्यस्त म्हणून काम करून कोणाला तरी प्रमोट केल्याचे दिसते. हे केवळ माहिती मिळवण्याकरता केलेल सोर्स वार्ताहर संभाषण निश्चित नाही. केवळ अंतस्थ माहिती मिळते असे म्हणत कोणत्याही बदनाम माणसाशी उघड उघड संबंध ठेवण्याचा एक नवा फंडा पत्रकारीतेत आला आहे. अश्या माणसांचे कर्व फायदे घ्यायचे आणि माहिती मिळते म्हणून त्याला जवळ करत असल्याचा मुलामा द्यायचा असा हा एक नवा प्रकार आहे.
    डॉ. अवचट तुम्ही चुकाताहात. केवळ आधी माहिती देण्याच्या टीव्हीच्या स्पर्धेतून हे घडलेले नाही. ही केवळ रंगसफेदी आहे. यामागे आहेत ते आर्थिक संबंध. पैसै असणा-यांना अधिक पैसा हवा आहे. हेच जर कोणी तालुका पातळीवरच्या पत्रकाराने केले असते तर यांच्यापैकी कोणीही त्याचा बचाव करायला पुढे आले नसते. हे केवळ वीर संघवी, बरखा दत्त आहेत म्हणून हा बचाव सुरू आहे.

    ReplyDelete