Blog Archive

Sunday, 11 November 2012

काही कविता.....


१. स्थानबद्ध

निःस्तब्ध हिरवाशार एकांत
सूर्यास्ताची चाहूल लागलेलं
निळंभोर ओसाड आभाळ
शरीरात पाझरणारी थंडी

आसमंतात ना पक्षी, ना वारा
किर्र रानात निमूट बसलेल्या
टेकड्यांमध्ये पडलेल्या कच्च्या रस्त्यावर
स्थानबद्ध जीप

काही क्षणात अंधार होईल
जंगल, टेकड्या, रस्ता, जीप
सर्व काही दिसेनासं होईल
डोळ्यांच्या प्रकाशात
लखलखणारं आभाळ दिसू लागेल

फुप्फुसं शेकवत
मी प्रार्थना करतो
ड्रायव्हर कधीही परतू नये
जीप नादुरुस्तच राहो
क्षण अन् क्षण प्रसरण पावो

२. लोखंडी बारच्या 
खालच्या अंगाला 
थेंबांची माळ आहे 
पापणी लवली की 
एक थेंब धराशयी होतो
दुसरा त्याची जागा घेतो 
आभाळातून येणारी कुमक 
केव्हाचीच थांबली आहे
तरिही जमिनीकडे डोळे रोखून 
थेंबांची माळ उभी आहे 
निश्चल 
पाण्याच्या थारोळ्यात आभाळाचं 
प्रतिबिंब बघत एकटक

३. विमान

खंडाळा घाटातून
खोपोलीचे दिवे पाहताना
आकाशात असल्यासारखं वाटतं
विमान हवेत झेपावताना हे सुचतं

आपण श्वास रोधून धरलेला असतो
तिरपं विमान जमिनीला 
समांतर होईस्तोवर
घालमेल होते जिवाची

विमान ढगात शिरतं 

आणि अनाथ वाटतं

खिडकीबाहेर नसतो अवकाश वा काळ

आपण असतो एकसमान गतीत वा निश्चल

अ-मृत 

बेबस, बेसहारा, बेवारस


विमान ढगांच्याही वर जातं

खाली दिसतात

ढगांचे डोंगर, ढगांच्या दर्‍या

ढगांवर पडलेल्या ढगांच्या छाया

निर्जीव प्रदेशावर, कानाकोपर्‍यात

मायावी रंगांचे जादूचे स्फोट

आपण त्रिशंकू 


हळू हळू दिसू लागतात

डोंगर, दर्‍या, मैदानं, शेतं,

नदी, गावं

हायसं वाटतं. 

मग घर, रस्ते, 

इमारती



विमान जमिनीकडे झेपावल्यावर 

मी डोळे मिटून घेतो

काही क्षणातच मागची चाकं 

जमिनीवर टेकल्याचा धक्का बसतो

विमान धावपट्टीवर पळू लागताना

मी डोळे उघडतो

त्याचा वेग मंदावतो

पार्किंग बे कडे जाणारी 

विमानं दिसतात

भलेमोठे पंख फैलावून 

खुरडत चालणार्‍या गिधाडासारखी

खाली उतरल्यावर मान वर करून 

मी त्या धूडाकडे पहातो

उंच आभाळात ढगांच्याही पलीकडे 

ते तरंगत होतं ह्यावर विश्वास बसत नाही 

सरकत्या पट्ट्यावर 

समानाचे बोजे फिरू लागतात 

तेव्हा मला खुणावू लागतात

पंखवाल्या घोड्यांचं रुप घेतलेले

शापित राजकुमार

आणि उडते गालिचे


४. विषकन्या

बेशरमीची लांबरुंद पानं
पिंपळाची आठवण करून देणारी
हरितद्रव्याने काठोकाठ भरलेली
प्रकाशाच्या संश्लेषणाने बनवलेलं विष
शिरांमध्ये साठवणारी
मूळांपर्यंत पोहोचवणारी
पाणीदार भुसभुशीत मातीत 
मूळं रुतवतात त्यांच्या नख्या

बेशरमीला फुलंही येतात

धुतल्या तांदळामध्ये 

जांभळ्या विषाचे चार-दोन थेंब

मिसळलेल्या रंगाची

फुलपात्राच्या तोंडाची

औषधी गुणही असतात तिच्यामध्ये

तणांच्या शेतात 

राणी शोभेल बेशरमी


१. स्थानबद्ध

निःस्तब्ध हिरवाशार एकांत
सूर्यास्ताची चाहूल लागलेलं
निळंभोर ओसाड आभाळ
शरीरात पाझरणारी थंडी

आसमंतात ना पक्षी, ना वारा
किर्र रानात निमूट बसलेल्या
टेकड्यांमध्ये पडलेल्या कच्च्या रस्त्यावर
स्थानबद्ध जीप

काही क्षणात अंधार होईल
जंगल, टेकड्या, रस्ता, जीप
सर्व काही दिसेनासं होईल
डोळ्यांच्या प्रकाशात
लखलखणारं आभाळ दिसू लागेल

फुप्फुसं शेकवत
मी प्रार्थना करतो
ड्रायव्हर कधीही परतू नये
जीप नादुरुस्तच राहो
क्षण अन् क्षण प्रसरण पावो

२. लोखंडी बारच्या 
खालच्या अंगाला 
थेंबांची माळ आहे 
पापणी लवली की 
एक थेंब धराशयी होतो
दुसरा त्याची जागा घेतो 
आभाळातून येणारी कुमक 
केव्हाचीच थांबली आहे
तरिही जमिनीकडे डोळे रोखून 
थेंबांची माळ उभी आहे 
निश्चल 
पाण्याच्या थारोळ्यात आभाळाचं 
प्रतिबिंब बघत एकटक

३. विमान

खंडाळा घाटातून
खोपोलीचे दिवे पाहताना
आकाशात असल्यासारखं वाटतं
विमान हवेत झेपावताना हे सुचतं

आपण श्वास रोधून धरलेला असतो
तिरपं विमान जमिनीला 
समांतर होईस्तोवर
घालमेल होते जिवाची

विमान ढगात शिरतं 
आणि अनाथ वाटतं
खिडकीबाहेर नसतो अवकाश वा काळ
आपण असतो एकसमान गतीत वा निश्चल
अ-मृत 
बेबस, बेसहारा, बेवारस

विमान ढगांच्याही वर जातं
खाली दिसतात
ढगांचे डोंगर, ढगांच्या दर्‍या
ढगांवर पडलेल्या ढगांच्या छाया
निर्जीव प्रदेशावर, कानाकोपर्‍यात
मायावी रंगांचे जादूचे स्फोट
आपण त्रिशंकू 

हळू हळू दिसू लागतात
डोंगर, दर्‍या, मैदानं, शेतं,
नदी, गावं
हायसं वाटतं. 
मग घर, रस्ते, 
इमारती

विमान जमिनीकडे झेपावल्यावर 
मी डोळे मिटून घेतो

काही क्षणातच मागची चाकं 
जमिनीवर टेकल्याचा धक्का बसतो
विमान धावपट्टीवर पळू लागताना
मी डोळे उघडतो
त्याचा वेग मंदावतो
पार्किंग बे कडे जाणारी 
विमानं दिसतात
भलेमोठे पंख फैलावून 
खुरडत चालणार्‍या गिधाडासारखी

खाली उतरल्यावर मान वर करून 
मी त्या धूडाकडे पहातो
उंच आभाळात ढगांच्याही पलीकडे 
ते तरंगत होतं ह्यावर विश्वास बसत नाही 

सरकत्या पट्ट्यावर 
समानाचे बोजे फिरू लागतात 
तेव्हा मला खुणावू लागतात
पंखवाल्या घोड्यांचं रुप घेतलेले
शापित राजकुमार
आणि उडते गालिचे


४. विषकन्या

बेशरमीची लांबरुंद पानं
पिंपळाची आठवण करून देणारी
हरितद्रव्याने काठोकाठ भरलेली
प्रकाशाच्या संश्लेषणाने बनवलेलं विष
शिरांमध्ये साठवणारी
मूळांपर्यंत पोहोचवणारी
पाणीदार भुसभुशीत मातीत 
मूळं रुतवतात त्यांच्या नख्या

बेशरमीला फुलंही येतात

धुतल्या तांदळामध्ये 

जांभळ्या विषाचे चार-दोन थेंब

मिसळलेल्या रंगाची

फुलपात्राच्या तोंडाची

औषधी गुणही असतात तिच्यामध्ये

तणांच्या शेतात 

राणी शोभेल बेशरमी

Monday, 24 September 2012

अरविंद केजरीवालः आत्याबाईला मिशा आल्या तर काका म्हणू...



राजकीय सत्तेचं स्वरुप कसं असावं याबद्दल मतप्रदर्शन करणं आणि विद्यमान राजकीय सत्तेच्या स्वरुपात बदल करण्यासाठी प्रयत्न करणं याला राजकारण म्हणतात. कोणतीही सामाजिक चळवळ जेव्हा या विषयाला स्पर्श करते तेव्हा ती राजकीय बनते. ख्रिस्त या शब्दाचा अर्थच मुळी अभिषिक्त असा आहे. ज्यू धर्मीयांना या पृथ्वीवरचं राज्य मिळवून देण्यासाठी तो पृथ्वीवर आला नव्हता तर तो अंतरात्म्याचं राज्य जिंकण्यासाठी आला होता. पण येशूने जेव्हा राजाचं राजाला द्या आणि ईश्वराचं ईश्वराला, असं म्हटलं तेव्हा ज्यू धर्माचे मुखंड त्याच्या विरोधात खवळून उठले. सुफी पंथीयांनाही छळाला सामोरं जावं लागलंच. गांधीजीनी काँग्रेसचं सदस्यत्व सोडलं होतं, विनोबा भावेही काँग्रेसचे सदस्य नव्हते. जयप्रकाशांनी समाजवादी पक्ष सोडून भूदान चळवळीत झोकून दिलं आणि पुढे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं रुपांतर संपूर्ण क्रांतीमध्ये करून राजकीय सत्तापालट करण्यात महत्वाची भूमिका निभावली.

आपण नेमकं कोणतं राजकारण करतो आहोत ह्याची स्पष्टता गांधी, विनोबा, जयप्रकाश इत्यादींना होती. अण्णा हजारे आणि किरण बेदी ह्यांची नेमकी अडचण हीच आहे की त्यांना आपल्या राजकारणाची दिशा लोकांपासून दूर जात आहे, ह्याची तीळमात्र चिंता नाही. आपण राजसत्तेला वाकायला लावतो ही मिजास हेच त्यांचं राजकारण आहे. जंतर-मंतर येथील आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता हे खरं पण ते आंदोलन सुसंघटीत होतं. अण्णा आणि किरण बेदी ह्यांना नेमका त्याचाच विसर पडला. त्यामुळे टीम अण्णामध्ये फूट पडणं अटळ होतं.

अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण ह्यांना भ्रष्टाचारासंबंधात अधिक स्पष्टता आहे. केवळ भ्रष्टाचार विरोध आंदोलनाला कोणताही मूल्याधार देऊ शकत नाही हे त्यांनी ओळखलं. आंदोलनाला मूल्याचा आधार लागतो, संघटना लागते आणि जनाधार लागतो, ह्याची गरज त्यांनी ओळखली होती. केजरीवाल ह्यांच्या संघटन कौशल्यामुळे जंतर-मंतरचं आंदोलन यशस्वी झालं होतं. नुक्त्याच झालेल्या जंतर-मंतर वरील आंदोलनात केजरीवाल ह्यांनी सुस्पष्ट राजकीयदृष्टी असलेल्या योगेंद्र यादव ह्यांना व्यासपीठावर बोलावलं. या आंदोलनासंबंधात योगेंद्र यादव यांनी एक लेख द हिंदू या दैनिकात लिहीला होता. त्यामध्ये त्यांनी असं सुचवलं की विद्यमान राजकीय व्यवस्था बदलायची असेल तर जनआंदोलनांची कास धरणार्‍या राजकीय संघटनेने हे आंदोलन पुढे न्यायला हवं. केजरीवाल ह्याच दिशेने आंदोलन हाकारू पाहात आहेत. ही बाब एक-दोन वर्षात कधीच घडत नसते पण ती प्रक्रिया सुरु करण्याचा केजरीवाल ह्यांचा प्रयत्न दिसतो.

हा प्रयत्न यशस्वी होईल का अपेशी ठरेल, ह्या प्रश्नावर चर्चा वा मतप्रदर्शन करता येतं. परंतु त्यासाठी केजरीवाल ह्यांना नेतृत्व, संघटनकौशल्य, कार्यक्रमांची कल्पकता दाखवावी लागेल. आंदोलनाला मूल्याधार आणि जनाधार निर्माण करावा लागेल. आत्याबाईला मिशा आल्या तर काका म्हणू.  

Tuesday, 14 August 2012

विलासराव देशमुखः कृष्णा खोर्‍याला शह देणारा राजकारणी


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस १९९९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकमेकांच्या प्रतिस्पर्धी होत्या. शिवसेना-भाजप युतीला त्यामुळे यश मिळेल अशी शक्यता होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने शरद पवारांना वश करण्याची धडपड चालवली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार अधिकारुढ होईल अशी शक्यता होती. सरकार स्थापनेचा घोळ सुरु असताना, ईटिव्ही-मराठी या वाहिनीवरच्या चर्चेत विलासराव देशमुख, बबनराव पाचपुते यांच्यासोबत प्रताप आसबे आणि मी, सहभागी झालो होतो. अर्थात अन्य मंडळीही होतीच. प्रताप त्यावेळी महाराष्ट्र टाईम्समध्ये होता आणि मी डेक्कन हेराल्डमध्ये. चर्चेच्या दरम्यान प्रतापने आणि मी, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना सरकार स्थापनेसाठी तुम्ही एकत्र येणार का, असा थेट प्रश्न विचारला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून विलासराव त्यांच्या नेहमीच्या मिस्कील शैलीत उत्तरले, तुम्हीने दर्द दिया हैं, तुम्ही दवा देना. स्टुडिओमध्ये हास्याची कारंजी उडाली. पुढे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार अधिकारूढ झालं. मुख्यमंत्रीपदी विलासरावांची निवड झाली. त्यांचं अभिनंदन करायला मी गेलो तेव्हा मिस्कील शैलीत म्हणाले, ह्याचं क्रेडीट तुम्हाला आणि प्रताप आसबेंना द्यायला हवं. पुन्हा हंशा.

विलासरावांना काँग्रेसच्या राजकारणाचं मर्म कळलं होतं. काँग्रेसमध्ये राह्यचं तर हाय कमांडची (म्हणजे केवळ गांधी घराणं नाही तर या घराण्याच्या विश्वासातले पक्षाचे पदाधिकारी) मर्जी राखायची असते आणि त्यासाठी येनकेन प्रकारेण विधिमंडळात म्हणजेच सत्तेच्या वर्तुळात स्थान मिळवायचं असतं, हे त्यांनी पक्क हेरलं होतं. त्यामुळेच १९९५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये लातूर विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यावर सेना-भाजपच्या मदतीने विधानपरिषदेत जाण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला होता. अर्थात त्यासाठीही त्यांनी हाय कमांडकडून मंजूरी मिळवलेली होतीच. म्हणूनच तर त्या पराभवानंतर बोलताना ते बिनधास्त म्हणाले होते, आता माझं भवितव्य उज्ज्वल आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्याशिवाय काँग्रेसमध्ये तुमचा उत्कर्ष होत नाही. अ.र. अंतुले, शंकरराव चव्हाण, शरद पवार यांचे दाखले त्यांनी दिले.

काँग्रेस हायकमांडचा वा विलासरावांचा हिशेब साधा होता. राजकारणात सत्तेचं पद नसेल तर कार्यकर्त्यांना आधार देता येत नसतो, मतदारसंघाची बांधणी करता येत नसते. शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण सामील झाले होतेच की. खुद्द शरद पवारांनीच म्हटलंय की शंकरराव आपल्या मंत्रिमंडळात येतील याची शक्यता त्यांना वाटत नव्हती. एस. एम. जोशी त्यांना म्हणाले, विचारून तर पहा, आणि शंकरराव आले की मंत्रिमंडळात.

विलासराव हेच शंकररावांचे राजकीय वारसदार होते. शंकरराव मुख्यमंत्री असताना, त्यांच्याकडील सर्व खात्यांचं राज्यमंत्रीपद विलासरावांकडे होतं. शंकररावांप्रमाणेच विलासरावही सत्यसाईबाबांचे भक्त होते. विलासरावांच्या गढीवर सत्यसाईबाबांनी पायधूळ झाडली होतीच. विधानपरिषद निवडणूकीत पराभव झाल्यावरची विलासरावांची प्रतिक्रीया रोखठोक आणि मिस्कील वाटली तरी गंभीर होती.  म्हणूनच तर १९९९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनीच शपथ घेतली.

मुख्यमंत्री कोणीही झाला की त्याच्या विरोधातला पक्षातला नेता लगेच दुसरं दुकान काढतो आणि मुख्यमंत्र्याच्या दुकानात जे मिळणार नाही त्या वस्तू अर्थात आशा-आकांक्षा विकायला लागतो. हा सिलसिला इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसमध्ये सुरु झाला. विलासराव मुख्यमंत्री झाल्यावरही ही परंपरा होतीच. पक्षाच्या आमदारांची शिष्टमंडळं विलासरावांबद्दल तक्रारी घेऊन दिल्लीला रवाना होऊ लागली. त्याबद्दल विलासरावांची प्रतिक्रीया मार्मिक होती. ते म्हणाले, मंत्री असताना मीही हेच करत होतो. दहा वर्षांनी हेही होतील मुख्यमंत्री. १९९० साली शरद पवारांच्या विरोधात केलेल्या बंडाची आठवण विलासरावांनी करून दिली.

हाय कमांडचा विश्वास संपादन करायचा तर आपला मतदारसंघ ताब्यात ठेवला पाहीजे आणि हाय कमांडच्या मागण्या पुरवल्या पाहीजेत हे विलासरावांना पक्क ठाऊक होतं. मंत्री असो वा मुख्यमंत्री हाय कमांडच्या मागण्या दोन प्रकारच्या असतात. राजकीय आणि आर्थिक. वित्त, गृह, ऊर्जा, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम अशी सर्व महत्वाची अर्थात सर्वाधिक आर्थिक तरतूद असलेली खाती मित्र पक्षाकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असताना, त्याच पक्षाला अडचणीत पकडण्याची राजकीय जबाबदारी हाय कमांडने विलासरावांकडे सोपवली होती. त्यामुळेच एन्‍रॉन प्रकरणी गोडबोले समिती नेमून विलासरावांनी शरद पवारांना पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिला. अर्थात या प्रकरणी एन.डी.पाटलांची भूमिका महत्वाची होती. आपला पक्षच सत्तेत असल्यामुळे एन्‍रॉन प्रकरणी शरद पवारांना विरोधकांवर विशेषतः मेधा पाटकर, एन.डी.पाटील यांच्यावरच टीकेचा रोख ठेवावा लागला. हा विलासरावांचा मास्टर स्ट्रोक म्हणायला हवा.

विलासरावांनी ही विद्या बहुधा शंकररावांकडून शिकली असावी. ज्याला सामान्यपणे पश्चिम महाराष्ट्र म्हटलं जातं ते वस्तुतः कृष्णा खोरं आहे. ह्या खोर्‍याकडेच राज्याचं नेतृत्व राहावं अशी धडपड यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी केली. तीच परंपरा शरद पवारांनी पुढे चालवली. शंकररावांनी हे अचूक ओळखून गोदावरी खोर्‍याची राजकीय बांधणी सुरु केली होती. म्हणूनच तर नगरच्या बाळासाहेब विखे-पाटलांनी त्यांना साथ दिली. जायकवाडी धरण केवळ शंकररावांमुळे झालं. त्यानंतर त्यांनी आठमाही-बारमाही पाण्याचा प्रश्न राजकारणात आणून कृष्णा खोर्‍याच्या अर्थात सहकारी साखर कारखानदारीला शह देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यशवंतराव चव्हाण असोत की वसंतदादा पाटील, शंकरराव मुख्यमंत्रीपदी नसावेत यासाठी जंगजंग पछाडत असत. १९८६ साली स्वगृही परतल्यावर शरद पवार वनवासातच होते. शंकररावांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा दादांचा हट्ट पुरवण्यासाठी हाय कमांडने शरद पवारांना पुढे केलं. त्यानंतर विदर्भ-मराठवाड्यात मास बेस असलेले शरद पवार कृष्णाखोर्‍याचं प्रतिनिधीत्व करू लागले. आज राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कृष्णाखोर्‍यातच आहे. विलासरावांना काँग्रेसच्या राजकारणातले हे ताणेबाणे पक्के ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी शरद पवारांना शह देण्याचं राजकारण यशस्वीपणे केलं. म्हणूनच विलासराव मुख्यमंत्रीपदी असू नयेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असायची.

विलासरावांच्या राजकारणाला याशिवाय अन्य कोणतीही बाजू नव्हती. कारण त्यांच्याकडे राज्य चालवण्याची व्हिजन नव्हती. विदर्भातल्या कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या जमिनी हडपणार्‍या सावकार आमदाराला त्यांनी बिनदिक्कतपणे संरक्षण दिलं. तीच गत सुभाष घई यांना फिल्म सिटीत दिलेल्या जमिनीबाबत होती. शरद पवारांनी आणलेल्या मुंबई शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीत, मुंबईतील कापड गिरण्यांच्या अतिरिक्त जमिनीच्या विकासाबाबत एक निश्चित धोरणात्मक भूमिका होती. विलासरावांनी त्या नियमावलीत बदल करून केवळ गिरणी मालकांचीच धन होईल अशी काळजी घेतली. माझा असा कयास आहे की ही चाल विलासराव केवळ हाय कमांडच्या दबावाखाली खेळले. त्याचा गिल्ट कॉम्प्लेक्स विलासरावांना होता. ( गिरण्यांच्या जमिनीवर जे उद्योग येतील त्यामध्ये गिरणी कामगार वा त्यांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य मिळायला हवं असं सांगणारा आदेशही विलासरावांच्याच कारकीर्दीत निघाला. गिरणी कामगारांना घरांचा हक्क देण्याबाबत त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आणि गिरणी कामगार संघर्ष समितीला बळ पुरवलं. खोल्या बांधून तयार होऊ लागल्यावर अर्थातच मुंबईतील सर्वच राजकीय पक्षांनी या प्रश्नाचा पाठपुरावा सुरु केला.) काँग्रेस हायकमांडसाठी नगर विकास खातं ही नेहमीच दुभती गाय राह्यली. बॅक बे रेक्लमेशनपासून हा सिलसिला सुरु झाला. विलासरावही त्यात धारेला लागले. आदर्श सोसायचीचं प्रकरण हे त्याचं एक मासलेवाईक उदाहरण आहे.

विलासरावांना हाय कमांडचा आशीर्वाद सतत लाभला पण केंद्र सरकारातील त्यांचं स्थान उतरणीला लागलं होतं. त्यांच्याकडे सोपवलेल्या खात्यांच्या आर्थिक तरतुदीवरून ते सहजपणे ध्यानी येतं. याबाबतीत ते शंकररावांचा वारसा चालवू शकले नाहीत. त्याची कारणंही उघड आहेत. आदर्शापेक्षा व्यवहाराला चिकटून राहणं, हेच राजकारण अशी विलासरावांची धारणा होती. त्यामुळे राज्यकर्ता म्हणून धोरणांचा विचारही त्यांनी कधी केला नाही. हायकमांडने धोरणं ठरवावीत आणि आपण ती जमेल तेवढी अमलांत आणावीत एवढंच त्यांचं राजकारण होतं. अर्थात हे केवळ विलासरावांचं अपयश असं म्हणता येणार नाही. आजचे सर्वच राजकारणी या खोड्यात अडकले आहेत.
विलासरावांच्या व्यक्तिमत्वाला इतरही अनेक पैलू होते. पण त्याबद्दल लिहायला वर्तमानपत्रं आहेतच की......

Sunday, 29 July 2012

टीपः आसामातल्या हिंसाचाराबाबतचे वृत्तांत वृत्तपत्रात वाचा




चिरांग, ढुबरी, कोक्राझार या तीन जिल्ह्यांत उसळलेल्या दंगलींमध्ये ४० लोक ठार झाले आणि १ लाख ७० हजार निर्वासित झाले.

२५ जुलै रोजी उत्पल बोर्दोलोईने फेसबुकवरील डेक्कन हेराल्ड ग्रुपच्या भिंतीवर लिहिलं

ताज्या घटना, मुसलमानांच्या आसामवरील नव्या आक्रमणाच्या आहेत. १७ व्या शतकात अहोम राजांनी मुसलमानांचा (मोगल) १७ वेळा पराभव केला. पण यावेळी आक्रमकांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. १९४७ पासून १० वर्षं वगळता आसामात काँग्रेसचं सरकार होतं. हे विश्वासघातकी लोक, सत्तेसाठी देशालाही विकायला कमी करणार नाहीत.

डेक्कन हेराल्ड या बंगलोरमधील इंग्रजी वर्तमानपत्रात ईशान्य भारतातील वार्तांकनाची जबाबदारी उत्पलवर होती. त्याला दोन वेळा स्टेट्समन या दैनिकाचा ग्रामीण वृत्तांकनासाठीचा पुरस्कार मिळाला होता. सुरक्षा दलांनी नागालँडमध्ये केलेल्या अत्याचारांच्या बातमीला वाचा फोडल्याबद्दल उत्पलला मानवी हक्क पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. उत्पल सध्या निवृत्त आहे. गुवाहाटीमध्ये घरात बसून तो केवळ फेसबुकच्या भिंतीवर अभिव्यक्त होत असतो.

फेसबुकवरच उत्पलशी आसामातील तीन जिल्ह्यांमध्ये उसळलेल्या हिंसाचाराबाबत चर्चा करत होतो आणि अभिजीत देब उगवला. सेव्हन सिस्टर्स पोस्ट या गुवाहाटीमधील दैनिकात वार्ताहर आहे. तो कोक्राझारला निघाला होता. आसामातील ताज्या हिंसाचाराबद्दल माझं काय आकलन आहे, असं त्याने विचारलं. आसाम ट्रिब्यून, आसाम टाईम्स आणि द हिंदू, या तीन वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि वृत्तांत वाचतोय आणि हिंदू मध्ये आलेल्या बातम्या नेमका तपशील देणार्‍या वाटतात, असं मी त्याला म्हटलं. या उत्तराने त्याचं समाधान झालं नाही, तेव्हा मी म्हटलं जमीन आणि जंगल या नैसर्गिक संसाधनांचं नियंत्रण ह्यामध्ये या संघर्षाची बीजं आहेत. बोडो आणि बिगर-बोडो असा हा संघर्ष आहे. संथाल, बंगाली, बांग्ला देशी मुसलमान यांना आपल्या प्रदेशातून हद्दपार करण्यासाठी बोडोंनी हिसंक मार्गाचा अवलंब केला आहे आणि त्याला बंगाली मुसलमानांनी जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार केला असावा असं बातम्यांवरून दिसतं, असं टाईप करताना मी गुगुल मॅपवर आसामचा नकाशा पाहू लागलो.

ब्रह्मपुत्रा नदीने आसामचे दोन भाग केलेले आहेत. अप्पर वा वरचा आसाम आणि लोअर वा खालचा आसाम. ढेमाजी, दिब्रुगढ, लखीमपूर, गोलाघाट, जोरहाट, सिबसागर, तिनसुकीया हे जिल्हे वरच्या आसाममध्ये मोडतात. नदी उंचावरून सखल भागात येते त्यानुसार हे दोन भाग पडतात. वरच्या आसामातली जमीन सुपीक, चहामळ्यांची सुरुवातही इथूनच झाली. कोळसा, तेल, नैसर्गिक वायू ही महत्वाची खनिजं तिथेच आहेत. उत्पलने ज्या अहोम राजांचा उल्लेख केलाय ते याच प्रदेशातले. सिबसागर आणि त्यानंतर जोरहाट, अहोम राजांची म्हणजे आसामची राजधानीची शहरं होती.

ढुबरी, कोक्राझार, बोंगाईगाव, गोलपारा, दरांग, मोरीगाव, बाक्सा, उदालगुरी, चिरांग, कामरुप, बारपेटा, नलबारी हे जिल्हे खालच्या आसामात येतात. हा प्रदेश बोडोंचा. बोडो आसामचे सर्वात प्राचीन रहिवासी. (कारण अहोम लोक म्यानमारमधून आसामात आले आणि त्यांनी सहाशे वर्षं राज्य केलं.) बोडो-कचारी या आदिवासी समूहामध्ये ब्रह्मपुत्रेच्या खोर्‍यातल्या अनेक आदिवासी समूहांचा समावेश होते. गारो, राभा, हाजोंग, कोच-राजबंशी, दिमासा कचारी, सोनवाल कचारी, मिशिंग, तिवा हे आदिवासी समूह ब्रह्मपुत्रेच्या दोन्ही तीरांवर होते.

ईशान्य भारतात पहाडी प्रदेशात आदिवासी जमाती आहेत. नागा, खाँसी, मिझो, इत्यादी. त्यांना स्वतंत्र राज्यही यथावकाश स्थापन झाली आहेत. मैदानी प्रदेशातही आदिवासी आहेत. बोडो-कचारी आदिवासी मैदानी प्रदेशातले आदिवासी.

बोडो आणि अहोम वा बोडो आणि बिगर-बोडो हा फरक कोणत्या आधारावर करायचा?  सुजीत चौधरी या इतिहासकाराने शेतीचं तंत्रज्ञान हा निकष नोंदवला आहे. जमीनीवरचं जंगल साफ करायचं, काडी-कचरा जाळायचा. काठी जमिनीत रोवून छिद्र करायचं त्यात बी पेरायचं किंवा सरळ बिया विखरून टाकायच्या. शेतीची निगराणी म्हणजे केवळ राखण करायची. भाते पिकूनी पिवळी झाली की काढणी करायची. पुढच्या वर्षी दुसर्‍या जागेवरचं जंगल कापायचं. असं करत परत पहिल्या जागी यायला ८-१० वर्षं लागायची. यालाच म्हणतात झूम शेती. ही आदिवासींची शेती. प्रगत शेती तंत्रज्ञान म्हणजे नांगराची शेती. ही स्थिर शेती असते. नांगरणी करायची तर बैल पाळावे लागतात. बैलांनाही नांगरणी करायला शिकवावं लागतं, त्याशिवाय जमिनीची मशागत करावी लागते, निंदणी, खुरपणी करावी लागते. म्हणजे पिकाची निगा घ्यावी लागते. त्यामुळे स्थिर शेतीतून उत्पादन अधिक निघतं म्हणजेच वरकड उत्पादन येतं. ते बाजारात विकून अन्य वस्तू, सुविधा विकत घेता येतात. अप्पर आसामातल्या सुपीक जमिनीतून बोडोंना हद्दपार केल्यावर अहोम वा बंगाली वा अन्य प्रगत समूहांनी नांगराची शेती सुरु केली. आपल्या वहिवाटीच्या जमिनीवरून बोडोंची हकालपट्टी प्राचीन काळापासून सुरु होती. पण जोवर जमिनीची उपलब्धता होती तोवर या समस्येने उग्र रुप धारण केलं नाही.

विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत म्हणजे १९३० पर्यंत बोडो-कचारी समूहांनी शेत नांगरण्याचं तंत्र आत्मसात केलं. झूम शेती होती तेव्हा शेतजमीन सारखी बदलत राह्यची. त्यामुळे त्यांच्या जमिनी हडप करणं परप्रांतीयांना सोपं होतं. मात्र बोडो स्थिर शेती करू लागल्यावर शेतजमिनीवरू संघर्ष होऊ लागले. हे संघर्ष तीव्र होण्याचं कारण ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण. प्लांटर राज टू स्वराज, या ग्रंथात अमलेन्दु गुहा यांनी नोंदवलं आहे की ईस्ट इंडिया कंपनीने आसाम ताब्यात घेतल्यावर उत्पादन वाढीसाठी चहामळे आणि अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणण्यावर भर दिला. चहामळ्यांसाठी तर करमाफीची योजना होती. चहामळ्यांवर काम करायला मोठ्या प्रमाणावर मजूरांची गरज होती. त्यासाठी बिहार, ओडीशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, मद्रास या प्रांतातील दुष्काळप्रवण भागातून प्रचंड प्रमाणावर मजूरांची आयात करण्यात आली. आसाम त्या काळात बंगालला जोडण्यात आला होता. मेमनसिंग, ढाका इत्यादी जिल्ह्यांमध्ये परिपत्रक काढून ब्रिटीशांनी शेतकर्‍यांना आसामात जमीन कसण्यासाठी येण्याचं आमंत्रण दिलं. जंगल जमीन वहिताखाली आणली तर एक वर्षासाठी शेतसारा माफ करण्यात आला. परिणामी आसामात परप्रांतीयांचा ओघ सुरु झाला. नेपाळी, बंगाली, संथाळ मोठ्या प्रमाणावर आसामात स्थलांतरित झाले. त्यांनी स्वतंत्र गावं वसवली. याप्रक्रियेत वा स्थित्यंतरात बोडोंच्या जमिनीवरच सर्वाधिक अतिक्रमण झालं. १९३१ सालापर्यंत आसामातील परप्रांतीयांची संख्या १३ लाख झाली. त्यावेळच्या आसामच्या लोकसंख्येमध्ये हे प्रमाण १/६ होतं. जवळपास १५ लाख एकर जंगल जमीन लागवडीखाली आणण्यात आली. परप्रांतीय आसामातील वनसंपत्तीचं बेसुमार शोषण करत आहेत या विषयावर आसामच्या विधिमंडळात १९३७ सालीच घमासांग चर्चा झाली.

निर्माल्य बॅनर्जी या टाईम्स ऑफ इंडियाच्या पत्रकारानी २०११ साली प्रसिद्ध केलेल्या   वृत्तांतात २००८ साली घडलेल्या बोडो-बिगर बोडो समूहांमधील संघर्षाचा  सविस्तर आढावा घेतला आहे. त्यात म्हटलंय...... बोडो टेरिटोरिअल एरिया डिस्ट्रीक्ट या प्रदेशात १९९३ ते १९९८ या काळात झालेल्या दंगलींमध्ये बळी पडलेल्यांची आणि विस्थापितांची संख्या अस्वस्थ करणारी होती. बोंगाईगाव जिल्ह्यात ऑक्टोबर १९९३ साली झालेल्या बोडो आणि बांग्लादेशी मुसलमान यांच्यातील संघर्षात ५० व्यक्ती ठार झाल्या आणि जवळपास ५००० मुसलमान निर्वासित झाले. जुलै १९९४ मध्ये बारपेटा जिल्ह्यातील हिंसाचारात १०० लोक मृत्युमुखी पडले. निर्वासितांनी बान्सबारी येथील छावण्यांमध्ये आसरा घेतला. १९९६ च्या मे महिन्यात झालेल्या दंगलीत २०० पेक्षा अधिक माणसांनी जीव गमावला तर विस्थापितांची संख्या होती दोन लाख. कोक्राझार आणि बोंगाईगाव या जिल्ह्यामध्ये शेतजमीनीवरील नियंत्रणावरून उसळलेला हा हिंसाचार बोडो आणि संथाळ या दोन जमातींमधला होता. मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत उसळलेल्या हिंसाचारात दोन आदिवासी जमातींमधले ५० हून अधिक लोक ठार झाले आणि ८० हजार विस्थापित. ऑगस्ट आणि ऑक्टोबर २००८ मध्ये मुस्लिम आणि बोडो संघर्षात उदालगिरी आणि दरांग जिल्ह्यात दोन्ही समाजातील ७० लोक ठार झाले तर एक लाखांहून अधिक विस्थापित.

लोकसंख्याशास्त्र आणि जिऑग्राफिकल इन्फर्मेशन सर्वे या दोन तंत्रांचा वापर करून, महाश्वेता सत्पती या अभ्यासिकेने (नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी), बोडो प्रदेशातील हिंसाचाराची मीमांसा केली आहे. आसामातील विस्थापितांमध्ये सर्वाधिक संख्या संथाळ, बंगाली आणि नेपाळी यांची आहे, असं सत्पती यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. गोलपारा, कामरुप आणि दरांग या तीन जिल्ह्यांत बोडोंची लोकसंख्या एकवटत असल्याचं सत्पती यांनी निदर्शनास आणलं आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये  ९३ टक्के बोडो आहेत. या तीन जिल्ह्यांमधील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात बोडोंचा वाटा केवळ १०-१५ टक्के आहे. बिगर-बोडो लोकसंख्येला म्हणजे अर्थातच संथाल, बंगाली, आसामी, नेपाळी यांना बोडोलँडच्या संकल्पित प्रदेशातून हुसकावून तिथे आपलं वर्चस्व निर्माण करण्याची  स्वतंत्र बोडो राज्याच्या मागणीसाठी बोडोंचं वर्चस्व असलेल्या जिल्ह्यांमध्ये बोडोंची लोकसंख्या वाढवायची असेल तर बिगर-बोडोंना हुसकावून लावण्याची बोडो राज्याच्या समर्थकांची अर्थातच बोडोंमधील अतिरेकी संघटनांची युद्धनीती असल्याचं सत्पती यांनी नोंदवलं आहे. या मागणीसाठी १९९६ पासून बोडो अतिरेकी हिंसक मार्गांचा अवलंब करत आहेत. निर्माल्य बानर्जीच्या वृत्तांत असं सूचित करतो की बोडो अतिरेक्यांनी उदालगिरी, बारपेटा, कोक्राझार, बोंगाईगाव या जिल्ह्यांकडे लक्ष वळवलं होतं. या खेपेला चिरांग आणि ढुबरी या दोन जिल्ह्यांची त्यामध्ये भर पडलेली दिसते.

१९३२ सालापासून आसामातील राज्यकर्त्यांनी बोडोंच्या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केलं वा कायद्याची आणि कायद्याने निर्माण केलेल्या यंत्रणांची चेष्टा केली त्यामुळे आज बोडो विरुद्ध बिगर-बोडो संघर्षाने कमालीचं हिंसक रुप धारण केलं आहे. परप्रांतीयांच्या लोंढ्यांपासून बोडोंच्या जंगल-जमिनीवरील हक्कांचं रक्षण करावं या हेतूने इनर लाईन परमिट, संरक्षित जमिनीचे पट्टे अर्थात बोडोंची जमीन अन्य जमातीच्या लोकांच्या नावावर हस्तांतरित होण्यास निर्बंध घालण्यासारखे उपाय १९३२ ते १९४२ या काळातही करण्यात आले परंतु तो तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होता आणि धरसोड वृत्तीही होती. त्याची कारणं आसामच्या राज्यकर्त्या वर्गाच्या चारित्र्यात होती. राज्यकर्ता वर्ग म्हणजे केवळ सत्ताधारी पक्ष नाही तर प्रशासन यंत्रणाही. कारण या कायद्यांमध्ये कुठेही आदिवासी कोण हेच निश्चित केलेलं नव्हतं. धरसोड वृत्ती अशी होती की एका कायद्यान्वये कुरणं आणि गायरान जमिनी लागवडीखाली आणण्यावर निर्बंध घालायचे आणि अन्नोत्पादनात वाढ करण्याचा कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी हे निर्बंध शिथिल करायचे असा खेळ आसामचे राज्यकर्ते करत होते. १९९३ साली बोडोंसाठी प्रादेशिक स्वायत्त मंडळांची स्थापना झाली. बोडो संघटनांनी स्वतंत्र राज्याची मागणी मागे घेतली. परंतु या स्वायत्त मंडळांच्या निवडणुका कधीही झाल्या नाहीत. त्यांच्या नेमणुका राज्य सरकारनेच करण्याचा प्रघात चालू ठेवण्यात आला. लोकशाही विकेंद्रीकरणाचं तत्व लोकांपर्यंत झिरपलंच नाही. स्वायत्त मंडळांच्या सत्तेचं आमिष दाखवून विविध बोडो संघटनांमध्ये संघर्ष पेटवण्याचं काम राज्य सरकारने केलं. त्यातून समस्या सुटली नाहीच उलट नियंत्रणाच्या बाहेर जाऊ लागली. आदिवासींसाठी स्वायत्त विकास मंडळांच्या स्थापनेमुळे आसामातील मैदानी प्रदेशातील आदिवासींच्या विकासाची समस्या सुटण्यास मदत झालेली नाहीच पण त्यामुळे अडचणी अधिक वाढल्या, असं मत आसामचे माजी आयुक्तगृह, एल. टी. बारुआ यांनी नोव्हेंबर २००७ मध्ये आसाम ट्रिब्यून या वर्तमानपत्रात सविस्तर लेख लिहून मांडलं होतं.

ऐंशीच्या दशकात सुरु झालेल्या आसाम आंदोलनाला आणि त्यानंतर अधिकारूढ झालेल्या आसाम गणपरिषदेच्या सरकारला शह देण्यासाठी स्वतंत्र बोडोलँड वा बोडोंसाठी स्वतंत्र राज्याच्या मागणीला काँग्रेसने फूस दिली. बोडोंच्या सशस्त्र लढ्याला केंद्र सरकारनेच मदत केली. ८ नोव्हेंबर १९९७ मध्ये द स्टेट्समन या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बी. के. राव यांनीच तसं स्पष्टपणे सूचित केलं. बोडो संघटनांबरोबर वाटाघाटी करण्यात राव यांनी कळीची भूमिका निभावली होती. ते म्हणाले, ऐेंशीच्या मध्यावर अशी स्थिती होती की ऑल आसाम स्टुडन्ट युनियन आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामच्या पाठिशी संपूर्ण आसाम उभा राह्यला होता. या शक्तीला कमजोर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. बोडोंचं आंदोलन उभं राहू लागल्यावर उल्फा आणि आसू यांच्या समर्थनात निम्म्याने घट झाली कारण नवीन सरकारला लोअर आसामचा (तेथील आदिवासींचा) पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे उल्फाची शक्ती कमी झाली अन्यथा उल्फाने चहामळ्यातील कामगारांना प्रभावीत केलं असतं. आसाम गणपरिषदेच्या सरकारचे मुख्यमंत्री प्रफुल्लकुमार महंता यांनी जाहीर आरोपच केला होता की बोडोलँडची मागणी करणार्‍या अतिरेक्यांना भारत सरकारच्या रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसीस विंग या हेरसंस्थेने प्रशिक्षण दिलं आहे. 


Tuesday, 8 May 2012

चहाच्या पेल्यातलं वादळ...


स्वर्ग आणि पृथ्वी एकमेकांपासून अलग केल्यावर जगाची निर्मिती झाली. स्वर्गातील एकूण बारा सम्राटांनी प्रत्येकी १८ हजार वर्षं या जगावर राज्य केलं. त्यानंतर पृथ्वीवरील अकरा राजांनी या जगाचा कारभार सांभाळला. प्रत्येक राजाची राजवट स्वर्गातील सम्राटाएवढीच होती. त्यानंतर मानवजातीच्या नऊ प्रमुखांनी एकूण ४५ हजार वर्षं राज्यकारभार केला. सोळा सार्वभौम अधिकार्‍यांवर जगाची जबाबदारी सोपवण्यात आली. शेवटी फु सी, शेन नुंग आणि हुआंग टी या त्रयींनी पृथ्वीवर प्रगती घडवून आणली. फु सी आणि हुआंग टी पीतनदीच्या दक्षिणेकडील होनन या प्रदेशात राह्यचे. पृथ्वीवरील सर्व हस्तकौशल्य आणि कला या दोघांनी शोधली. तिसरा सार्वभौम अधिकारी शेन नुंग. पृथ्वीवरील जमीन सर्वप्रथम नांगरण्याचा मान शेन नुंगचाच. त्यानेच चहा या पेयाची मौल्यवान देणगी अखिल मानवजातीला दिली.

या चिनी दंतकथेचा काळ इसवीसनपूर्व २७३७. शेन नुंगने वैद्यकीय ग्रंथात लिहिल्याप्रमाणे चहामुळे तहान भागते. झोप कमी येते, मन आणि शरीर प्रफुल्लित होते. चहाच्या शोधासंबंधात चीनमध्ये अनेक दंतकथा आहेत. भारतातून चीनमध्ये गेलेल्या बौद्ध भिक्षूंनी चहाचा स्वीकार केला. चहाला धार्मिक पेयाचाही मान त्यामुळे मिळाला. चीनमधील अनेक धर्मपंथांनी चहाला गौरवाचं स्थान दिलं. मंदिराभोवती चहाचे मळे लावण्याची प्रथाच तिथे होती. लू यू या विद्वानाने चा चिंगसर्वश्रेष्ठ चहा असा ग्रंथच लिहिला. चहाच्या संदर्भातील बौद्ध, टाओ आणि कन्फ्युशिअन तिन्ही पंथींयांच्या तत्वांचा आढावा लू यूने घेतला आहे. सौंदर्य आणि साधेपणा ही दोन तत्वं लू यूला चहा या पेयात आणि चहापानाच्या कार्यक्रमात दिसली. लू यू त्याच्या बोहेमियन जीवनशैलीमुळे प्रसिद्ध होता. त्यात या ग्रंथाची भर पडल्याने त्याची लोकप्रियता वाढली. चीनच्या सम्राटाने त्याच्याशी मैत्री केली. चहा कसा करावा याचं रसभरीत वर्णन लू यूने केलं आहे. लू यूने सांगितलेल्या चहाच्या कृतीत दूध नाही. चहात चवीसाठी कणभर मीठ घालत किंवा खजूर, कधी स्वादासाठी पेपरमिंट असंही लू यूने नोंदवलं आहे. सुंदर निळसर झाक असलेले चिनी मातीचे कप चहा या पेयासाठी अत्त्युत्तम असतात. लालसर चॉकलेटी चहा या कपात ओतला की चहाला एक आगळावेगळा पांचूसारखा हिरवट रंग येतो आणि त्यामुळे पेयाची लज्जत वाढते असं लू यूने म्हटलं आहे. इसवीसन ८०४ साली लू यूने जगाचा निरोप घेतला. पण तोपावेतो चहा चिनी जनमानसात आणि संस्कृतीत पुरतेपणी मुरला होता. लू यूने चहाची रोपं, पानं, जाती, चहा करण्याची भांडी, चहाचे कप, चहापानाचा कार्यक्रम इत्यादीबाबत आपल्या त्रिखंडात्मक ग्रंथात जी माहिती दिली होती ती आजही आदर्श मानली जाते. जपानी चहापानाचा गूढ कार्यक्रम लू यूच्या ग्रंथाच्या आधारेच आकाराला आला. चीन, जपान आणि अतिपूर्वेकडील देशांमध्ये चहा चीनमधूनच पोचला. चहापानाला शाही स्वरूप आलं होतं. चिनीमातीची नक्षीदार भांडी, चहाच्या किटल्या अशा सरंजामामुळे चहा हे पेय तालेवारांच्या शाही बैठकांमध्ये रुळलं. अरबांमुळे युरोपियनांना चहा या पेयाची आणि चहापानाच्या कार्यक्रमाची ओळख झाली. छानछोकीच्या वस्तू आणि षौक ह्यांचा युरोपमध्ये दुष्काळच होता. युरोपिय देशातील उमराव, बडे व्यापारी चहा आणि त्याचा शाही सरंजाम यांच्याकडे म्हणूनच आकर्षिले गेले.  आफ्रिकेतून कॉफी येण्याआधी युरोपकडे वाईन हेच शाही पेय होतं. पहिल्यांदा कॉफीने आणि त्यानंतर चहाने विविधता आणली. चहाच्या पानांवर करायची प्रक्रिया युरोपला माहिती नव्हती. जपानने पाश्चांत्यांना आपली बंदरं बंद करून टाकली होती आणि पाश्चात्य लोक लबाड आहेत अशीच चिनी राज्यकर्ते व व्यापारी ह्यांची धारणा होती. त्यामुळे चीनने केवळ एकच बंदर युरोपशी व्यापार करण्यासाठी खुलं केलं होतं. प्रथम पोर्तुगीजांनी चहाची आणि चहापानाची चव जपान आणि चीनमध्ये चाखली. त्यानंतर डचांनी. त्यांनी चहापानाच्या समारंभाची रसभरीत वर्णनं करून ठेवली. त्यामुळे डच व्यापार्‍यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून व्यापारात आघाडी घेतली. १६१० साली चिनी आणि जपानी चहा घेऊन बोटी युरोपला रवाना झाल्या. तरिही १७०० सालापर्यंत चहा हे पेय युरोपात दुर्मिळच होतं. इंग्लड आणि अन्य युरोपिय देशांमध्ये उमराव, दरबारी, श्रीमंतांच्या घरीच हे पेय घेतलं जाई. कॉफी हाऊसमध्ये अतिशय महागडं पेय म्हणून चहाची विक्री व्हायची. चहाबरोबर चहा बनवायची नक्षीदार पोर्सेलिनची भांडीसुद्धा आयात केली जायची. त्यावेळी युरोपात चहापानाच्या पार्ट्या आयोजित केल्या जात. एक पौंड चहा त्यावेळी १०० डॉलरला मिळायचा. असा चहा पोर्सेलिनच्या नक्षीदार भांड्यातून दिला जायचा. त्यावेळी युरोपियन लोक चहा बशीत ओतून फुर्रर्र असा आवाज करत प्यायचे. पुढे कधीतरी म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर चहा कपातूनच आवाज न करता प्यायचा असं रुढं झालं. चहापानानंतर केक, थोडीशी ब्रँडी, तोंडात टाकायला मनुका, बेदाणे, असा या पार्ट्यांचा थाट असायचा. ह्यालाच म्हणायचे हाय टी. पुढे चहा इंग्लडात भलताच लोकप्रिय झाला. म्हणजे क्रिकेट हा खेळ भारताचा वाटतो तसं चहाबाबत ब्रिटीशांचं झालं. गोची अशी होती की चहा काय किंवा पूर्वेकडून येणार्‍या मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार डचांच्या हाती होता. डच व्यापारी अनेकदा दर वाढवत असत. त्यामुळे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यात आली. (युरोपियन लोकांना जे जे एक्झॉटिक वाटायचं त्याला ते इंडिया म्हणायचे. त्यामुळे चीनशी व्यापार करणार्‍या कंपन्यांची नावं ईस्ट इंडिया तर अमेरिकेला गेलेला कोलंबस तिथल्या सर्व मूळच्या रहिवाशांना इंडियन म्हणून मोकळा झाला. अज्ञात अशा पूर्वेलाच नाही तर अज्ञात  अमेरिकेतही एका बेटांच्या समूहाला वेस्ट इंडीज असं नाव युरोपियनांनी देऊन टाकलं.) ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी केवळ व्यापारासाठीच स्थापन झाली पण तिला अनेक अधिकार देण्यात आले, उदा. ब्रिटीश साम्राज्याच्या सीमा वाढवणे, सैन्य जमवणे, युद्ध करणे, खटले भरणे, गुन्हेगारांना शिक्षा देणे असे. त्यामुळे ही कंपनी ब्रिटीश साम्राज्याची वाहक बनली. चहाच्या व्यापाराचा एकाधिकारच या कंपनीकडे आला. दरम्यानच्या काळात जर्मनी आणि फ्रान्समध्येही चहा पोचला. पण जर्मन लोकांना बीयरपुढे सर्वकाही फिकं वाटायचं. फ्रान्समध्येही वाईनची जागा चहाला मिळाली नाही. चहाऐवजी आफ्रिकेतून आलेली कॉफी फ्रेंचांना अधिक पसंद होती. रशियात चहा पोचला मंगोलियामार्गे. रशिया मुलुखाचा गरीब देश. बहुसंख्य लोक दिवसातून एक दिवसच पोटभर जेवत. त्यामुळे भूक मारायला चहा हे पेय त्यांना वरदानासारखंच वाटलं. चहा, पाणी आणि लिंबू असं एकत्र उकळून दिवसभर घुटके घेत बसायचं, अशी रशियन पद्धत. चहा ते पाण्यासारखाच प्यायचे. म्हणून पाणी गरम करण्याचा हीटर आणि चहाची किटली अशा संयुक्त उपकरणाची निर्मिती या रशियन लोकांनी केली. त्यालाच म्हणतात सॅमोव्हार. ह्या भांड्यात एकावेळी चाळीस कप चहा करता यायचा. रशियन लोक तोंडात साखरेचा खडा ठेवून गरमागरम चहा घोट-घोट पित असत. ग्लासभर चहा आणि तोंडात साखरेचा खडा ठेवून घुटके घेण्याचा आनंद स्वर्गीय आहे, असं अलेक्झांडर पुष्कीन (१७९९-१८२३) या रशियन कवीने लिहूनच ठेवलंय.  रशियन लोकांनी चहाभोवतीचं सौंदर्यांचं, खानदानीपणाचं वलय नष्ट करून टाकलं. ह्याबाबतीत त्यांचं आणि आपलं जुळत असावं. अमेरिकेत चहा बहुधा सतराव्या शतकातच पोचला. १६७४ साली न्यूयॉर्कच्या अवतीभवती चहाच्या बागा तयार करण्यात आल्या. चहा घरी बनवण्याची पद्धत होती. शहराच्या आसपासच्या झर्‍यातलं पाणी घेऊन फेरीवाले दारोदार हिंडत आणि चहाचं पाणी अशी आरोळी देत. बायका ते पाणी चहा करण्यासाठी विकत घेत. ब्रिटनमधून अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्यांसाठी चहा अत्यावश्यक बाब झाली होती. चहाचा कारभार तर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात होता. अमेरिकेतील वसाहतींमध्ये चहा, रेशीम, मसाल्याचे पदार्थ ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमार्फतच पाठवले जायचे. या वस्तूंवर ब्रिटीश सरकारने कर बसवले. त्याला वसाहतवाद्यांनी विरोध केला. ब्रिटीश सरकारने त्यांच्या विरोधापुढे मान तुकवली आणि बहुतेक वस्तूंवरचे कर हटवले. पण चहावरचा कर मात्र ठेवला. त्यामुळे वसाहतवाले संतापले. १६ डिसेंबर १७७३ रोजी कंपनीची तीन जहाजं चहा घेऊन बोस्टन बंदरात दाखल झाली. तिथे संतप्त जमावापुढे भाषण करताना जॉन रोवे हा म्होरक्या म्हणाला, खारट पाण्यात चहा कसा मिसळेल? त्याच्या ह्या वक्तव्याने ठिणगी पडली. आणि जमावाने हजारो टन चहा समुद्रात बुडवला. हीच ती बोस्टनची टी पार्टी.

    केवळ अमेरिकन वसाहतींमध्येच नाही तर ब्रिटनमध्येही चहावर कर लावण्यात आला. त्यामुळे ब्रिटनमध्ये चहाची तस्करी सुरु झाली. चहाचा काळाबाजारही तेजीत सुरु झाला. लाचखोरी, भ्रष्टाचार यामध्ये वाढ झाली. उच्च प्रतीचा चहा सामान्य लोकांना वाजवी किंमतीत मिळाला पाहीजे ह्यासाठी लंडनमध्ये आंदोलन झालं. परिणामी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा चहावरील एकाधिकार संपुष्टात आला. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार डांबीसपणाचाच होता. चीनमध्ये अफूच्या आयातीवर बंदी घालण्यात आली. तरिही कंपनी तिथे अफूची विक्री करायची. (भारतातली अफू चीनमध्ये निर्यात केली जायची. मुंबई शहरातून या अफूचा व्यापार चालायचा. मुंबई शहराची पायाभरणी कापसाच्या नव्हे तर अफूच्या व्यापाराने केली. अमिताव घोष यांच्या सी ऑफ पॉपीज् या कादंबरीमध्ये त्याची दखल घेण्यात आलीय.) त्यामुळे चिनी राज्यकर्त्यांना ब्रिटीशांबाबत अधिक संशय वाटू लागला. यातूनच १८३९ ते ४२ या काळात चीन-ब्रिटन यांच्यात युद्ध पेटलं त्याला म्हणतात अफूचं युद्ध. त्यात चीनचा पाडाव झाला आणि ब्रिटीशांना बरेच अधिकार मिळाले. पुढे १८५७ सालच्या बंडानंतर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा अस्त झाला. दरम्यानच्या काळात भारतात ब्रिटीशांनी चहा लोकप्रिय करायला सुरुवात केली होती. टीपॉय म्हणजे चहाचे कप ठेवण्याचं खुर्चीसमोरचं छोटं टेबल. हाय टी म्हणजे दुपारी चहासोबत केक, बिस्कीटं मांडायचं मोठं टेबल. चहाच्या मार्केटिंगमधून जन्माला आलेले हे फर्निचरचे आणि शिष्टाचाराचे प्रकार बाबू लोकांमध्ये रुळू लागले होते. तरिही १९ व्या शतकात चहा भारतीयांच्या जिभेवर रुळला नव्हता. चहाची सवय वा व्यसन विसाव्या शतकातच देशात पसरू लागलं.  

तो चहा गुलाबी, चर्चा खळखळणारी...अशा शब्दांत इंदिरा संत यांनी मराठी चहाच्या रंगरुपाची नोंद करून ठेवली आहे. माधव साठे ह्या समाजवादी साथीला कुलाब्यापासून दादरपर्यंतच्या प्रत्येक इराणी हॉटेलातल्या चहाची चव पक्की ठाऊक होती. इराण्यांच्या हॉटेलात पानी कम चहा मिळतो. म्हणजे चहाचं पाणी कमी. दूधाचं प्रमाण तेच. लंबा पानी चहाही मिळायचा. इराण्यांची हॉटेलं हे तरुणांचे अड्डे होते. अरुण कोलटकरच्या इराणी या कवितेत ह्या माहौलाचं सुंदर साक्षेपी चित्रण आहे. त्यात दुधाचं प्रमाण कमी असायचं. मुसलमानांच्या चहाला इलायचीचा स्वाद असायचा. शेट्टी वा उडप्यांच्या हॉटेलातला चहा भरपूर दूध घातलेला. सत्तरच्या दशकात मुंबईत म्हणजे दक्षिण मुंबईत, शंकरविलास हिंदू हॉटेलांची साखळी होती. ह्या हॉटेलांमध्ये फक्त चहा, नेस्कॅफे आणि उकाळा मिळायचा. साधा, स्पेशल, तीन नंबर आणि गुलाबी असे चार प्रकारचे चहा तिथे मिळायचे. अंधेरी स्टेशनात अमेरिकन चहा मिळायचा म्हणजे चहात दुधावरची साय टाकून द्यायचा तो स्टॉलवाला. दादर स्टेशनाच्या बाहेर बबनचा चहाचा स्टॉल हा पत्रकारांचा अड्डा बनला होता. तो चहात कोकोचा वगैरेही स्वाद टाकायचा. अंबरिश मिश्र रात्री उशिरापर्यंत तिथे आपली मैफील जमवायचा. अर्धा कप चहासाठी कटिंग हा शब्द बहुधा मुंबई शहरात जन्म पावला असावा. पण कट म्हणजे कापणे म्हणून कटिंग हा शब्द वापरून हाफ कप चहा अशा तीन शब्दांना सुटसुटीत पर्याय मुंबईतल्या चहा टपरीवाल्यांनी काढला असावा. पंजाब आणि उत्तर प्रदेशात दुधातच चहा पत्ती टाकून उकळतात. हैदराबादेत साखर एवढी घालायचे की चहाच्या ग्लासात चमचा उभा राह्यला पाह्यजे. त्याला खडा चम्मच चहा म्हणायचे. गुजराती, मारवाडी यांना मसाला घातल्याशिवाय दूध चालत नाही त्यामुळे चहाचाही मसाला त्यांनी तयार केला. मुंबईतील प्रकाश, पणशीकर ह्या अस्सल मराठी हॉटेलांमध्ये आजही मसाला दूध मिळतं. सत्तर वा ऐंशीच्या दशकात तिथे चहा-कॉफी मिळू लागली. उत्तर भारतीयांच्या कचोरी, समोसा, दही आणि दूध एवढेच पदार्थ मिळतात. दुधाला स्वाद देणारं पेय म्हणूनच भारतीय लोकांनी चहाला जवळ केलं.

१९८४ साली मी पहिल्यांदा ईशान्य भारतात गेलो होतो त्यावेळी आसामात चहाला सा म्हणायचे (आसामी भाषेत च नव्हता.) आता मात्र तिथेही चाय हा शब्द रुळला आहे. नागालँडमध्ये फिका चा प्यायचे. म्हणजे उकळत्या पाण्यात फक्त चहाची पत्ती टाकून पाणी गाळून घ्यायचं. दूध किंवा साखर टाकली की चहाची चव राहात नाही, असं ते म्हणायचे. आता नागालँडमध्ये सर्वत्र आपल्यासारखा दुधाचा चहा मिळतो. दूधाऐवजी ते व्हाईटनर अर्थात दूध पावडर वापरतात एवढाच फरक. भंडारा जिल्ह्यात नवेगाव बांधाच्या जवळ तिबेटी निर्वासितांचं गाव आहे. तिबेटी जिन्नसांची खरेदी करायला गावकर्‍यांचा एक गट दरसाल सिलीगुडीला जातो. बेगमीच्या जिन्नसांच्या यादीत चहाही असतो. तिबेट वा चीनमधली खास चहा पत्ती त्यांना हवी असते. चहात याकचं लोणी घुसळून केलेलं पेय त्यांच्या आवडीचं. चहा गरम तर हवा पण घुसळताही यायला हवा म्हणून एक खास थर्मासही तिबेटी लोकांसाठी बनवण्यात आलाय. हा तिबेटी चहा मला त्या नवेगाव बांधाजवळच्या तिबेटी गावातच चाखायला मिळाला. लोणी गायीच्या दुधाचं होतं. म्हणजे सिलीगुडीहून याकचं दूध वा लोणी आणत नाहीत एवढं कळलं. नमकीन चहा काश्मीरला पितात. दिल्लीतल्या दरयागंज भागात आप की पसंद या नावाचं एक चहाच दुकान होतं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळायचे. म्हणजे तुम्ही दार्जिलिंग आणि आसाम अशा दोन चहांची ऑर्डर दिली तर वासावरून समजायचं की दोन वेगळे चहा बनत आहेत. ग्रीन टी किंवा दूध वा साखरेशिवाय चहाच्या स्वादाची भारतीयांना ओळख होण्यासाठी एकविसावं शतक उजाडावं लागलं.  
भारतात चहा लागवडीचं श्रेय मणिराम दिवाण यांना जातं. त्यांचं मूळ नाव मणिराम दत्त बारुआ. अहोम राजदरबारात ते दिवाण होते. त्यांनीच रॉबर्ट ब्रूस आणि अलेक्झांडर ब्रूस या ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्‍यांना आसामातील जंगली चहाची झुडपं दाखवली (१८२३). सिंगफो या आदिवासी जमातीच्या प्रमुखांची भेट घडवून ब्रूस बंधूंना आसामातील चहाच्या झुडपांची माहिती दिली. या झुडुपांची नीट देखभाल करून अलेक्झांडर ब्रूस यांनी चहा लागवडीचं तंत्र विकसीत केलं. त्यापूर्वी चीनमधून चहाच्या बिया आणून त्यांची लागवड करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. मणिराम दिवाण हरहुन्नरी आणि कर्तबगार उद्योजक होते आणि उत्तम प्रशासकही होते. चहाच्या मळ्यांची लागवड करणारे ते पहिले आसामी उद्योजक. १८५७ च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल त्यांना फाशी देण्यात आलं. मणिराम दिवाण ह्यांचं चरित्र, चारित्र्य आणि कार्य यामधून त्यांच्या देशभक्तीचा, दूरदृष्टीचा आणि आसाम वा ईशान्य भारतातील राजकीय-सामाजिक प्रश्नांबद्दल असलेल्या त्यांच्या मर्मदृष्टीचा परिचय होतो.

ब्रह्मदेशातून होणार्‍या हल्ल्यांमुळे बंगालात स्थलांतरित झालेले मणिराम दिवाण, शांतता प्रस्थापित झाल्यावर आसामात परतले. बावीस वर्षांचे मणिराम दिवाण रंगपूरचे तहसीलदार आणि शिरस्तेदार म्हणून काम पाहू लागले. मणिराम दिवाणांचं कुटुंब मूळचं कनौजचं. सोळाव्या शतकात हे कायस्थ कुटुंब आसामात स्थलांतरित झालं. तेव्हापासून मणिराम यांच्या पूर्वजांना अहोम दरबारात स्थान होतं. आसामात परतल्यावर काही काळातच अहोम राजा पुरंदर सिंघाने त्यांना दरबारी सेवेत दाखल करून घेतलं. कंपनीने पुरंदरसिंघाला पदच्युत केल्यानंतर मणिराम कंपनीच्या सेवेतून बाहेर पडले.
भारतात चहाची लागवड करण्याचा निर्णय कंपनीने १८३३ साली घेतला. लॉर्ड बेंटिगने या संबंधात एक समिती स्थापन केली. या समितीने आसामला भेट दिली त्यावेळी अहोम राजा, पुरंदरसिंघाचा प्रतिनिधी म्हणून मणिराम दिवाण ह्यांनी चहा लागवडीसाठी आसामात भरपूर वाव असल्याचं समितीच्या निदर्शनास आणून दिलं. १८३९ साली स्थापन झालेल्या आसाम टी कंपनीचे दिवाण म्हणून मणिराम यांची नियुक्ती झाली. दरमहा २०० रुपये पगाराच्या नोकरीला मणिराम यांनी वर्षभरातच रामराम ठोकला आणि जोरहाट जिल्ह्यात चहाची लागवड सुरु केली. त्याशिवाय शिबसागर जिल्ह्यातही त्यांनी चहामळे उभारले. हातमाग, वीटभट्टी, कापड रंगवणे, हस्तीदंतावरील कारागीरी, हत्तींचा व्यापार, लष्कराच्या बराकी बांधण्याचं कंत्राट, दगडी कोळशाचा व्यापार असे अनेक उद्योग मणिराम ह्यांनी सुरु केले. आसाम टी कंपनीच्या मागोमाग अनेक कंपन्यांनी चहामळे फुलवायला सुरुवात केली. ह्या सर्व कंपन्या गोर्‍यांच्या होत्या. त्यांनी मणिरामना सतावायला सुरुवात केली. कंपनीच्या एका अधिकार्‍याने मणिरामच्या चहामळ्यावर जप्तीच आणली. मणिरामनी सदर कोर्टात याचिका दाखल केली. कंपनीची धोरणं आणि कारभारामुळे आसामी जनतेची स्थिती हलाखीची झाली आहे, आसामी लोकांची प्रतिष्ठा, मानसन्मान, पत, नोकरी, जात, धंदा यावरच या कारभाराने हल्ला केला केला. आसामचं शोषण करण्याच्या कंपनीच्या नीतीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप मणिरामनी या याचिकेत केला. आदिवासी, विशेषतः डोंगरातील आदिवासी (आसामात मैदानात वा खोर्‍यात राहणार्‍या आदिवासी जमातीही आहेत.) समूहांना वाईट वागणूक कंपनी सरकार देत आहे, याकडे मणिरामनी याचिकेत लक्ष वेधलं. कंपनी सरकारची कर-सारा पद्धती, अफूच्या लागवडीला उत्तेजन देण्याचं धोरण, मारवाडी आणि बंगाली लोकांचा कारभारातील आणि अर्थव्यवस्थेतील वाढता वरचष्मा, कामाख्या मंदिरातील सरकारी पूजा बंद करण्याचा निर्णय, अहोम राजांच्या प्रासादांची लूट, स्मारकांची हेळसांड असे मुद्देही मणिरामनी आपल्या याचिकेत मांडले आहेत. अहोम राज्यसंस्था आणि राज्यकारभाराची पुनःस्थापना करण्यात यावी, अशी मागणी मणिराम यांनी या याचिकेत केली. ही याचिका अर्थातच फेटाळण्यात आली.
मणिराम यांची ही याचिका म्हणजे आसामी राष्ट्रवादाचा ओनामा म्हणता येईल. अहोम, आसामी, हिंदू, मुस्लिम, शाक्त आणि वैष्णव पंथीय, आसामातील आदिवासी समूह यांच्या भाषा आणि संस्कृती ही आसामी राष्ट्रवादाची बैठक असावी असं या याचिकेद्वारे मणिराम यांनी स्पष्टपणे सुचवलं आहे.

अहोम राज्यसंस्था अर्थातच राजेशाहीची पुर्नस्थापना करण्यासाठी जमवाजमव करायला मणिराम कोलकात्याला गेले. अहोम राजाचा वंशज कंदरपेश्वर सिंघा याच्या वतीने त्यांनी त्यांनी तिथल्या न्यायालयात ६ मे १८५७ रोजी याचिका दाखल केली. २९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडेने ब्रिटीश सेनाधिकार्‍याला ठार मारून क्रांतीचं रणशिंग फुंकलं. त्यावेळी मंगल पांडेला आवरणार्‍या सैनिकावर बराकीतल्या अन्य सैनिकांनी दगडफेक केली होती. मंगल पांडेला निघून जाऊ दे अन्यथा आम्ही तुझ्यावर गोळ्या चालवू अशी धमकीही दिली. मात्र प्रत्यक्षात बंडाला सुरुवात झाली १० मे १८५७ रोजी. या बंडात आसामनेही उडी घ्यावी आणि ब्रिटीशांच्या विरोधात बंड करून अहोम राजवटीची स्थापना करावी, यासाठी मणिराम दिवाण यांनी हालचाली सुरु केल्या. कोलकता, दिब्रुगढ, गोलाघाट, सिबसागर, जोरहाट अशा विविध ठिकाणच्या विश्वासू साथीदारांना त्याने एकत्र आणण्यात त्यांना यश मिळालं. कंदरपेश्वर सिंघा या अहोम राजाचे विश्वासू साथीदार होते सुभेदार शेख भिकून आणि नूर मोहम्मद. त्याशिवाय अन्य दरबारीही सामील झाले. कोच राजबंशी, आसामी हिंदू, आसामी मुसलमान, अहोम असे विविध धार्मिक, भाषिक, वांशिक लोक या कटात सहभागी झाले होते. प्रथम जोरहाट ताब्यात घ्यायचं त्यानंतर दिब्रुगढ, सिबसागर हे जिल्हे मुक्त करायचे अशी रणनीती आखण्यात आली. ब्रिटीशांनी ब्रह्मी सैन्याच्या तावडीतून आसामची मुक्तता केल्याबद्दल मणिराम दिवाण यांनी बुरांजीमध्ये (आसामी तवारिख) असं लिहून ठेवलंय की अमरावतीच्या पुरंदराप्रमाणे ब्रिटीशांची संपत्ती आणि साम्राज्य वाढो. परंतु त्यानंतर मणिराम ही राजवट उलथून टाकण्यासाठी कटिबद्ध झाले. कोलकत्याहून मणिराम ह्या रणनीतीचं सूत्रसंचालन करत होते. परंतु ब्रिटीश पोलीसांना या कटाचा सुगावा लागला आणि अटकसत्र सुरु झालं. मणिराम दिवाण यांना कोलकत्यात अटक करण्यात आली. २६ फेब्रुवारी १८५८ रोजी त्यांना जाहीरपणे फाशी देण्यात आलं. त्याचे पडसाद आसामात उमटले. चहामळ्यातल्या शेकडो कामगारांनी बंद पाळला. लोकांचा असंतोष उफाळून आला. या आंदोलनाला ना नेता नव्हता की संघटना वा कार्यक्रम. त्यामुळे हा असंतोष सहजपणे चिरडण्यात आला.

ब्रिटीशांच्या आगमनापूर्वी आसामात बेबंदशाही माजली होती. शैव वा शाक्त आणि वैष्णव या दोन पंथांमधील संघर्षाने राज्य यंत्रणा खिळखिळी झाली होती. त्यातच ब्रह्मदेशातून होणार्‍या आक्रमणांमुळे अराजकसदृश्य स्थिती होती. कचार संस्थानचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये होतं ते  १८२६-२७ या काळात २० हजार रुपयांवर आलं. राजाची ही स्थिती असेल तर सामान्य जनांचे काय हाल असतील ह्याची कल्पना करता येते. ब्रह्मदेशातून होणार्‍या या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठीच अहोम राजाला ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला पाचारण करावं लागलं. कंपनीच्या सैन्याने ब्रह्मदेशातून होणार्‍या आक्रमणांचा पुरता बंदोबस्त केल्यानंतरच आसामात शांतता प्रस्थापित झाली. आणि पुढे लवकरच कंपनीने अहोम राजांना बरखास्त करून आसामवर आपला अंमल प्रस्थापित केला. अहोम राजांनी ६०० वर्षे आसामवर राज्य केलं होतं. ब्रह्मदेशातून होणार्‍या आक्रमणांचा बीमोड करण्याची आर्थिक आणि लष्करी बळ त्यांच्याकडे नव्हतं. ह्या काळात आसामातील गावं स्वयंपूर्ण नसली तरी आत्मनिर्भर होती. पोटापुरतं उत्पन्न शेतीतून मिळत होतं. मात्र वरकड उत्पादन वा उत्पन्न नव्हतं. अहोम राजवटीत शेतसारा नव्हता. शेतकर्‍यांनी वर्षातले काही महिने राजदरबारासाठी कष्ट विकायचे अशी प्रथा होती. ही प्रथा गुलामगिरी सदृश्यच होती. शेतसारा नसल्याने साम्राज्याच्या रक्षणासाठी कायमस्वरुपी फौज उभारण्यासाठी सरकारी खजिन्यात पैसाच नव्हता. त्यामुळे कंपनीला सहजपणे आसामात प्रवेश मिळाला.
 कंपनीचं राज्यात शेतसारा आणि कर लावण्यात आले. कारण या प्रचंड भूप्रदेशातून मिळणार्‍या उत्पन्नामध्ये ब्रिटीशांना रस होता. त्यावेळी आसाममध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध होती. ही जमीन एक तर पाणथळ होती किंवा मोठ्या प्रमाणावर अरण्यांनी व्यापलेली होती. फॉरेस्ट कायदा वा वनविधेयक आणून ब्रिटीशांनी वनसंपत्तीची लूट वा शोषण सुरु केलं. (महात्मा फुलेंनी शेतकर्‍य़ाचा असूड या ग्रंथात त्यावर कोरडे ओढले आहेत.) आसामात जंगल जमीन वहिताखाली आणण्याचं धोरण ब्रिटीशांनी अवलंबिलं. आसाम त्या काळात बंगालला जोडण्यात आला होता. मेमनसिंग, ढाका इत्यादी जिल्ह्यांमध्ये परिपत्रक काढून ब्रिटीशांनी शेतकर्‍यांना आसामात जमीन कसण्यासाठी येण्याचं आमंत्रण दिलं. जंगल जमीन वहिताखाली आणली तर एक वर्षासाठी शेतसारा माफ करण्यात आला. परिणामी आसामात परप्रांतीयांचा ओघ सुरु झाला. नेपाळी, बंगाली, संथाळ मोठ्या प्रमाणावर आसामात स्थलांतरित झाले. त्यांनी स्वतंत्र गावं वसवली. जंगल जमिनीवर चहामळ्यांनाही उत्तेजन देण्यात आलं. चहामळ्यांसाठी तर करमाफीची योजना होती. चहामळ्यांवर काम करायला मोठ्या प्रमाणावर मजूरांची गरज होती. त्यासाठी बिहार, ओडीशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, मद्रास या प्रांतातील दुष्काळप्रवण भागातून प्रचंड प्रमाणावर मजूरांची आयात करण्यात आली. १९३१ सालापर्यंत आसामातील परप्रांतीयांची संख्या १३ लाख झाली. त्यावेळच्या आसामच्या लोकसंख्येमध्ये हे प्रमाण १/६ होतं. जवळपास १५ लाख एकर जंगल जमीन लागवडीखाली आणण्यात आली. परप्रांतीय आसामातील वनसंपत्तीचं बेसुमार शोषण करत आहेत या विषयावर आसामच्या विधिमंडळात १९३७ सालीच घमासांग चर्चा झाली. लोकसंख्या वाढली, शेती वाढली त्यामागोमाग व्यापारही वाढला. चहा कारखान्यांची सर्व यंत्रसामुग्री इंग्लडातून आयात करण्यात आली होती. चहामळ्यातील कामगारांचा शिधा आणि अन्य साहित्याचा पुरवढाही कोलकत्यातून व्हायचा. हा व्यापार, त्यासाठी लागणारा पतपुरवठा यासाठी कोलकत्यातून मोठ्या प्रमाणावर मारवाडी समाज आसामात आला. चहामळ्यांवरील कार्यालयात काम करण्यासाठी इंग्रजी शिक्षित बंगाली आले. वसाहतवाद म्हणजे काय तर एका प्रदेशातील लोकांनी दुसर्‍या प्रदेशात जाऊन तिथली जमीन आणि अन्य नैसर्गिक संसाधनांवर मालकीहक्क स्थापित करणं आणि तेथील राज्ययंत्रणा ताब्यात घेणं. आसाममध्ये राज्ययंत्रणा ब्रिटीशांच्या ताब्यात होती पण वसाहती झाल्या त्या परप्रांतीयांच्या अर्थातच भारतीयांच्या, जमीनीवर मालकी प्रस्थापित झाली परप्रांतीयांची. जंगलावर मालकीहक्क मिळाला ब्रिटीशांना वा परप्रांतीय भारतीयांना. सरकारात अर्थात नोकरशाहीत वरचष्मा राहिला परप्रांतीयांचा. आसामातील उच्चवर्णीय हिंदू (ब्राह्मण, कायस्थ), अहोम यांचे हितसंबंध त्यामुळे दुखावले गेले. अहोम तर सत्तेबाहेरच फेकले गेले होते. त्यांच्याकडे जमीन वगळता अन्य संसाधनंही नव्हती. त्या जमीनीचीही लूट ब्रिटीशांनी केली. वसाहतवादाची सुरुवात जरी ब्रिटीशांनी केलेली असली तरी त्याचा चेहरा भारतीयच राहिला. मार्क्सवादी दृष्टीने आसामी समाजातील वर्ग विग्रहाचं विश्लेषण करून अहोम आणि उच्च जातीय हिंदू यांनी आपल्या हितसंबंधांसाठी आसाम आंदोलन सुरु केलं असा निष्कर्ष अनेक अभ्यासकांनी काढला आहे. पण आपणच आपल्या भूमीवर अल्पसंख्य होत आहोत ह्याचा आसामी जनतेला धक्का बसला होता हे नाकारण्यात अर्थ नाही. स्वातंत्र्योत्तर काळात विशेषतः १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर लाखोंच्या संख्येने बांग्ला देशातून आसामात निर्वासित आले. फक्रुद्दीन अली अहमद ह्यांनीही या स्थलांतराला उत्तेजन दिलं होतं. त्यामुळेच आसाम आंदोलनाची रुजवात झाली. ऑल आसाम स्टुडंन्टस् युनियनच्या पोटात युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामने जन्म घेतला. इंदिरा गोस्वामी यांच्यासारख्या ज्ञानपीठ विजेत्या लेखिकेलाही उल्फा या संघटनेबद्दल सहानुभूती होती, हे इथे ध्यानात घेतलं पाहीजे. आसाम आंदोलनात चहामळ्याचे कामगार सहभागी नाहीत असं मराठीमध्ये (दिनांक साप्ताहिक) सर्वप्रथम लिहिलं कुमार केतकरांनी. त्यांच्या लेखाचं शीर्षक होतं आसाम लढ्याचे पांगळे पाय. इंदिरा गांधी यांना सत्ताच्युत करण्याच्या अमेरिकेच्या जागतिक कारस्थानाचा एक भाग म्हणूनच कुमार केतकर आसाम आंदोलन वा देशातील कोणत्याही असंतोषाकडे पाहात होते. मणिराम दिवाण ह्यांच्या बलिदानानंतर म्हणजे १८५८ नंतर चहामळ्यातील कामगार स्वातंत्र्य आंदोलनातही सहभागी झाले नव्हते, होऊ शकले नव्हते ही बाब केतकरांनी मांडली नाही. कारण मग त्यांना आसाम प्रश्नाचं विश्लेषण आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाच्या चौकटीत करता आलं नसतं. असो.
आसामात पोटापुरती शेती केली जायची. चहामळ्यांमुळे शेती पुरवठाप्रधान होऊ लागली. औद्योगिकरण झालेलं नव्हतं पण लोकांच्या आशा-आकांक्षामध्ये वाढ झाली होती. नैसर्गिक साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसामातील विविध वांशिक गटांमध्ये रस्सीखेच सुरु झाली. आसामी-बांग्ला देशी, आसामी-बंगाली, आसामी-बोडो, आसामी-कोच राजबंशी असे संघर्ष निर्माण झाले. चहामळ्यातील कामगार प्रामुख्याने आदिवासी जमातींमधले आहेत. आपला समावेश अनुसूचित जाती-जमातींमध्ये करण्यात यावा यासाठी त्यांनी आंदोलन सुरु केलं. अर्थव्यवस्था जशी बदलू लागते तसे राजकीय-सामाजिक संघर्ष तीव्र होऊ लागतात. आता आसामातील शेती पुरवठा प्रधानतेकडून मागणीप्रधानतेकडे वाटचाल करू लागली आहे. २०११ साली तांदळाचं सर्वाधिक उत्पादन आसामात झालं. प्रणव मुखर्जींनी हरित क्रांती पूर्वेकडे नेण्याची घोषणा करून जी आर्थिक तरतूद २०११ सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली त्याचा हा परिणाम होता. ह्या वरकड उत्पादनामुळे शेती मागणीप्रधानतेकडे वेगाने वाटचाल करू लागेल. त्यातून अर्थातच नवे प्रश्न निर्माण होतीलच.
आसामातली जातिव्यवस्था बंगाल वा गंगा-यमुनेच्या खोर्‍यात असते तेवढी बंदीस्त नव्हती. अस्पृश्यता तर नव्हतीच. पण उर्वरित भारतातून लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्यानं जातिव्यवस्थाही आली. चहामळ्यांमध्ये तर अठरापगड जाती-जमातींचे लोक आले. त्यांचा पहिला संघर्ष आदिवासींशी झाला. बराक नदीच्या दक्षिणेकडील टेकड्या केवळ जंगलांनी व्यापलेल्या होत्या. लुशाई अर्थात मिझो जमाती तिथे शिकारीला यायच्या. पारंपारिक अर्थाने या टेकड्यांवरील जंगल त्यांच्यासाठी राखीव होतं. चहामळ्यांसाठी जंगल साफ करायला सुरुवात झाल्याने मिझो संतापले. त्यांनी वसाहतवाद्यांवर म्हणजे अर्थातच चहामळ्यांच्या कामगारांवर हल्ले सुरु केले. पुढे पोलिसांची राखीव कुमक मागवून त्यांचा बंदोबस्त करण्यात आला. इनर लाइन परमिट अर्थात टेकड्यांवरील जंगलात जायचं तर परवाना पद्धत सक्तीची करून ब्रिटीशांनी आदिवासींना मुख्य प्रवाहापासून तोडूनच टाकलं.         
चहामळ्यामध्ये जातिव्यवस्था पाळली जाते. उच्चवर्णीय कामगारब्राह्मण, भूमिहार, राजपूत आपली आडनावंतिवारी, चौबे, राय, सिंग, अभिमानाने मिरवतात. अनेक ठिकाणी ब्राह्मण घरी आला तर त्याचे पाय तीन वेळा धुण्याची प्रथा आहे. ते पवित्र पाणी आपल्या अंगावर शिंपडून स्वतःलाही शुद्ध करण्याचा विधी पाळला जातो. दुशाद, बावरी, कालिंदी, रविदास या जातींच्या व्यक्तिंचा स्पर्श झालेलं पाणी अन्य जातींनाग्वाला (गवळी), कोयरी, कुरमी, राजपूत यांना चालत नाही. एक गाव, एक पाणवठा चहामळ्यांमध्ये नाही. चहामळ्यांमध्ये असलेला पाणक्या पूर्वास्पृश्य जातींचा चालत नाही. गवळी, कोयरी, कुर्मी, बरोई यांच्या हातचं पाणी सर्वांना चालतं त्यामुळे पाणक्या अर्थात मजूरांना पाणी देणारा या जातींचा असतो. धोब्याकडे शिजवलेलं अन्न रविदास खात नाहीत. धोबीही रविदासांच्या घरी जेवत नाहीत. मुंडाच्या घरात संथाळ जेवत नाहीत. प्रत्येक जातीची पंचायत आहे. आंतरजातीय विवाह केल्यास जात पंचायती दंड ठोठावतात. शिक्षणाचं प्रमाण कमी त्यातही गळतीचं प्रमाण अधिक आहे. भुवन व्हॅली टी इस्टेटमध्ये २०११ सालात दारिद्र्याने १५ कामगार मृत्युमुखी पडले. कुपोषण आणि वैद्यकीय मदतीचा अभाव ही त्याची कारण आहेत असं आसाम टाईम्स या वर्तमानपत्राने म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमलीय. स्वातंत्र्यपूर्व काळात युरोपियनांच्या मालकीचे चहामळे असताना या कामगारांची स्थिती अतिशय शोचनीय होती. त्यांना कोंडवाड्यात बंदच करून ठेवलं होतं. अजूनही त्यांच्यातील शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं नाही. चहामळ्यातील कामगारांच्या वस्त्यांना भेट दिल्यावर व्ही. एस. नॉयपॉल अतिशय व्यथित झाले. त्यांचे पूर्वज वेस्ट इंडीजमधल्या मळ्यांवर काम करण्यासाठी भारतातून स्थलांतरित झालेले असल्याने नॉयपॉल ह्यांना या कामगारांबद्दल विशेष ममत्व होतं. चहामळ्यांवर आता जरी भारतींयाची मालकी असली तरिही कामगारांच्या जीवनात फारसा बदल झालेला नाही. भारतातल्या जातिव्यवस्थेने कामगार आणि मालक यांना आपल्यात सामावून घेतलं आहे. कामगार आणि चहामळ्यांचे मालक-संचालक अशा दोन जातीच आहेत. कामगार कुटुंब वा जातिमध्ये बंदिस्त तर मालक-संचालक आपल्या क्लबांमध्ये दंग. मालक-संचालकांनी आपल्या पूर्वसुरींचं अर्थात ब्रिटीशांचं अनुकरण केलं आहे. केवळ शर्ट, शॉर्ट एवढ्यापुरतंच नाहीतर त्यांचे आत्मेही ब्रिटीशांचेच असावेत. बहुसंख्य कामगार निरक्षर, दारूच्या आहारी गेलेले, परंपरा हरवलेले, अनेक समूह तर स्वतःची भाषाही गमावून बसले आहेत. हे सर्व वेस्ट इंडीजमध्येही पाह्यला मिळतं. ह्यांची स्वतंत्र गावं नाहीत तर इस्टेटीच्या वळचणीला उभ्या राह्यलेल्या वस्त्या आहेत, असं व्ही. एस. नॉयपॉल ह्यांनी नोंदवलं आहे.

चहा कामगार आपल्या सांस्कतिक परंपरा गमावून बसले आहेत हे नॉयपॉल ह्यांचं म्हणणं कामगारच स्वीकारणार नाहीत. चहामळ्यांतील कामगारांमध्ये केवट, मल्लाह हे गंगापूजन करणारे, नागपूजा बंगालातून आली. ओरॉन चंद्रपूजक, मल्लाह नौकापूजनही करतात. रामनवमी, फागुआ, अक्षय तृतिया, दसरा, कालीपूजा, दुर्गापूजा, दिवाळी, होळी, जन्माष्टमी इत्यादी अनेक गंगाखोर्‍यातले सण आसामात साजरे होऊ लागले. बिहू हा आसामचा राष्ट्रीय सण. देशातच नव्हे तर जगभरात जिथे असतील तिथे आसामी लोक बिहू साजरा करतात. चहामळ्यातल्या कामगारांमध्ये आदिवासींची संख्या मोठी असल्याने चहामळ्याच्या कामगार वस्ती वा गावांमध्ये एक नाचघर असतंच. नृत्य आणि गाणं ह्याशिवाय कोणताही सण साजरा होत नाही. चहामळ्यातील कामगारांच्या गाण्यांनी हिंदी चित्रपट संगीतालाही योगदान दिलं आहे. सलील चौधरींचा पिंड चहामळ्यातील कामगारांच्या संगीतावरच पोसला गेला होता. भूपेन हजारिका यांनी तर बंगाली, आसामी, चहामळ्यातील कामगार, ईशान्य भारतातील आदिवासी ह्यांच्या लोकसंगीतातून अनेक धुन आणि ताल उचलले आणि भारतीय संगीत समृद्ध केलं.
एक कली दो पत्तीयाँ
नाजूक नाजूक उँगलियाँ
तोड रही रतनपूर बागिचे में.....
या गुलजार यांच्या गीताला भूपेन हजारिका ह्यांनी दिलेलं संगीत त्याची उत्तम साक्ष आहे.
दोन पान आणि एक पानकळी नाजूकपणेच खुडावी लागते. त्याचा संबंध चहाच्या चवीशी असतो. अशी खुडलेली पानं लगोलग फॅक्टरीमध्ये प्रक्रियेसाठी रवाना केली जातात. सच्छिद्र सिलींडरमध्ये ही पानं गरम हवेच्या झोतात सुकवली जातात. त्यानंतर फिरत्या पृष्ठभागावर वाटली जातात. त्यानंतर दळली जातात. सुकवून पुन्हा दळून गाळली जातात. अखेरीला त्यांच्यावर स्वाद प्रक्रिया करण्यात येते. चहाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. ग्रीन टी आणि ब्लॅक टी. ग्रीन टी बनवण्याच्या प्रक्रियेत पानांचं फर्मेंटेशन करत नाहीत. ब्लॅक टी मध्ये दोन उपप्रकार आहेत. ऑर्थोडॉक्स टी. ह्यामध्ये चहाची पानं असतात. तर सीटीसी (क्रशिंग, टिअरिंग, कर्लिंग) म्हणजे चिरडून, फाडून, वळवलेली पानं. प्रतिकारशक्ती वाढवणं, रक्तदाब संतुलित ठेवणं, हृदयविकारांवर आणि वजन कमी करण्यासाठी चहा गुणकारी आहे.  प्रत्येक प्रकारच्या चहाचे गुणधर्म, चव आणि स्वाद यामध्ये फरक असतो. देशाच्या राष्ट्रीय पेयाचा मान चहाला देण्यात यावा अशी मागणी अलीकडे जोर करू लागली आहे. चीन आणि इंग्लड या दोन देशांनी चहाला राष्ट्रीय पेयाचा दर्जा दिला आहे. पाकिस्तानचं राष्ट्रीय पेय उसाचा रस आहे तर स्कॉटलंडने व्हिस्कीला हा दर्जा दिला आहे. जागतिक उत्पादनात आसामातील चहाचा वाटा १३ टक्के आहे तर भारतातील ५१ टक्के उत्पादन आसामात होतं. आसामच्या चहा उद्योगाची वार्षिक उलाढाल ५००० कोटींची आहे. पाच लाख कामगारांना कायमस्वरुपी तर पाच लाखांना हंगामी रोजगार आसामचा चहा उद्योगामुळे मिळतो. अखिल भारतीय पातळीवर हा आकडा अर्थातच दहा लाखांच्या घरात आहे. चहा हा केवळ एक जिन्नस वा उत्पादन नाही. चहा ही एक संस्कृती आहे. म्हणून चहाला राष्ट्रीय पेयाचा दर्जा द्यावा अशी मागणी आसामातील चहामळ्यांच्या संघटनांनी केली आहे. योजना आयोगाचे उपाध्यक्ष, माँटेकसिंग अहलुवालिया यांनी मागच्या महिन्यातच या मागणीला पाठिंबा दिला आहे. चहाला राष्ट्रीय पेयाचा दर्जा मिळाला तर त्याचा संबंध भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याशी, त्यामध्ये फासावर गेलेल्या देशभक्ताशी आणि भारतीय चहाचा शोध लावणार्‍या मणिराम दिवाण यांच्याशी आहे.