Monday, 8 April 2013

....तोवर राज ठाकरे आपली करमणूक करत आहेतच की

राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. या दौर्‍यामध्ये राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी नेत्यांनाकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, यांना लक्ष्य केलं आहे. मात्र या या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांवरउदा. सोनिया गांधी, राहूल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, यांच्यावर टीका केलेली नाही.
  उत्तर भारतीयबिहारी वा उत्तर प्रदेशी, यांच्यावरील टीकेची धार बोथट केलेली नाही परंतु त्यांच्यासंबंधातील शत्रूलक्ष्यी मांडणीवरचा भर कमी केला आहे. भाषणामध्ये फारच थोडा वेळ त्यांनी या विषयाला दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्तुतीही त्यांनी केली. नरेंद्र मोदीचं कौतुक करताना, ते देशाचे पंतप्रधान बनावेत अशी अपेक्षा वा इच्छा व्यक्त केलेली नाही.
   भाषणांमध्ये राज ठाकरे यांनी मतदारांना संबोधित करताना कायदा हातात घेण्याचं आवाहन त्यांनी कधीही केलेलं नाही. हे करणार्‍या म.न.से.च्या आमदारांवरही त्यांनी सडकून टीका केली. जात वा धर्म या अस्मितांना गोंजारलेलं नाही. मराठी भाषा याहीपेक्षा महाराष्ट्राची अस्मिता यावरच फोकस ठेवला आहे. राज ठाकरे हाच पर्याय आहे, मी मुख्यमंत्री बनल्यावरच राज्याचा गाडा वळणावर येईल, ह्यावर त्यांच्या प्रत्येक भाषणाचा रोख आहे.
   महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज ठाकरे यांचा पक्ष नवा आहे. संघटनेची राज्यव्यापी बांधणी झालेली नाही. राज यांनी संघटना बांधणीपेक्षा थेटपणे मतदारांशी संवाद साधण्याला प्राधान्य दिलं आहे. आपल्या करिष्म्याच्या जोरावरच हा पक्ष चालेल याची पक्की खूणगाठ राज ठाकरे यांनी बांधली आहे. असा करिष्मा निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. करिष्मा जरी निर्माण झालेला नसला तरिही जननेता म्हणून राज ठाकरे या दौर्‍यातून पुढे येऊ लागले आहेत. तरुण वर्गाचा त्यांना सर्वाधिक पाठिंबा मिळतो आहे. कोणत्याही राजकीय पक्षात राज्य पातळीवरील जननेता नाही ही त्यांची मोठीच जमेची बाजू आहे.
   अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतीलही पण जननेते नाहीत. त्यांचं वक्तृत्व केवळ पक्ष कार्यकर्त्यांसाठीच असतं. तीच गत उद्धव ठाकरे यांचीही आहे. गोपिनाथ मुंडे हे एकेकाळी जननेते होते. परंतु शरद पवारांवरील टीकेची धार त्यांनी कमी केली आणि त्यांनी ते स्थान गमावलं. छगन भुजबळ यांनी तर अधिकृतपणे मागासवर्गीयांच्या राजकारणाची कास धरली आहे. काँग्रेस पक्षाचा भर सोनिया-राहुल-प्रियांका यांच्याच व्यक्तिमहात्म्यावर आहे. त्यामुळे त्या पक्षात राज्य पातळीवरील जननेत्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. शरद पवारांचा भर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर आहे. संभाजी ब्रिगेड आणि तत्सम मराठा संघटनांच्या आरक्षणाच्या मागणीसंबंधात अनुकूल भूमिका घेऊन पवारांनी आपल्या पक्षाचा सामाजिक पाया मराठा-कुणबी हा समूह असेल असाच मेसेज आपल्या केडरला दिला आहे. मात्र मराठा-कुणबी जातिसमूहाने ओबीसी, दलित यांच्याशीही प्रयत्नपूर्वक जोडून घेतलं पाहीजे ह्यावरही त्यांनी भर दिला आहे. परंतु ते आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाहीत. त्यामुळे राज ठाकरे त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही.
निवडणुकीच्या राजकारणाच्या गणितांचा म्हणजेच मतदानाचा विचार करता, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना-भाजप-आरपीआय युती ह्यांच्या स्पर्धेत मनसे किती पुढे सरकू शकेल ह्यासंबंधात भाकीत सोडाच पण अंदाजही या घडीला बांधता येणार नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर मनसे राज्याची सत्ता मिळवू शकणार नाही हे निश्चितपणे म्हणता येईल. राज ठाकरे आणि मनसे, राज्याच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण करतील तेव्हाच काँग्रेस आघाडी की सेना-भाजप-आरपीआय युती यातली निवड मनसे करू शकेल. असं स्थान निर्माण करायचं तर पक्षाला सामाजिक आधार निर्माण करावा लागेलच. सर्व जातीपातींमधला युयुत्सू तरूण अशा काहीशा भुसभुशीत पायावर सध्या तरी मनसेचं राजकारण उभं आहे. परंतु हा पाया पुढे-मागे भक्कम होऊ शकतो. तोच राज यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष या नावामध्येच हा पक्ष राज्य पातळीवरीलच पक्ष आहे हे पुरेसं स्पष्ट होतं. ह्या पक्षाची आकांक्षा राज्याची सत्ता ताब्यात घेणं ही आहे, हे ही सूचित होतं. त्यामुळेच कोणत्याही पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत राज ठाकरे यांनी टीका केलेली नाही.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जरी प्रादेशिक पक्ष म्हणून गणले जात असले तरिही त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील राजकीय आकांक्षा उघड आहेत. बाबरी मशीद पाडणार्‍या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, हे बाळासाहेब ठाकरे यांचे उद्‍गार प्रसिद्धच आहेत. सोनिया गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देऊन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवार धावू लागले होते. त्या तुलनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं वेगळेपण ध्यानी घेतलं पाहीजे. मराठी वा महाराष्ट्रीयन या अस्मितेवर आधारित राजकारण उभं करणं आणि या अस्मितेला छेद देणार्‍या जातीय आणि वर्गीय संघर्षाला नियंत्रणात ठेवणं, राज ठाकरे यांना जमू शकेल काय? ह्याचं उत्तर येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये मतदारच देतील. तोवर राज ठाकरे आपली करमणूक करत आहेतच की......

1 comment:

  1. तुझी निरिक्षणं नेमकी आणि अर्थपूर्ण आहेत. त्यामुळे तुझ्या अनुमानांना वजन प्राप्‍त होतं. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुझं वाचल्यावर चष्म्याचा नंबर सापडल्यासारखं जास्त स्पष्ट दिसू लागतं.
    पुढच्या पोस्टची वाट पहातो.

    ReplyDelete