किती तरी वर्षं झाली. मुंबई ते पाटणा असा प्रवास मी केला होता. खामगाव ते पाटणा ट्रकने.
खिशात पैसे नव्हते. त्यामुळे वाटेत पडेल ती कामं करायची, ट्रकवाल्यांची स्केचेस करायची, कधी क्लीनरचं काम करायचं. असं करत काही महिन्यांनी मी पाटण्याला पोचलो.
एका ट्रकवाल्याने माकडाचं एक अनाथ पिल्लू दत्तक घेतलं होतं. छोटसं होतं. त्याच्यासाठी तो ट्रकवाला हाच आई होता. त्यामुळे ट्रक चालवतानाही ते त्याच्या डोक्यावर बसून राह्यचं.
उन्हाने जीव नकोसा व्हायचा मे-जून महिन्यात. अशावेळी भर दुपारी ट्रक थांबायचा एखाद्या तलावाच्या काठी. तिथे जलक्रिडा करून फ्रेश व्हायचो. ड्रायव्हरच्या बंडीमध्ये कॅश असायची. त्यामुळे तो तलावाच्या दुसर्या टोकाला पाण्यात उतरायचा. त्यावेळी क्रेडीट-डेबीट कार्ड नव्हती.
कोहमारा नावाचं गाव आहे महाराष्ट्र-छत्तीसगड (त्यावेळी मध्य प्रदेश) सीमेवर. तिथे एक नदी होती. दुसर्या राज्यात प्रवेश करायचा परवाना यायचा होता त्यामुळे आमचा तिथला मुक्काम लांबला. चारपायीवर नाश्ता-जेवण-जलपान-जेवण, नदीमध्ये आंघोळ, मासे पकडायचे, स्केचेस काढायची. हिंदी-पंजाबी-मराठी अशा भाषांमध्ये शिवीगाळ, बाचाबाची.
अनेक ट्रकवाल्यांना बद्धकोष्ठाचा आजार होता. कारण डोडा पिऊन ट्रक चालवायचे. डोडा म्हणजे अफूच्या बोंडाचं चूर्ण. डोडा चहातून किंवा पाण्यातून प्यायचा. त्यामुळे झोप येत नाही म्हणतात. अजूनही छत्तीसगडच्या हायवेवर यहाँ डोडा मिलता हैं. अशा पाट्या दिसतात. गांजा की दुकान अशा घोषणा मातीने लिंपलेल्या घरावर रंगवलेल्या असायच्या.
पंजाबी ट्रकवाल्यांना दुधाची कडक-मिठी चाय पसंत असायची. तूरडाळ गरीबीचं लक्षण समजली जायची. उडद-चना हीच डाळ त्या रस्त्यावर मिळायची. पार टाटानगरपर्यंत. डाळीमध्ये अंड फोडून नंतर तडका द्यायचा. कोणत्याही भाजीवर मलई हवीच. मैद्याची रोटी कोणत्याही धाब्यावर नव्हती. जवळपास प्रत्येक ढाब्यावर कोंबड्या पाळलेल्या असायच्या. कारण त्यावेळी पोल्ट्री व्यवसाय फोफावलेला नव्हता. देसी मुर्गी, देसी घी मध्ये पकवण्याची ऑर्डर दिली जायची. दोन ड्रायव्हर असतील तर दिवसपाळीचा ड्रायव्हर रात्री एक ग्लास दूध पिऊन ताणून द्यायचा.
भयंकर पुरुषी वातावरण असायचं हायवेवर. उर्मट, बेदरकार भाषा. वेश्या आणि ढाब्यावर काम करणार्या वा भिकारी बाया सोडल्या तर ढाब्यावर जेवणारी एकही स्त्री मी पाह्यली नव्हती.
बिहारमध्ये लुटारूंच्या टोळ्या असायच्या. म्हणून दहा-पंधरा ट्रक लष्करी शिस्तीने एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून जायचे. लुटारूंनीही लष्करी शिस्त आत्मसात केली. चार टोळ्या एकत्र झाल्या आणि १२ ट्रक लुटले.
शॉर्ट ट्रीपा मारणारे ड्रायव्हर चार-सहा दिवस झोपत नाहीत. कारण जेवढ्या फेर्या तेवढे पैसे मिळतात. मालाचं लोडिंग आणि अनलोडिंग करताना बसल्या जागी डुलक्या घ्यायच्या. हीच झोप. काही महिन्यांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एका टेंपोने १७ माणसांचे बळी घेतले. त्या टेंपोचा ड्रायव्हर सहा का दहा दिवस झोपला नव्हता.
आपल्याकडच्या व्यवस्था कमालीची दडपणूक करणार्य़ा आहेत. त्यामुळे हायवेवर पुरुषी, रासवट संस्कृती आकार घेते. अर्थात अलीकडे बदलली असेल कदाचित. ढाब्यांची आता गार्डन रेस्टॉरंट झाली आहेत. ट्रकांपेक्षा तिथे चारचाकी, दुचाकींची संख्या अधिक असते.
No comments:
Post a Comment