Thursday, 31 December 2009

सुरमा नदीच्या अलिकडले आणि पलिकडे........

ब्रह्मपुत्रा नदी हिमालयाच्या निर्मितीच्याही आधीपासूनची आहे, असं विकिपिडीयात म्हटलंय. हिमालयाची निर्मिती व्हायला सुरुवात झाली वायव्य दिशेकडून म्हणूनच तिथे त्याची उंची सर्वाधिक आहे. ईशान्येकडचा हिमालय हा तुलनेने नवा समजला जातो. त्यामुळेच ईशान्येकडच्या राज्यांमधल्या टेकड्या ठिसूळ आहेत, असं बेदब्रत लोहकर या आसाम ट्रिब्यूनच्या सहसंपादकाने सांगितलं. अरुणाचल प्रदेशातल्या नद्यांवर धरणं बांधून वीज निर्मिती करण्यातला धोका नेमका तोच आहे. आधीच ईशान्य भारत हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे त्यात ठिसूळ टेकड्या, तिथे धरण फुटलं तर आसामला पुराचा धोका आहे, असं त्याचं म्हणणं होतं.
ब्रह्मपुत्रा नदी आसामात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्वेकडचा प्रदेश अधिक उंचीवर आहे. त्यालाच म्हणतात वरचा आसाम (अप्पर आसाम) तर पश्चिमेकडच्या प्रदेशाला म्हणतात खालचा आसाम (लोअर आसाम). दिब्रुगढ, तिनसुखिया, सिबसागर, जोरहाट, गोलघाट, नागाव, लखीमपुर हे आणि इतर जिल्हे वरच्या आसामात येतात तर कोक्राझार, बोंगाईगाव, गोलपारा, दरांग, कामरुप, नलबारी, बारपेटा हे जिल्हे खालच्या आसामात येतात.

कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, चहामळे वरच्या आसामात आहेत. अर्थातच वरचा आसाम अधिक विकसीत आहे. आसामवर ६०० वर्षं राज्य करणार्‍या अहोम घराण्याची राजधानी सिबसागरला वरच्या आसामात होती. गोहाटी कामरूप जिल्ह्यात आहे. म्हणजे लोअर आसाममध्ये.

आसामी कोण हा प्रश्न आसामात अजूनही समाधानकारकरित्या सुटलेला नाही. आसामच्या पश्चिमेला म्हणजे मानस नदीच्या किनार्‍याला बोडो ही जमात बहुसंख्येने आहे. स्वतंत्र बोडोलँडची मागणी याच प्रदेशातून झाली होती. त्याशिवाय आसामात मैदानी प्रदेशातील आदिवासी जमातीही आहेत, उदा. तिवा, लालुंग, मिशी वगैरे. जवळपास प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र बोली वा भाषा आहे. आदिवासी आणि नागर वा ग्रामीण अशी ढोबळ विभागणी केली तर अहोम, आसामी, बंगाली हे दुसर्‍या कोटीत—नागर वा ग्रामीण, येतात.

आम्ही शिलाँगला गेलो होतो माझ्या मित्राच्या—अभिजीत देब, लग्नाला. तो बंगाली. म्हणजे त्याचे वडील पूर्व बंगालातून येऊन शिलाँगमध्ये स्थायिक झाले. शिलाँगला लबान या भागात बंगाल्यांचीच वस्ती आहे. लग्नासाठी त्याचे अनेक नातेवाईक सिल्चरहून आले होते. सिल्चर म्हणजे बराक खोर्‍याची राजधानी. मणिपूर आणि सध्याचा बांगला देश यांच्यामध्ये एक चिचोंळी पट्टी आहे. हेच बराक खोरं. बराक नदी आसाम-मणिपूरच्या सीमेवर उगम पावते आणि मिझोराममधून आसामच्या मैदानात येते. सिल्चरला तिला दोन फाटे फुटतात--सुरमा आणि कुसिवारा, दोन्ही प्रवाह पुढे बांगला देशात गेल्यावर ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळतात. बराक खोर्‍याच्या उत्तरेला असणार्‍या टेकड्यांवर कचार या आदिवासी जमातीचं राज्य होतं. म्हणजे अहोम राजांनी आसामवर ६०० वर्षं राज्य केलेलं असलं तरीही बराक खोर्‍यावर बंगाल्यांचंच वर्चस्व होतं. आसामची राजभाषा आसामी आहे पण बराक खोर्‍यातल्या जिल्ह्यांचा कारभार बंगाली भाषेत चालतो. आसाममध्ये होणारी बांग्लादेशीयांची घुसखोरी याच बराक खोर्‍यातून होते. नदी पार केली दुरर्‍या देशात सहजपणे पोचता येतं.

आसामात चहामळ्यांची लागवड सुरु झाली ती वरच्या आसामात. चहामळ्यांमध्ये गुंतवणूक केली ब्रिटीशांनी. त्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने जमीन संपादन, जमीन मालकीचे कायदे केले आणि चहामळ्यांना प्रोत्साहन दिलं. चहाच्या उत्पादनातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आसामात चहाची लागवड करण्याचा निर्णय ईस्ट इंडिया कंपनीने घेतला. चहामळ्यांची जमीन तयार करणं आणि इतर कामांसाठी झारखंड, छत्तीसगड, उडीसा या प्रांतांतून त्यावेळी आदिवासींना अक्षरशः वेठबिगार म्हणून पकडून आणण्यात आलं आणि गुलामासारखं राबवण्यात आलं. चहामळ्यात काम करण्यासाठी लाखोंच्या संख्येने मजूर आयात करण्यात आले त्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्याकरता बंगाली शेतकर्‍यांना आसामातील जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं. पूर्व बंगालातील बहुसंख्य मुस्लिम आसामात शेती करू लागले. त्यांची स्वतंत्र गावंच वसवण्यात आली. नेल्ली आणि त्या परिसरातील गावं अशीच वसली. बांगला देशी निर्वासितांच्या संख्येत सत्तरच्या दशकात कित्येक पटींनी वाढ झाली.
मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश ही राज्य १९५० सालापर्यंत आसामातच होती. त्यानंतर हळू हळू त्यांना आसामातून वेगळं काढण्यात आलं. राज्याचं संकुचन झालं, औद्योगिक विकासाची गती अतिशय मंद, विविध भाषिक आणि वांशिक गट, त्यात धर्मांच्या विविधतेची भर, शेतीवर अवलंबून असलेली म्हणजे जेमतेम पोटापुरतं पिकवणारी अर्थव्यवस्था. काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात मध्यममार्गापासून फारकत घेत सत्तेवरील पकड घट्ट केल्यामुळे उजव्या आणि डाव्या अतिरेकी संघटना भारतात फोफावल्या. ऐंशीच्या दशकात आसाममधील विद्यार्थी आंदोलन म्हणूनच पेटलं. दडपशाही केल्यामुळे आंदोलन चिघळलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून जसं शिवसेना नावाचं भूत मुंबईच्या (त्यानंतर महाराष्ट्राच्या) मानगुटीला बसलं तसंच आसाम आंदोलनातच उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) ची मूळं रोवली गेली.

आसामातील आदिवासींच्या वाट्याला आता स्वायत्त मंडळं आली आहेत. आदिवासींना त्यांच्या प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांवर काहीप्रमाणात अधिकार मिळाला आहे. त्यामुळे स्वतंत्र बोडोलँडच्या मागणीला शांत करता आलं. परंतु आता कोच राजबंशी आणि कचारी हे समूह स्वतंत्र राज्याची मागणी करू लागले आहेत. जग जवळ येतंय, जगाची बाजारपेठ एक होतेय पण आपण मात्र राजकीयदृष्ट्या विखंडीत होऊ लागलो आहोत.

Tuesday, 29 December 2009

नेल्ली

शिलाँगहून काझीरंगाला मोटारीने जात होतो. गुगुल मॅपवर नेल्ली हे गाव उमटलं.
१९८३ सालच्या फेब्रुवारी महिन्यात नेल्लीचं हत्त्याकांड घडलं. या हत्त्याकांडाचा निषेध करण्यासाठी मुंबईत गिरगाव चौपाटीला अनेक राजकीय पक्ष आणि संघटना यांनी एक दिवसाचं उपोषण केलं. माधव साठे या कार्यक्रमाच्या आयोजकांमध्ये होता. त्या उपोषणात मी आणि विजय (माझा चुलतभाऊ) सहभागी झालो होतो. अनेक पक्षांनी आसाममधील परदेशी (म्हणजे बांगला देशी) स्थलांतरितांसंबंधात आपआपल्या भूमिका मांडल्या. त्यावेळी टेलिव्हिजन बातम्यांसाठी कुणी बघायचं नाही. वृत्तपत्रं, साप्ताहिकं राजकीय-आर्थिक-सामाजिक प्रश्नांवर भरपूर लिखाण प्रसिद्ध करत असत. रुपा चिनाय त्यावेळी संडे ऑब्झर्वरमध्ये आसाम आंदोलनावर वृत्तांत लिहित असे. अरुण शौरी बहुधा इंडिया टुडेमध्ये होता. आसाम आंदोलन विशेषतः नेल्ली हत्याकांडावर त्याने लिहिलेले वृत्तांत शोध पत्रकाकारिता म्हणून गणले गेले होते. वातावरण काँग्रेस म्हणजे इंदिरा गांधींच्या विरोधात तापत होतं. कुमार केतकरने ईशान्येचा भारताशी काडीमोड अशी लेखमाला दिनांक साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध करायला सुरुवात केली होती. आसाम लढ्याचे पांगळे पाय या शीर्षकाचा लेख कुमारने लिहिला होता. ऑल आसाम स्टुडन्ट युनियन (आसू)च्या विरोधात कुमारने आपली लेखणी परजली होती. आसाम आंदोलनात चहामळ्यात काम करणारे कामगार सहभागी नाहीत, अशा आशयाची मांडणी त्याने या लेखात केली होती.
१९८३ च्या फेब्रुवारी महिन्यात आसामात विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. आसूने या निवडणुकांना विरोध केला. बेकायदेशीररित्या आसामात स्थायिक झालेल्या बांगला देशी नागरिकांची नावं मतदारयादीतून काढल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी आसू आणि आसाम आंदोलकांची मागणी होती. राष्ट्रपती राजवट वाढवायची झाल्यास घटनादुरुस्ती करावी लागेल आणि त्यामुळे निवडणुका कोणत्याही परिस्थितीत घेतल्या जातील, अशी निर्णय त्यावेळच्या पंतप्रधान, इंदिरा गांधी यांनी जाहीर केला होता. या निवडणुकांमुळे आसामात हिंसाचार उफाळून आला. निवडणुक काळात आसूचे ५०० च्या वर कार्यकर्ते ठार झाले. नागाव जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला मतदान झालं. बांगला देशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं अशी कुजबूज आणि त्यानंतर चर्चा आसामी लोकांमध्ये सुरु झाली. रातोरात वातावरण तापलं. ढोल बडवत हजारो लोक (पोलिसांच्या शब्दांत आसामी) नेल्ली गावावर चालून गेले. तिथल्या ठाणेदाराने नागाव पोलिसठाण्याला तार केली, तात्काळ मदत पाठवा. पण नागावहून पोलिसांची कुमक रवाना झाली नाही. १८ फेब्रुवारीला हजारो लोकांनी १४ गावांवर हल्ला चढवला. केवळ सहा तासात हजारो लोकांना ठार केलं. भाले, तलवारी, कोयते, काठ्या-लाठ्या या हत्यारांनी. घर पेटवली. मृतांचा आकडा नेमका किती हे अजूनही कळलेलं नाही. काहिंच्या मते २१९१ तर दिगंत शर्मा याने आपल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे १८१९ आणि तहलकाच्या ताज्या अंकानुसार ३३००. अर्थात नेल्ली आणि परिसरातले लोक तर पाच हजार लोकांचं शिरकाण करण्यात आल्याचं सांगतात. मृतांमध्ये बहुसंख्येने लहान मुलं आणि बायकांचा समावेश होता. ही सर्व गावं मुसलमानांची आहेत. मृतांच्या नातेवाईकांना पाच हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली तर जखमींना दीड हजार रूपये.
या हत्याकांडाला जबाबदार कोण याचा उलगडा अजूनपर्यंत झालेला नाही. निवडणूक लादणारं केंद्रसरकार की आंदोलक, आंदोलनातील रा.स्व.संघाच्या जवळचे लोक, की आणखी कोण. असं म्हणतात की आसूच्या कार्यकर्त्यांनी तिवा जमातीच्या लोकांना मुसलमानांच्या विरोधात चिथावणी दिली. तिवा जमातीची अनेक गावं नागावमध्ये नेल्ली परिसरात आहेत. त्यांचा कारभार स्वायत्त जिल्हा मंडळांमार्फत चालवला जातो. आसाममध्ये विविध वंशांचे, धर्मांचे, प्रांतातले, जमातीचे, जातींचे, विविध भाषा बोलणारे लोक आहेत. बहुसंख्य गावांत एक जमात, एक धर्म, एक भाषा आहे. ७५ टक्के लोकसंख्या ग्रामीण आहे. नेल्ली आणि मुसलमानांच्या गावाचा विकास झालेला नाही, याला आम्ही जबाबदार नाही असं तिवा लोक सहजपणे सांगतात.
जागीनगरला चहासाठी थांबलो. नेल्ली हत्याकांडाबाबत तिथल्या पोलिसठाण्यात एकूण ६८८ गुन्हे नोंदवण्यात आले. मात्र त्यापैकी केवळ ३१० गुन्ह्यांबाबत आरोपपत्रं दाखल करण्यात आली. पुढे ते खटलेही मागे घेण्यात आले. या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी त्रिभुवनप्रसाद तिवारी आयोगाची नियुक्ती करण्यात आली. आयोगाने दिलेला अहवाल त्यावेळच्या काँग्रेस सरकारने वा त्यानंतरच्या आसाम गण परिषदेच्या सरकारने कधीही प्रसिद्ध केला नाही.
नेल्लीनंतर जवळपास एक वर्षांनी इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीखांचं हत्याकांड झालं. देशाच्या राजधानीतील शिखांची संख्या दोन हजारांनी कमी झाली. या हत्याकांडात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना सात लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली.
नेल्ली, दिल्ली त्यानंतर रामजन्मभूमी आंदोलनामुळे उसळलेल्या दंगली, काश्मीर, मणिपूर, गुजरात, मुंबई. दंगलखोरांवर कारवाई नसते, मृतांच्या आणि नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ वा घट होते. नव्या पानांवर जुना इतिहास लिहीत आपली वाटचाल सुरु आहे.

Tuesday, 22 December 2009

बाजार उठला.....

नीलांचल टेकडीवर कामाख्या मंदिर आहे। दोन वर्षांपूर्वीच मंदिराची डागडुजी झाली. रंगसफेती केली. २००५ साली मंदिराच्या घुमटाच्या बाजूला ड्रॅगन आणि अन्य वेगवेगळ्या प्रतिमा, चित्रं होती. अहोम राजांनी वेगवेगळ्या काळात ही सजावट केली, असं तेव्हा पराशर बारुआ म्हणाला होता. ( तो सिनेमॅटोग्राफर होता। त्याने तंत्रसाधनेवर एक डॉक्युमेंटरी केली होती. कामाख्या मंदिर आद्य तंत्रपीठ समजलं जातं. आम्ही एका तांत्रिकाला भेटलोही होतो.) कामाख्या मंदिरावरील चीनी, तिबेटी, म्यानमार येथील संस्कृतींचा प्रभाव या चित्रांतून आणि प्रतिमांमधून कळायचा. आता त्या चित्रांचा वा प्रतिमांचा मागमूस लागत नाही. तांत्रिक मात्र आसपास असतील. मंदिराच्या टेकडीवर अतिक्रमण भरपूर झालंय. पंड्यांची घरं वाढत चालली आहेत. त्याशिवाय इतर बांधकामंही होतायत, असं अनिरुद्ध म्हणाला. तो सहारा-समय या वृत्तवाहिनीचा पत्रकार आहे.
मंदिराच्या परिसरात कबुतरं खूप. डालग्यामध्ये कबुतरं विकायलाही ठेवली होती. भाविक मंदिरात येऊन कबुतरं सोडून देतात. त्याशिवाय बकरे होते. कामाख्या मंदिरात बकरे आणि रेडे बळी दिले जातात. आम्ही गेलो तेव्हाही बळी चढवण्याचा विधि सुरु होताच. प्राण्याचा बळी कसा देतात हे पाह्यची इच्छा होती पण हिंमत झाली नाही. मंदिराचे पंड्ये बकरे, रेडे यांचं मांस खात नाहीत. बळी दिलेल्या प्राण्यांचं मांस वेगळ्या जमातीचे लोक येऊन घेऊन जातात. कामाख्या मंदिरात लग्नंही होतात. कमी खर्चात लग्नं होतं म्हणे.
निलांचल टेकडीवरून गोहाटी शहराचा देखावा झकास दिसतो. ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किना-यावर म्हणजे तटावर वसलेलं हे शहर आता उत्तर किना-यावर—पटावर, वाढू लागलंय. सर्व सरकारी कार्यालयं म्हणे तिथेच हलवणार आहेत. आज ती ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किना-याला आहेत. दक्षिण किनारा मुंबईच्या मरिन ड्राइव्हसारखा सुशोभित करण्याची योजना आहे. नदी असो वा समुद्र, पाणी भूगोल बदलतं. मुंबईला दादरची चौपाटी समुद्राने गिळूनच टाकलीय. ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किना-याला चौपाटी तयार होतेय. म्हणजे नदीचा प्रवाह हळू हळू उत्तरेकडे सरकतोय. सराई घाटाच्यावर, सरकारी कार्यालयांच्या पुढे एक बाग होती. नदीच्या पात्रालगत रस्त्याला समांतर जाणारी. त्या बागेतून थेट नदीत उतरता येईल असे प्लॅटफॉर्म होते. तिथे वॉच टॉवर होते. तिथे उभं राह्यलं की गोड्या पाण्यातले डॉल्फिन निरखता यायचे. म्हणजे मासे दूर पाण्यात असायचे. ते पाण्याबाहेर तोंड काढायचे किंवा कधी कधी हवेत उड्या मारायचे. त्यांना गँजेटिक डॉल्फिन म्हणतात. २००५ साली ते मासे मी पाह्यले होते. त्या बागेच्या बाजूला एक बाजार भरायचा. किना-यावरच्या गावांतून शिडाच्या किंवा यांत्रिक होड्यांनी भाजीपाला, फळं, कोंबड्या, बदकं, कबुतरं, डुकरं, दूध, दही त्या बाजारात यायचं. निरश्या दूधाचं दही मी तिथे चाखलं होतं. नदी उत्तरेला सरकल्याने वॉच टॉवर्स आता वाळूच्या मैदानात उभे असलेले दिसतात. तिथला बाजारही उठला. होड्यांतून नेलेला माल छोटसं वाळवंट वा चौपाटी पार करून तिथवर नेणं खेडूतांना परवडत नाही. वाळूत बाजार मांडला तर तिथे गि-हाईकं येत नाहीत.

Monday, 21 December 2009

सराई घाट

विमानतळाहून गोहाटी शहरात येताना वाटेतच निलांचल टेकड्या आहेत. एका टेकडीवर कामाख्या मंदिर आहे. ब्रह्मपुत्रेच्या काठाने अर्धचंद्राकृती वळण घेतल्यावर लागतो सराई घाट. नदी खाली आणि रस्ता वर. नदीत हाऊसबोटींवरची रेस्त्रां आहेत. नदी पात्रातल्या उमानंद मंदिराकडे जाण्यासाठी होड्या, मोटारबोटी तिथेच उभ्या असतात. ब्रिटीश व्हॉईसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक ढाक्याहून स्टीमरवरून इथेच उतरला होता. २७ ऑगस्ट १८७४ रोजी. तोपावेतो आसाम बंगालचाच भाग होता. लॉर्ड नॉर्थब्रुकने तो बंगालपासून वेगळा काढला. १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली आणि पूर्व बंगालला आसाम जोडून टाकला. पुढे १९११ साली ही फाळणी रद्द झाली आणि आसामला पुन्हा स्वतंत्र प्रदेशाची मान्यता मिळाली. १९७२ पर्यंत आसामची राजधानी होती शिलाँग. मेघालय राज्य वेगळं काढल्यानंतर आसामची राजधानी गोहाटीला हलवण्यात आली. लॉर्ड नॉर्थब्रुकच्या स्वागतासाठी उभारलेल्या कमानीवरच ही माहिती देण्यात आलीय. या कमानीच्या भोवती छोटीशी बाग आहे. पाच रुपये प्रवेश फी आहे. या कमानीच्या आश्रयाने काही प्रेमी युगुलं गुजगोष्टी करण्यासाठी विसावलेली असतात.
१६३१ साली मुगलांनी आसामवर निर्वाणीची चढाई केली आणि त्यावेळी झालेल्या तहात अहोम राज जयध्वज सिंघाला अनेक अपमानास्पद अटी स्वीकाराव्या लागल्या. आपली मुलगी त्याला शाही जनानखान्यात पाठवावी लागली. २० हजार तोळे सोनं, त्याच्या सहापट चांदी आणि ४० हत्ती हा खंडणीचा पहिला हप्ता होता. तीन लाख तोळे चांदी आणि ९० हत्ती वर्षभरात देण्याची अट होती. या अटी पूर्ण होईपर्यंत काही दरबा-यांना मुगलांकडे ओलीस ठेवावं लागणार होतं. त्याशिवाय ब्रह्मपुत्रेच्या पश्चिम आणि उत्तरेकडील प्रदेशावर पाणी सोडावं लागणार होतं. असं म्हणतात की जयध्वज सिंघाचा मृत्यु या अपमानास्पद अटी स्वीकाराव्या लागल्यानेच झाला. मृत्युशय्येवर असताना जयध्वज सिंघाने राज्याची सूत्रं चक्रध्वज सिंघाच्या हाती सोपवली. मात्र त्यापूर्वी परभवाचा डाग धुवून काढण्याची आण घातली. चक्रध्वजसिंघाने जैंतिया, कचारी इत्यादी राज्यांसोबत असलेल्या संबंधांमध्ये बदल घडवून आणला. सैन्याच्या उभारणीची सूत्रं लाचित बोरफुकनकडे दिली. त्या सुमारास आग्रा दरबारातून आलेल्या ब्रेकिंग न्यूजने चक्रध्वज सिंघा आणि लाचित बोरफुकन यांना मुगलांच्या विरोधात बंड करण्याचा निर्धार पक्का केला. ही बातमी होती शिवाजी महाराजांच्या पलायनाची. चार-पाच जिल्ह्यांमध्ये राज्य असणारा शिवाजी जर मुगल सत्तेला आव्हान देऊ शकतो तर आसामने मुगलांचा निर्णायक पराभवच करायला हवा, असं त्या दोघांनीही मनावर घेतलं. १६६७ मध्ये लाछित बोरफुकनने गोहाटी मुगलांच्या ताब्यातून मुक्त केलं. लष्कर आणि आरमार दोन्ही सेनांनी या लढाईत भाग घेतला. परंतु ख-या युद्धाला तोंड फुटायला अवकाश होता. गोहाटीच्या पाडावाची बातमी दिल्लीला गेल्यावर औरंगजेबाने आसामवर स्वारी करण्यासाठी राम सिंगाची नियुक्ती केली. शिवाजी महाराजांच्या पलायनानंतर राम सिंगाला मिळालेली ही पनिशमेंट ट्रान्सफर होती असं काही आसामी इतिहासकार सांगतात. राम सिंगाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश बंगालच्या सुभेदाराला म्हणजे शायस्ताखानाला मिळाले होते. त्याची बोटं तर दस्तुरखुद्द महाराजांनीच छाटली होती.
सुमारे ६० हजारांची फौज आणि ४० आरमारी नौका घेऊन राम सिंग आसामच्या मोहिमेवर आला. कोच बिहारची सेनाही मुगल फौजेला येऊन मिळाली. ही खबर मिळाल्यावर लाछित हबकला. एवढ्या प्रचंड फौजेला नमवणं सोप नव्हतं. अशक्य ते शक्य करून दाखवण्याची जबाबदारी आपल्यावर आलीय हे जाणून तो कामाला लागला.
ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किना-यावर वसलेलं गोहाटी शहर हे टेकड्यांच्या रांगांनी वेढलं आहे. तिथे गनिमी काव्याने मुगलांना रोखण्याची व्यूहरचना लाचितने केली. निर्णायक लढाई ब्रह्मपुत्रा नदीत होणार होती. ब्रह्मपुत्रेच्या पात्राची रुंदी सराईघाटाकडे सर्वात कमी म्हणजे १ किलोमीटर होती. त्यामुळे तिथे मुगल आरमाराला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना लाछितने केली. त्याचा अंदाज अचूक ठरला. अहोम सैन्याने टेकड्यांच्या आश्रयाने मुगल सैन्याला रोखून धरल्याने राम सिंगाने आरमाराला आगेकूच करण्याचा आदेश दिला. निलांचल टेकड्या आणि सराईघाट यांच्या दरम्यानं असणा-या अर्धवर्तुळाकार किना-यावरील वाळूच्या ढिगा-यांवर मोर्चे बांधलेल्या अहोम सैन्याचा प्रतिकार मोडून काढून मोगल सैन्य किना-यावर उतरणार होतं. हे पाह्यल्यावर लाछित बोरफुकनच्या अंगात वीरश्री संचारली. तो आजारी होता परंतु नौकेवर स्वार होऊन तो मोगलांवर तुटून पडला. आणखी सात नौकांना त्याने आगेकूच करण्याचा आदेश दिला. त्याचं धैर्य पाह्यल्यावर माघारी वळणा-या नौकाही मोगल सैन्यावर तुटून पडल्या. अहोम सैन्याने पराक्रमाची शर्थ केली आणि मोगलांना मागे लोटले. अहोम राज्याच्या सीमेपर्यंत म्हणजे आजच्या मानस राष्ट्रीय उद्यानापर्यंत लाचितने त्यांचा पाठलाग केला. या लढाईत आसामला खाँसी, जैंतिया, नागा, कचारी यांचीही साथ मिळाली. भारतीय सैन्यामध्ये सराईघाटाच्या लढाईचा, व्यूहरचनेचा, युद्धकौशल्याचा आणि लाचितच्या नेतृत्वाचा अभ्यास केला जातो. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीत लाचित बोरफुकनचा पुतळा आहे.
सराईघाटची निर्णायक लढाई जिंकल्यानंतर वर्षभरातच लाचित बोरफुकन आजारपणाने मृत्यु पावला. त्याच्या वारसदारानेच पुढे फितुरी करून गोहाटी पुन्हा मोगलांच्या हाती सोपवलं. १६८० पर्यंत मोगलांचा गोहाटीवर ताबा होता.
सराईघाटावर लाछित बोरफुकनचा पुतळा वा स्मारक हवं होतं. पण तिथे आहे लॉर्ड नॉर्थब्रुकच्या स्वागतासाठी उभारलेली कमान. १८७४ साली वाळूच्या ढिगावर उभी करण्यात आलेली ही कमान आता कलते आहे. आसाम आंदोलन १९८० च्या सुमारास सुरु झालं. लाचित बोरफुकनचा आणि सराई घाटाच्या लढाईचा विस्मृतीत गेलेला इतिहास त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी वर्तमानात आला. मोगल, ब्रिटीश, बंगाल, कोच बिहार, कचारी, नागा, खाँसी-जैंतिया आणि अर्थातच अहोम-आसामी हे प्रवाह आजही आसामचा इतिहास घडवत आहेत. मोगल-ब्रिटीश म्हणजे दिल्ली आणि आसाम म्हणजे अहोम, आसामी, बोडो, कोच राजबंशी, बंगाली, बांग्ला देशी, चहामळ्यांमध्ये काम करणारे मजूर (परराज्यातले आदिवासी), सुतिया, कचारी, असे अनेक वांशिक गट, हे समीकरण त्यासाठी लक्षात घेतलं पाहिजे.

गोहाटी गुगुलिंग

ती क्षितिजाची रेषा, तिथे समुद्र आणि आकाश एकमेकांना भेटतात, सविता खिडकीतून बघत म्हणाली. मी वाचत होतो म्हणून केवळ हुंकार दिला. मला वाटलं ती गंमत करतेय.
काही वेळाने ती म्हणाली ती बघ एक बोट दिसतेय. मी डुलक्या घेत होतो. मला वाटलं ती गंमत करतेय. किंवा ढगाच्या आकाराबद्दल बोलतेय.
नंतर मी विचारलं, आपण कुठे आहोत काही कळतंय का.
सह्याद्रीच्या रांगा दिसतायत ती म्हणाली.
मी चमकलो. विमान ईशान्येला चाललंय, सह्याद्री कसा दिसेल, सातमाळ्याच्या डोंगररांगा असतील आणि खिडकीतून खाली पाह्यलं. विमान जवळपास २८ हजार फुटांवर असावं. सूर्याचा पिवळा प्रकाश आसमंतात भरून होता. वर आभाळ स्वच्छ होतं. खाली मात्र धूसर दिसत होतं. अधून-मधून डोंगरांच्या रांगा दिसायच्या. सविता मला क्षितिजाची रेषा दाखवू लागली. ती ढगांची रेषा होती. स्वच्छ आभाळातली. सविताला वाटलं ती पृथ्वीची कडा आहे, खाली निळा समुद्र आहे, एक बारका ढगाचा ठिपका तिला आगबोट वाटला होता. मी म्हटलं जमीन खाली असेल तर समुद्र कसा वर दिसेल, तेव्हा तिला नजरबंदी झाल्याचं कळलं.
कलकत्त्याला विमान धावपट्टीवर झेपावलं. आमच्या सिटा सर्वात शेवटच्या रांगेत होत्या. विमानाची चाकं धावपट्टीवर टेकल्यावर जोरदार धक्का बसला. खूप प्रवासी नव्हे पाहुणे उतरले. नवे पाहुणे विमानात आले. आता ४५ मिनिटांत गोहाटी, मी म्हटलं. त्या पाठोपाठ अनाउन्समेंट झालीच—हम गोहाटी जाएंगे...
लोकप्रिय गोपिनाथ बोरदोलोई विमानतळावर ११.३० वाजता उतरलो. विमानतळाबाहेर येईपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. संध्याकाळ झाल्यासारखा प्रकाश होता. विमानतळाहून शहराकडे जाणा-या रस्त्यावर कमालीचा ट्रॅफिक होता. रस्त्याचं काम सुरु होतं. आमची टॅक्सी हळू हळू सरकत होती. ताशी ५ किमी वेगाने. आमचं हॉटेल २४ किमी दूर होतं. १९८४ आणि त्यानंतर २००५ साली मी गोहाटीला याच रस्त्याने गेलो होतो. विमानतळापासून हॉटेलपर्यंतचा प्रवास तेव्हा झकास वाटला होता. गेल्या चार-पाच वर्षात गोहाटी पूर्ण बदलून गेलंय. शहर वेगाने वाढत चाललंय. वाहनांनी भरून गेलंय. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, आठ चाकी, सर्व प्रकारची वाहनं होती. बैलगाड्या नव्हत्या. आसाममधले गाई-बैल अगदीच खुजे असतात. शेळ्या-मेंढ्याही फूट-दीड फूट उंचीच्या. १०-१५ शेळ्या आणि तितक्याच मेंढ्यांचा कळप हाकत दोन जण चालले होते. प्रत्येक जनावराच्या गळ्यात दोरी होती. सर्व दो-या एका मुख्य दोरीला बांधलेल्या होत्या. मुख्य दोरी ज्याच्या हातात होती, तो खेचेल त्या दिशेने प्राणी फरफटत जात होते.
हॉटेल होतं पलटन बाजारमध्ये. वाहनांची, माणसांची गर्दी. फेरीवाले, भाजीवाले, चहावाले, सिग्रेट-पानवाले. संध्याकाळी सराई घाटावर गेलो. तिथे पोचेपर्यंत अंधार पडला. अंधारात नदीवरच्या हाऊसबोटी आणि त्यामधली रेस्त्रां सस्पेन्स चित्रपटातले शॉटस् वाटले. नदीकाठाला लगटून असलेल्या फूटपाथने चालत होतो तर मुताचा वास. अंधार, धुकं. रस्त्यावरचे दिवे कोमेजलेले दिसत होते. रस्ता ओलांडला आणि दुस-या अंगाने चालत पुन्हा वर सराई घाटावर आलो. वाहनांना, फेरीवाल्यांना चुकवत चालावं लागत होतं. त्यात अंधार.
संध्याकाळी सहा वाजता पॅरॅडाईज रेस्त्रांमध्ये जेवायला गेलो. आसामी जेवण. तृप्त झालो. हॉटेलवर जाण्यासाठी मोबाईल फोनवरचा गुगुल मॅप पाह्यला. पॅरॅडाईजपासून आमचं हॉटेल दोन किलोमीटरवर होतं. आम्ही चालतच निघालो. गुगुल मॅप हातातच होता. चुकीचं वळण घेतलं की चार-पाच पावलं गेल्यावर लगेच कळायचं. अंधार, खड्डे, वाहनं, सिग्नल सर्वांना पायात घेत हॉटेलपर्यंत पोचलो.
त्यानंतर आसामात, मेघालयात असताना, गुगुल मॅपकडे विचारपूस करतच प्रवास करत होतो. गावाचं नाव गुगुल सर्चमध्ये टाकलं की त्यांच्या इतिहास-भूगोलाची माहिती देणा-या वेबसाईटस् हातातल्या पडद्यावर झळकायच्या. त्यांच्यावर नजर टाकली की डोक्यातले अनुभवाचे, स्मृतींचे दिवे पेटायचे. भेटणारी माणस त्यावर आणखी प्रकाश टाकायची. चाचपडत का होईना पुढे सरकता यायचं.
डिसेंबर ९, २००९