Thursday, 31 December 2009

सुरमा नदीच्या अलिकडले आणि पलिकडे........

ब्रह्मपुत्रा नदी हिमालयाच्या निर्मितीच्याही आधीपासूनची आहे, असं विकिपिडीयात म्हटलंय. हिमालयाची निर्मिती व्हायला सुरुवात झाली वायव्य दिशेकडून म्हणूनच तिथे त्याची उंची सर्वाधिक आहे. ईशान्येकडचा हिमालय हा तुलनेने नवा समजला जातो. त्यामुळेच ईशान्येकडच्या राज्यांमधल्या टेकड्या ठिसूळ आहेत, असं बेदब्रत लोहकर या आसाम ट्रिब्यूनच्या सहसंपादकाने सांगितलं. अरुणाचल प्रदेशातल्या नद्यांवर धरणं बांधून वीज निर्मिती करण्यातला धोका नेमका तोच आहे. आधीच ईशान्य भारत हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे त्यात ठिसूळ टेकड्या, तिथे धरण फुटलं तर आसामला पुराचा धोका आहे, असं त्याचं म्हणणं होतं.
ब्रह्मपुत्रा नदी आसामात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्वेकडचा प्रदेश अधिक उंचीवर आहे. त्यालाच म्हणतात वरचा आसाम (अप्पर आसाम) तर पश्चिमेकडच्या प्रदेशाला म्हणतात खालचा आसाम (लोअर आसाम). दिब्रुगढ, तिनसुखिया, सिबसागर, जोरहाट, गोलघाट, नागाव, लखीमपुर हे आणि इतर जिल्हे वरच्या आसामात येतात तर कोक्राझार, बोंगाईगाव, गोलपारा, दरांग, कामरुप, नलबारी, बारपेटा हे जिल्हे खालच्या आसामात येतात.

कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, चहामळे वरच्या आसामात आहेत. अर्थातच वरचा आसाम अधिक विकसीत आहे. आसामवर ६०० वर्षं राज्य करणार्‍या अहोम घराण्याची राजधानी सिबसागरला वरच्या आसामात होती. गोहाटी कामरूप जिल्ह्यात आहे. म्हणजे लोअर आसाममध्ये.

आसामी कोण हा प्रश्न आसामात अजूनही समाधानकारकरित्या सुटलेला नाही. आसामच्या पश्चिमेला म्हणजे मानस नदीच्या किनार्‍याला बोडो ही जमात बहुसंख्येने आहे. स्वतंत्र बोडोलँडची मागणी याच प्रदेशातून झाली होती. त्याशिवाय आसामात मैदानी प्रदेशातील आदिवासी जमातीही आहेत, उदा. तिवा, लालुंग, मिशी वगैरे. जवळपास प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र बोली वा भाषा आहे. आदिवासी आणि नागर वा ग्रामीण अशी ढोबळ विभागणी केली तर अहोम, आसामी, बंगाली हे दुसर्‍या कोटीत—नागर वा ग्रामीण, येतात.

आम्ही शिलाँगला गेलो होतो माझ्या मित्राच्या—अभिजीत देब, लग्नाला. तो बंगाली. म्हणजे त्याचे वडील पूर्व बंगालातून येऊन शिलाँगमध्ये स्थायिक झाले. शिलाँगला लबान या भागात बंगाल्यांचीच वस्ती आहे. लग्नासाठी त्याचे अनेक नातेवाईक सिल्चरहून आले होते. सिल्चर म्हणजे बराक खोर्‍याची राजधानी. मणिपूर आणि सध्याचा बांगला देश यांच्यामध्ये एक चिचोंळी पट्टी आहे. हेच बराक खोरं. बराक नदी आसाम-मणिपूरच्या सीमेवर उगम पावते आणि मिझोराममधून आसामच्या मैदानात येते. सिल्चरला तिला दोन फाटे फुटतात--सुरमा आणि कुसिवारा, दोन्ही प्रवाह पुढे बांगला देशात गेल्यावर ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळतात. बराक खोर्‍याच्या उत्तरेला असणार्‍या टेकड्यांवर कचार या आदिवासी जमातीचं राज्य होतं. म्हणजे अहोम राजांनी आसामवर ६०० वर्षं राज्य केलेलं असलं तरीही बराक खोर्‍यावर बंगाल्यांचंच वर्चस्व होतं. आसामची राजभाषा आसामी आहे पण बराक खोर्‍यातल्या जिल्ह्यांचा कारभार बंगाली भाषेत चालतो. आसाममध्ये होणारी बांग्लादेशीयांची घुसखोरी याच बराक खोर्‍यातून होते. नदी पार केली दुरर्‍या देशात सहजपणे पोचता येतं.

आसामात चहामळ्यांची लागवड सुरु झाली ती वरच्या आसामात. चहामळ्यांमध्ये गुंतवणूक केली ब्रिटीशांनी. त्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने जमीन संपादन, जमीन मालकीचे कायदे केले आणि चहामळ्यांना प्रोत्साहन दिलं. चहाच्या उत्पादनातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आसामात चहाची लागवड करण्याचा निर्णय ईस्ट इंडिया कंपनीने घेतला. चहामळ्यांची जमीन तयार करणं आणि इतर कामांसाठी झारखंड, छत्तीसगड, उडीसा या प्रांतांतून त्यावेळी आदिवासींना अक्षरशः वेठबिगार म्हणून पकडून आणण्यात आलं आणि गुलामासारखं राबवण्यात आलं. चहामळ्यात काम करण्यासाठी लाखोंच्या संख्येने मजूर आयात करण्यात आले त्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्याकरता बंगाली शेतकर्‍यांना आसामातील जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं. पूर्व बंगालातील बहुसंख्य मुस्लिम आसामात शेती करू लागले. त्यांची स्वतंत्र गावंच वसवण्यात आली. नेल्ली आणि त्या परिसरातील गावं अशीच वसली. बांगला देशी निर्वासितांच्या संख्येत सत्तरच्या दशकात कित्येक पटींनी वाढ झाली.
मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश ही राज्य १९५० सालापर्यंत आसामातच होती. त्यानंतर हळू हळू त्यांना आसामातून वेगळं काढण्यात आलं. राज्याचं संकुचन झालं, औद्योगिक विकासाची गती अतिशय मंद, विविध भाषिक आणि वांशिक गट, त्यात धर्मांच्या विविधतेची भर, शेतीवर अवलंबून असलेली म्हणजे जेमतेम पोटापुरतं पिकवणारी अर्थव्यवस्था. काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात मध्यममार्गापासून फारकत घेत सत्तेवरील पकड घट्ट केल्यामुळे उजव्या आणि डाव्या अतिरेकी संघटना भारतात फोफावल्या. ऐंशीच्या दशकात आसाममधील विद्यार्थी आंदोलन म्हणूनच पेटलं. दडपशाही केल्यामुळे आंदोलन चिघळलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून जसं शिवसेना नावाचं भूत मुंबईच्या (त्यानंतर महाराष्ट्राच्या) मानगुटीला बसलं तसंच आसाम आंदोलनातच उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) ची मूळं रोवली गेली.

आसामातील आदिवासींच्या वाट्याला आता स्वायत्त मंडळं आली आहेत. आदिवासींना त्यांच्या प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांवर काहीप्रमाणात अधिकार मिळाला आहे. त्यामुळे स्वतंत्र बोडोलँडच्या मागणीला शांत करता आलं. परंतु आता कोच राजबंशी आणि कचारी हे समूह स्वतंत्र राज्याची मागणी करू लागले आहेत. जग जवळ येतंय, जगाची बाजारपेठ एक होतेय पण आपण मात्र राजकीयदृष्ट्या विखंडीत होऊ लागलो आहोत.

1 comment:

  1. Interesting but as i say always you should translate it into english it will be better for non marathi reader

    ReplyDelete