Tuesday, 22 December 2009

बाजार उठला.....

नीलांचल टेकडीवर कामाख्या मंदिर आहे। दोन वर्षांपूर्वीच मंदिराची डागडुजी झाली. रंगसफेती केली. २००५ साली मंदिराच्या घुमटाच्या बाजूला ड्रॅगन आणि अन्य वेगवेगळ्या प्रतिमा, चित्रं होती. अहोम राजांनी वेगवेगळ्या काळात ही सजावट केली, असं तेव्हा पराशर बारुआ म्हणाला होता. ( तो सिनेमॅटोग्राफर होता। त्याने तंत्रसाधनेवर एक डॉक्युमेंटरी केली होती. कामाख्या मंदिर आद्य तंत्रपीठ समजलं जातं. आम्ही एका तांत्रिकाला भेटलोही होतो.) कामाख्या मंदिरावरील चीनी, तिबेटी, म्यानमार येथील संस्कृतींचा प्रभाव या चित्रांतून आणि प्रतिमांमधून कळायचा. आता त्या चित्रांचा वा प्रतिमांचा मागमूस लागत नाही. तांत्रिक मात्र आसपास असतील. मंदिराच्या टेकडीवर अतिक्रमण भरपूर झालंय. पंड्यांची घरं वाढत चालली आहेत. त्याशिवाय इतर बांधकामंही होतायत, असं अनिरुद्ध म्हणाला. तो सहारा-समय या वृत्तवाहिनीचा पत्रकार आहे.
मंदिराच्या परिसरात कबुतरं खूप. डालग्यामध्ये कबुतरं विकायलाही ठेवली होती. भाविक मंदिरात येऊन कबुतरं सोडून देतात. त्याशिवाय बकरे होते. कामाख्या मंदिरात बकरे आणि रेडे बळी दिले जातात. आम्ही गेलो तेव्हाही बळी चढवण्याचा विधि सुरु होताच. प्राण्याचा बळी कसा देतात हे पाह्यची इच्छा होती पण हिंमत झाली नाही. मंदिराचे पंड्ये बकरे, रेडे यांचं मांस खात नाहीत. बळी दिलेल्या प्राण्यांचं मांस वेगळ्या जमातीचे लोक येऊन घेऊन जातात. कामाख्या मंदिरात लग्नंही होतात. कमी खर्चात लग्नं होतं म्हणे.
निलांचल टेकडीवरून गोहाटी शहराचा देखावा झकास दिसतो. ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किना-यावर म्हणजे तटावर वसलेलं हे शहर आता उत्तर किना-यावर—पटावर, वाढू लागलंय. सर्व सरकारी कार्यालयं म्हणे तिथेच हलवणार आहेत. आज ती ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किना-याला आहेत. दक्षिण किनारा मुंबईच्या मरिन ड्राइव्हसारखा सुशोभित करण्याची योजना आहे. नदी असो वा समुद्र, पाणी भूगोल बदलतं. मुंबईला दादरची चौपाटी समुद्राने गिळूनच टाकलीय. ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण किना-याला चौपाटी तयार होतेय. म्हणजे नदीचा प्रवाह हळू हळू उत्तरेकडे सरकतोय. सराई घाटाच्यावर, सरकारी कार्यालयांच्या पुढे एक बाग होती. नदीच्या पात्रालगत रस्त्याला समांतर जाणारी. त्या बागेतून थेट नदीत उतरता येईल असे प्लॅटफॉर्म होते. तिथे वॉच टॉवर होते. तिथे उभं राह्यलं की गोड्या पाण्यातले डॉल्फिन निरखता यायचे. म्हणजे मासे दूर पाण्यात असायचे. ते पाण्याबाहेर तोंड काढायचे किंवा कधी कधी हवेत उड्या मारायचे. त्यांना गँजेटिक डॉल्फिन म्हणतात. २००५ साली ते मासे मी पाह्यले होते. त्या बागेच्या बाजूला एक बाजार भरायचा. किना-यावरच्या गावांतून शिडाच्या किंवा यांत्रिक होड्यांनी भाजीपाला, फळं, कोंबड्या, बदकं, कबुतरं, डुकरं, दूध, दही त्या बाजारात यायचं. निरश्या दूधाचं दही मी तिथे चाखलं होतं. नदी उत्तरेला सरकल्याने वॉच टॉवर्स आता वाळूच्या मैदानात उभे असलेले दिसतात. तिथला बाजारही उठला. होड्यांतून नेलेला माल छोटसं वाळवंट वा चौपाटी पार करून तिथवर नेणं खेडूतांना परवडत नाही. वाळूत बाजार मांडला तर तिथे गि-हाईकं येत नाहीत.

1 comment:

  1. तुमच्या आसाम सहलीचा वानोळा नेत्रसुखद आणि उद्बोधक आहे. तसेच मेघालयचे फोटोही.महाराष्ट्र हेअर ड्रेसर धमालच.
    तुझे ब्लोग्सहि वाचले. मनापासून आवडले. तुझ्या पत्रकारी नजरेचा टीपकागद, विचारांची, संवेदनांची चौकट, नेमकी माहिती आणि रसाळ अभिव्यक्ती असे चांगले रसायन तुला साधते आहे. जरूर लिहावेस तू. ब्रम्हपुत्राचे पात्र
    बदलते असल्याने वाहतुकीचे आणि जीवन व्यवहारांचे स्थानिक प्रश्न कोणते उभे राहतात याची छान नोंद तू केली आहेस. आसामचा इतिहास शिवकालीन संदर्भामुळे व्यापक तौलनिक परिणाम साधतो. झकास.
    स्मिता गांधी

    ReplyDelete