Tuesday, 17 May 2011

भूगोलाचं राजकारण: कोल्हापूर


महाराष्ट्रात क्रिकेट लोकप्रिय आहे. कोल्हापूरात फुटबॉलच्या सामन्यांना तोबा गर्दी होते. महाराष्ट्रात गणेशोत्सव मंडळं आहेत पण रस्सा मंडळं फक्त कोल्हापूरात आहेत. कुस्तीचे सामने कोल्हापूरात रंगतातच पण म्हशींच्या स्पर्धा म्हणजे दोन-तीन हाकांमध्ये म्हशीला बोलावणं, फक्त कोल्हापूरातच होतात. सोळंकी आईस्क्रीम पार्लरची मालिका फक्त कोल्हापूरातच आहे, तिथे आईसक्रीममधल्या आंतरराष्ट्रीय बँड्सची दादागिरी चालत नाही. कोल्हापूरकर कोल्हापूर शहर आणि जिल्हा याच विषयावर ते अखंड बोलत असतात. सांगलीची दंगल हा विषय ताजा असताना मी कोल्हापूरात होतो. त्या विषयाने गप्पा सुरु झाल्या पण काही मिनिटातच कोल्हापूरकर इचलकरंजीवर बोलू लागले.

मुंबईला गिरगाव आणि जुहूची चौपाटी आहे, कोल्हापूरकरांना रंकाळ्याची चौपाटी आहे. मुंबई-पुण्याला लोणावळा, खंडाळा आहे, कोल्हापूरकरांना पन्हाळा, विशाळगड आहे. कोल्हापूर असं एकमेव शहर आहे की जिथली माणसं त्यांच्या शहराची तुलना अन्य कोणत्याही शहराशी करत नाहीत. मुंबईला दिल्लीचा तोरा सहन होत नाही, पुणेकर मुंबईला नाकं मुरडतात, औरंगाबादला पुण्याशी स्पर्धा करावीशी वाटते, नागपूरकरांना मुंबईशी. कोल्हापूरकरांच्या लेखी फक्त कोल्हापूरच असतं.

महाराष्ट्रातल्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची सुरुवात झाली सातारा जिल्ह्यात. पण रण गाजवलं राजर्षी शाहूंनी. कोल्हापूर संस्थान त्यांनी त्यांच्या काळाच्या किमान पन्नास वर्षं पुढे नेऊन ठेवलं. ह्याबाबतीत कोल्हापूरची तुलना, सयाजी महाराजांच्या काळातील बडोदे संस्थानाशीच होऊ शकेल. १९४९ साली शेतकरी कामगार पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडला. त्यामागची प्रेरणा कर्मवीर भाऊराव पाटलांची होती. शेकापच्या स्थापनेचा संबंध असा थेट राजर्षी शाहूंपर्यंत लावता येतो.

बारमाही पाणी असणारा जिल्हा दरडोई उत्पन्नात सार्‍या देशात कदाचित् आघाडीवर असेल. रत्नाप्पाअण्णा कुंभार, तात्यासाहेब कोरे असे बिगर मराठा नेतेच नाहीत तर त्यांची संस्थानं कोल्हापूरातच उभी राहू शकतात. साखर सम्राट, शिक्षण सम्राट, दूध सम्राट, भेसळ सम्राट असे अनेक सम्राट कोल्हापूरात आहेत. पण प्रत्येकजण दुसर्‍याला वचकून असतो. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मतं सर्रास विकत घेतली जायची. पण पैसे घेतल्यावर मतं दिली नाहीत तर निकालानंतर कार्यकर्ते वाटलेले पैसे वसूल करायला दारावर हजर. हम काले धंदे करते है लेकीन इमानदारीसे, असा त्यांचा खाक्या असतो.

इंग्लडच्या राणीसारखी कोल्हापूरची गादी आहे. तिच्याशी कोल्हापूरचा अभिमान, अस्मिता जोडली गेलीय. कोल्हापूरकरांनी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना जिल्हाबंदी केली होती, कोल्हापूरच्या गादीबद्दल अनुदार उद्‍गार काढले होते म्हणून. पण राजाला निवडणूकीत पाडायला कोल्हापूरकर कचरत नाहीत. शरद पवारांनाही कोल्हापूरची राजकीय समीकरणं चकवतात तिथे इतर कुणाची काय डाळ शिजणार. सातारा आणि कोल्हापूरातला हा फरक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत कोल्हापूरातला एकही नेता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत धावलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्याला अनेकदा मंत्रीपदही मिळालेलं नाही पण त्यामुळे कोल्हापूरचं, कोल्हापूरच्या विकासाचं कधीही काहीही अडलं नाही. भाई माधवराव बागलांनी कोल्हापूर संस्थानाचं महाराष्ट्रात विलीनीकरण होऊ नये यासाठी चळवळ उभारली होती. संस्थानी वृत्ती नाही तर जिल्हा म्हणूनच आपण अलग आहोत हे कोल्हापूरकरांच्या मानसिकतेत खोल रुजलेलं आहे.

कोल्हापूर जिल्हा कृष्णा खोर्‍यात आहे तर नगर गोदावरी खोर्‍यात. या दोन संपन्न जिल्ह्यांच्या मधल्या पट्ट्यातल्या कृष्णाखोर्‍यात महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्या आहेत. त्यातही अग्रभागी आहेत तीन जिल्हे—पुणे, सातारा आणि सांगली.

2 comments:

  1. I m eagerly waiting for your book on all these informative articles.

    Ajay

    ReplyDelete