Wednesday, 25 May 2011

भीमशक्ती-शिवशक्ती सांठगांठ ?

सेना-भाजप युतीला रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष साथ देणार असल्याचे संकेत गेल्या आठवड्यात आठवले यांनी जाहीरपणे दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापासून फारकत घेणार असल्याचं जाहीर करतानाच, आठवले यांनी शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यावरून असं ताडता येतं की पवारांना विश्वासात घेऊनच आठवले यांनी ही चर्चा सुरु केली असावी. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ नगण्य आहे. त्यामुळे महापालिकेत सेनेची सत्ता कायम राहणं शरद पवारांच्या राजकारणाला साजेसं आहे. मुंबई महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प २२-२३ हजार कोटींचा असतो. महापालिका सेनेच्या ताब्यात राह्यली तर विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईतून रसद मिळवणं सेनेला सोईचं जाईल आणि त्यामुळे काँग्रेसवर दबाव ठेवता येईल, हे शरद पवारांचं राजकारण असू शकतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लाभ काँग्रेसला होणार असेल तर दलितांची साथ युतीला मिळणं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडणारं आहे.

दलितांची एक गठ्ठा मतं शहरांमध्येच केंद्रीत झालेली आहेत. शेती वा अन्य कोणतीही संसाधनं मालकीची नसल्याने गावातलं गुलामीचं जिणं आणि शहरातलं गरीबीचं जगणं यामध्ये दलितांनी शहरांना कौल दिला. स्वतंत्र मतदार संघांना पर्याय म्हणून राखीव मतदार संघांचं तत्व स्वीकारल्याने दलितांचे प्रतिनिधी निवडण्याच्या किल्ल्या सवर्णांच्या हाती आल्या. (राखीव मतदारसंघांमध्ये भाजप, सेना, काँग्रेस यांचेच उमेदवार निवडून येतात.) केवळ शहरांमध्येच दलितांना त्यांचे राजकीय हक्क वाजवून घेता येतात, ही वस्तुस्थिती आहे.

यशवंतराव चव्हाणांनी दादासाहेब गायकवाड यांच्यासारख्या थोर नेत्याशी दिलजमाई केली आणि नवबौद्धांना राज्यात राखीव जागा मिळाल्या. रिपब्लिकन नेत्यांच्या नेमस्त राजकारणाला पँथर्सनी आव्हान दिल्यानंतर नवबौद्धांमधल्या कोणत्या गटाला सत्तेतला वाटा द्यायचा ह्याबाबत काँग्रेसमध्ये नेहमीच अनिश्चितता राह्यली. आंबेडकरी विचाराची नाही तर जातीचीच व्यक्ती भीमशक्तीत येऊ शकते, अशा एक्स्लुजिव राजकारणाची पाठराखण नवबौद्ध समाजाने केली. त्यामुळे कवाडे, गवई, आंबेडकर, आठवले या नेत्यांना संघटनेची बांधणी करण्याची गरजच वाटली नाही. (बहुजन समाज पार्टीचं यश कांशीराम यांनी केलेल्या संघटन बांधणीत आहे.) त्यामुळे नवबौद्धांनी अपवादानेही अन्य अनुसूचित जाती-जमातींना आपलंसं केलं नाही. पँथर्सच्या नेत्यांनी तसे प्रयत्न जरूर केले परंतु समाजमानस म्हणून नवबौद्ध समाज एक्सक्लुजिव राजकारणाची पाठराखण करतो. त्यामुळे चांभार, मातंग, ढोर हे जातीसमूह काँग्रेसच्या आश्रयाला गेले. नंतर सेना, भाजप यांच्याकडेही वळले. मतांच्या बेरीज-वजाबाकीच्या राजकारणात नवबौद्धांचा टक्का घसरू लागला.

सेना-भाजप युतीने १९९० सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जोरदार धडक मारली होती. रामदास आठवले यांच्यासोबत आघाडी करून युतीला रोखण्याची कामगिरी शरद पवारांनी केली. आठवलेना कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद दिलं. त्यानंतर त्यांना लोकसभेतही पाठवलं. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर सोलापूर जिल्ह्यातील आपल्या पक्षाची ताकद त्यांच्या पाठिशी उभी करून निवडूनही आणलं. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावर मात्र गेल्या खेपेच्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी आठवलेंची जबाबदारी त्यांनी काँग्रेसकडे सोपवली. काँग्रेसने आठवले यांना सुरक्षित मतदारसंघ दिला नाही आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही स्थानिक नेत्यांवर टाकली नाही. आठवलेंच्या निष्ठा पवारांकडे आहेत या विचारानेही काँग्रेसने आठवलेंच्या पराभवाकडे काणाडोळा केला असावा. मात्र या राजकारणात दलितांना सत्तेतला न्याय्य वाटाच नाकारला गेला. त्यामुळेच सेना-भाजप युतीसोबत जाण्याची मागणी दलितांमध्ये जोर पकडू लागली. या चर्चेला रामदास आठवले यांनी अनुकूल प्रतिसाद दिला मात्र सावधपणे. प्रथम भाजप नेत्यांशी चर्चा केली, शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. त्यानंतर जाहीर सभेत या विषयावर चर्चा घडवून आणली. ज्या सहकार्‍यांचा विरोध आहे त्यांच्या भूमिकेचाही आपण आदरच करतो असेही संकेत दिले. आणि आपल्या विचाराची दिशा काय आहे हेही स्पष्ट केलं. काँग्रेस (समाजवादी) बरखास्त करून पुन्हा स्वगृही परतण्यासाठी शरद पवारांनी हाच मार्ग अवलंबला होता.



No comments:

Post a Comment