Thursday, 9 June 2011

मकबूल फिदा हुसेन..

हिंदू देव-देवतांची विटंबना करणारी चित्रं काढली असा आरोप करून विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवाराने हुसेनच्या विरोधात बदनामीचे खटले देशातल्या विविध न्यायालयांमध्ये दाखल केले. आक्रमक हिंदुत्ववाद्यांनी हुसेनच्या चित्रप्रदर्शनांवर हल्ले केले किंवा प्रदर्शनं बंद करणं आयोजकांना भाग पाडलं. हुसेनच्या चित्रांमुळे हिंदू देव-देवतांची बदनामी झालेली नाही, असा निःसंदिग्ध निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने हुसेनला निर्दोष ठरवलं. या काळात केंद्र वा राज्य सरकारांनी ठाम भूमिका घेऊन हुसेनला संरक्षण देण्याची पावलं उचलली नाहीत. मूर्तीपूजेला विरोध असल्याने सर्वशक्तिमान अल्ला आणि त्याचा प्रेषित मुहंमद पैगंबर यांची चित्र काढणं इस्लामला निषिद्ध आहे म्हणून हुसेन जर त्यांची चित्रं काढत नसेल तर त्याने हिंदू देवदेवतांची चित्रं काढण्याची उठाठेव का करावी , असा हिंदुत्ववाद्यांचा सवाल होता. हुसेनने काढलेली हिंदू देवदेवतांची चित्रं विशेषतः सरस्वतीचं चित्रं अश्लील आहे असाही हिंदुत्ववाद्यांचा दावा होता. महात्मा गांधी, साने गुरुजी, डॉ. राममनोहर लोहिया यांची वैचारिक परंपरा मानणारे भालचंद्र नेमाडे यांच्यासारखे अब्राह्मणी हिंदूही हुसेनच्या विरोधात वक्तव्यं करत होते. हुसेनच्या त्या वादग्रस्त चित्राची लायकी काय असा प्रतिप्रश्न नेमाडे यांनी एका मुलाखतीत केला होता.


हुसेनचा जन्म पंढरपूरचा. गरीब मुसलमान कुटुंबातला. तो दोन वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. आईचा चेहेरा त्याला कधीच आठवला नाही पण आई म्हणजे नऊवारी साडी अशी कल्पना त्याच्या डोक्यात फिट्ट बसली होती. मराठी मुलखातली नऊवारी साडी नेसलेली बाई दिसली की त्याला आईची आठवण यायची. त्याच्या चित्रात आईचा चेहेरा कधीही नव्हता. अगदी मदर टेरेसा यांचं पेंटिंग करतानाही चेहेर्‍याचा तपशीलच नाही. पंढरपूरात दिव्यांची दुरुस्ती करण्याचं दुकान बंद करून हुसेनचे वडील इंदूरच्या मालवा मिल्समध्ये नोकरी लागले. हुसेनची रवानगी तिथे झाली. रामायणाची ओळख त्याला तिथे झाली. तो रामलीलेत हनुमानाचं काम करायचा. परंतु चित्रकार म्हणून रामायणाकडे पाहण्याची प्रेरणा त्याला १९६८ साली हैदराबादेत असताना मिळाली. त्यासुमारास डॉ. राममनोहर लोहिया हे समाजवादी नेते आणि विचारवंत हैदराबादेत होते. टाटा, बिर्ला या भांडवलदारांची चित्रं काढण्यापेक्षा सामान्य माणसासाठी चित्रं काढ. रामायण चित्रबद्ध कर, असं त्याला डॉ. लोहियांनी सुनावलं. हुसेनने डॉ. लोहियांच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठ केलेली होतीच. तो रामायणावरही विचार करू लागला. भारताच्या पूर्व-पश्चिम एकतेचं प्रतीक कृष्ण आहे तर उत्तर-दक्षिण एकात्मता रामाने साधली आहे, राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे तर कृष्ण मुक्ततेचं प्रतीक आहे अशी जनमानसातली राम, कृष्णाची प्रतिमा लोहियांनी अभिव्यक्त केली होती. हैदराबादेतच लोहियांच्या काही अनुयायांनी रामायण मेळ्याचं आयोजन केलं होतं, त्या मेळ्यातली सर्व चित्रं हुसेनने एक पैशाचा मोबदला न घेता काढली. पुढे दिल्लीच्या रामलीला समितीने त्यांच्या वार्षिकाचं मुखपृष्ठ तयार करण्याची गळ हुसेनला घातली. १९८० साली प्रसिद्ध झालेल्या या वार्षिकाच्या हजारो प्रती वितरीत झाल्या. मात्र यापैकी एकाही चित्रावर वाद झाले नाहीत की कोर्ट केसेस झाल्या नाहीत.

पोटासाठी सिनेमाची पोस्टर्स रंगवण्याची कामं हुसेन करत असे. त्यातूनच पुढे चित्रकलेची त्याला गोडी लागली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात मुंबईला प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपची स्थापना करण्यात हुसेन, रझा, आरा, सूझा या चित्रकारांनी पुढाकार घेतला. स्वातंत्र्य आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपची स्थापना केली नव्हती. भारतीय संवेदना, रंग चित्रातून अभिव्यक्त करण्याची दृष्टी चित्रकलेत रुजवणं ही त्या ग्रुपची प्रेरणा होती. नारिंगी, लाल, हिरवा, काळा अशा भारतीय मातीशी निगडीत चमकदार रंगांची योजना, रंगाचे जोरकस फटकारे यातून स्वातंत्र्य भावनेची अभिव्यक्ती करण्याचं देशी तंत्र या चित्रकारांनी जन्माला घातलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची गाथा चित्रबद्ध करण्यात समाजवादी नेते युसूफ मेहेरल्ली यांनी पुढाकार घेतला होता. पोर्ट्रेट वा व्यक्तीचित्रणाची नवी शैली निर्माण करणारे चित्रकार व्ही.एन. ओके यांच्यावर त्यांनी ही जबाबदारी सोपवली. ओकेंना प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपमधल्या अनेकांनी सक्रीय मदत केली आणि हे चित्रप्रदर्शन भारतातल्या अनेक शहरात फिरलं.

हुसेनला पद्‍मश्री, पद्‍मविभूषण असे अनेक किताब मिळाले. त्याला राजसभेचं सदस्यत्वही बहाल करण्यात आलं. बांग्ला देश युद्धाच्या यशानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळताना रणरागिणी दुर्गेची उपमा वापरली. हुसेनने तर इंदिरा गांधींचं दुर्गेच्या अवतारातलं चित्रंच काढलं. जवाहरलाल नेहरू, राममनोहर लोहिया, इंदिरा गांधी यांच्यासारख्या राजकीय नेत्यांशी संबंधीत असलेला हुसेन नंतरच्या काळात मात्र सोसायटी क्राऊडमध्ये अधिकाधिक रमत गेला. लोकांशी असलेला त्याचा संबंध तुटत गेला. अमृतसरच्या सुवर्णमंदिरातील कारवाईनंतर भारतात राजकीय हिंदुत्वाला उठाव मिळाला, १९८८ साली सुरु झालेल्या रामजन्मभूमीच्या आंदोलनानंतर हिंदुत्वाची राजकीय सत्तेकडे घोडदौड सुरु झाली. त्यानंतरच्या काळात संघ परिवार-विश्व हिंदू परिषदेने हुसेनच्या विरोधात बदनामीचे खटले दाखल करण्याचं सत्र आरंभलं. हिंदुत्वाच्या लाटेवर आरूढ होऊन जॉर्ज फर्नांडीस हे कट्टर लोहियावादी भाजपसोबत केंद्र सरकारात सामील झाले होते. चित्रकलेमध्ये देशीवादाचा पुरस्कार करणार्‍या या चित्रकाराची वाटचाल बहुजनांकडून (मास) अभिजनांकडे (क्लास) झाली आणि अखेरीस त्याच्यावर देशांतराचीही पाळी आली. हुसेन हिंदू असता तर त्याला देशांतर करावं लागलं असतं का, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक सुजाण भारतीय माणसाने स्वतःपाशी तरी द्यायला हवं.

9 comments:

  1. ज्यांना चित्रकलेतील काही कळत नाही आणि संस्कृतीतीलही काही कळत नाही, अशा अडाण्यांपुढे काय बोलायचं? - मुकुंद टाकसाळे

    ReplyDelete
  2. Sunil,

    Thank you for lighting up the syncretic influences of Husain's childhood. I like to think he is Indian art's first Muslim martyr Hindus can claim as their own for having driven him to the desperation that he finally faced at the age of 95!

    It is odd, but militant Hinduism's search for identity and its assertiveness is so informed by Abrahamic religious values and its peculiar monistic and non-imagistic blindspots.

    I was very enlightened by Husain's connection of his dead mother with a navwaari and how his Mother Teresa series is without facial defination.

    These new "Integral Indians" from India's biggest minority like Husain, Safdar Hashmi etc are the mulattos that the dominant majority disowns, and the moment that act is accomplished, nobody owns. That is because the minority can't seem to be able to fit in a hot potato who is putatively already ostrasised from the community for being a communist or other such non-godly pursuasion.

    On another note, I think the indian government's, especially the "shining" India's, blundered majorly by NOT insisiting he stay in India under government protection. It would have been manmohan govt's great Salman Rushdie moment, as it was was Dame Thatcher!

    Cheers!

    ReplyDelete
  3. PLease check this...just ran into it!

    http://www.dnaindia.com/india/report_bjp-to-demand-mf-husain-s-last-rites-in-india_1553033

    ReplyDelete
  4. It is right but incomplete to just ask 'whether Hussian would have been made to leave India if he would have been Hindu'. The other part must be asked and which is 'Would he have painted those pictures if he would have been hindu' or 'did he make those paintings because he was non-hindu'. I do not have great understanding of paintings, but I never understood what 'nudity' added to those pictures or how 'nudity' is linked with 'beauty' in those pictures, if there is any beauty in those pictures. I guess Nemade is right in the sense, those paintings fail to appeal just as pictures.
    Why we can't accept that even if an artist proclaims liberty or/and secularism, he might not succeed in erasing all footprints of biases. Hussain's case was one of that. He was/might be progressive, liberal, secular but knowingly or unknowingly he drifted.

    ReplyDelete
  5. Harish and Mukund, thanks for your responses. Ecounter with Reality, since Harish has covered the point that you have raised, I need not respond. Thanks for your reaction.
    Sunil Tambe

    ReplyDelete
  6. ekhadyane devatanchi vikrut chitra kadhalyacha itihas pahilyandach ghadala...to hindu asata tar cha prashnach udbhavat nahi...tyalahi konatya na konatya swarupat lokanchya ragala samora java lagala asata...

    ReplyDelete
  7. हुसेन हे खूप मोठे चित्रकार होते .या देशाने त्याची कदर केली नाही आसे नाही .पुरस्कार ,बहुमान पैसा ,खासदारकी सर्व बाबी ..पण त्यांना देशांतर करण्याची गरज नव्हती .हा निर्णय त्यांचा खाजगी होता .ते हिंदू आसते तर त्यांनी हा निर्णय घेतला असता का ? यापेक्षा एका राज्य सभेच्या सदस्य राहिलेल्या माणसाला हा निर्णय घ्यावा लागला हि बाब गंभीर वाटते ... मला वाटते देश आणि यादेशातील लोकशाही याला जबाबदार धरण्या पेक्षा हुसेन हे त्याला अधिक जबाबदार आहेत आधी देश नंतर चित्रकला

    ReplyDelete
  8. हुसेन हिंदू असता तर त्याने देवांची अशी चित्रं काढलीच नसती, आणि म्हणून त्याला देशांतर करायची गरज पडलीच नसती.
    हुसेनच्या इतर वागणूकी बद्दल पण लिहिले असते तर लेख परीपूर्ण झाला असता.

    ReplyDelete
  9. मुळात देव देवतांच्या वस्त्र प्रावरणाना, त्यांच्या अस्तित्व रुपाला आताच्या संस्कृती चे निकष लावून इतरांनीही हेच मान्य केले पाहिजेत असा आग्रहच चुकीचा आहे.

    माणूस सामाजिक दृष्टया प्रगत बनत गेला तस तशा त्याच्या सांस्कृतिक अभिरुची व संस्कार बदलत गेले. त्यानुसार देव देवतांच्या प्रतिमाही कालागतिक सौंदर्याच्या आणि शौर्याच्या बदललेल्या कल्पनांनुसार आपणच बदलल्या!

    या आपल्या सांस्कृतिक चौकटित आपण देवाना ही बंदिस्त केले. त्याहुन मुक्त होऊ पाहणाऱ्यांना आपण निर्माण केलेल्या निकशांच्या जोरावर धर्म द्रोही ठरवले!

    हुसेन द्रोही ठरले ते या चश्मयातून! वास्तविक आदिम प्रेरणा वगैरे जास्त नैसर्गिक आणि म्हणून देवाच्या जास्त जवळ जाणाऱ्या असतात हेच आपण विसरलो आहोत. नग्नतेला आपल्या डोळ्यांनी अश्लील ठरवले. वास्तविक दोष आपल्या डोळ्यांचा! पण मान्य करणार कोण?
    -- अवधूत खरमाळे

    ReplyDelete