१७ सप्टेंबर २००९ रोजी, रघू दंडवते वर लिहिलेल्या स्फुटाने मोकळीक सुरु झाली. काही पोस्ट अगोदरच लिहून हाताशी ठेवल्या होत्या जेणेकरून आठवड्याला एका लेखाचा रतीब टाकता यावा. त्यामुळेही असेल कदाचित वा आरंभशूरपणाही असेल परंतु २००९ सालात सर्वाधिक मोकळीक (२७) प्रसिद्ध झाल्या. २०१० सालातल्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ ३१ पोस्ट प्रसिद्ध झाल्या.
ब्लॉग लिहिताना विषयाचं बंधन नको म्हणून नाव ठेवलं मोकळीक. सतीश तांबेने या नावाचा कॉलम दिनांक साप्ताहिकात चालवला होता. त्याचं पुस्तक होऊ शकलं असतं. त्याने पुस्तक काढलं नाही म्हणून मी त्याचं नाव पळवलं नाही तर ते काळाच्या अडगळीत जाऊन पडलं असतं. चाळीशी वा त्यापेक्षा अधिक वयाचा वाचक डोळ्यासमोर ठेवूनच मराठी वर्तमानपत्रांत लोक लिहित असतात. बातमीदारी करताना मात्र वाचकाचं वय १२ ते १५ असावं असं गृहित धरतात. असे अनेक बारके बारके मुद्दे नदीम गायकवाड, रमेश जाधव यांच्याशी गप्पा मारताना ध्यानी आले त्यामुळे ब्लॉग सुरु करण्याचा विचार पक्का झाला.
मोकळीकची गेल्या सहा महिन्यांची आकडेवारी पाह्यली तर हिंदू या कादंबरीवरील पोस्टना सर्वाधिक वाचक लाभला आहे. त्यानंतर क्रम लागतो, कापूसकोंड्याची गोष्टः पिपली लाइव्ह, पुरुषप्रधान पत्रकारिता, कांद्याची चाळ, कॉर्पोरेट शैली या पोस्टना. रघू दंडवते, मोहन गुंजाळ या मित्रांवर लिहिलेल्या स्फुटांना एक वर्ष उलटून गेल्यावरही वाचक आहे. दर आठवड्यात रघु दंडवतेवरील लेख चार-आठ लोकांनी तरी वाचलेला दिसतो.
मोकळीकचा सर्वाधिक वाचक भारतातला आहे. त्यानंतर अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, कॅनडा, यांचा क्रमांक लागतो. हाँगकाँग, स्वीडन, जपान, इंग्लड, लाटविया, फ्रान्स, घाना, मेक्सिको, चीन, काही आठवड्यात तर दक्षिण आणि उत्तर कोरिया, थायलंड यांचेही नंबर लागले. वाचकांची संख्या नेमकी सांगता येत नाही पण पेजरिव्ह्यूजची संख्या ब्लॉगवर मिळते. त्यानुसार १ मे ते ऑक्टोबर ७, २०१० पर्यंत एकूण २४०० पेजरिव्ह्यू नोंदवले गेले आहेत.
मोकळीकला भेट देणारे बहुसंख्य वाचक कळते-समजते या ब्लॉगवरून येतात. थिंक महाराष्ट्र आणि फेसबुक या मुक्कामाहूनही मोकळीककडे वळणारे अनेकजण आहेत. गुगुल सर्चवरून मोकळीकला येणार्यांची संख्या कमी आहे. मोकळीकचे फॉलोअर्सही बरेच आहेत. ते वेगळ्या मार्गाने येतात. दोन टक्के लोक आयपॅड वा आयफोनवर मोकळीक वाचतात असंही ब्लॉगवरच्या स्टॅटमध्ये दिसतं. म्हणजे मराठी ब्लॉगचा स्वतंत्र आणि मोठा वाचकवर्ग आहे. हा वाचक अर्थातच तरूण आहे. कंप्युटर आणि इंटरनेट कनेक्शन त्याच्या हाताशी जवळपास २४ तास आहे, असं दिसतं.
अशोक शहाणे, प्रताप थोरात, हेमंत दिवटे, अनिल अवचट, मुकुंद टांकसाळे, ज्ञानदा देशपांडे, वैशाली चिटणीस, मेघना ढोके, सुनील कांबळे यासारख्या लेखन-वाचन व्यवहारातल्या व्यक्तींनी मोकळीकला प्रतिसाद दिला. बहुतेकांनी त्यांच्या प्रतिक्रीया रोमन लिपीत दिल्या आहेत. अनेकांनी तर भाषाही इंग्रजीच वापरली आहे. म्हणजे मराठीत टाइप करणं अजूनही कित्येकांच्या अंगवळणी पडलेलं नाही.
चालू घडामोडींमधले अनेक विषय असे होते की त्यावर पुस्तक लिहिण्याएवढा ऐवज नसला तरी भक्कम आशयसूत्रं माझ्याकडे आहेत. पुस्तकाचं लिखाण होत नसेल तर ब्लॉगच्या निमित्ताने किमान पुस्तकाचा सांगाडा नाही तर आवाका ध्यानी यावा म्हणून मोकळीक लिहायला सुरुवात केली. एक वर्षभरातल्या ५७ पोस्टनंतर पुस्तकांचे तीन-चार विषय हाती लागले. कापूसकोंड्याची गोष्ट, डाळ-भात वा अन्न सुरक्षा आणि आसाम यापैकी एका तरी विषयावर २०११ सालात एखादं पुस्तक लिहिता आलं तर ती एक वर्षाच्या मोकळीकीची कमाई ठरेल.
असो.
आम्ही त्या पुस्तकाची नक्कीच वाट पाहू.
ReplyDeleteखरंतर मोकळीकमधील सगळे लेख मिळूनही एक पुस्तक होऊ शकेल.
पुस्तकातील सर्वच लेख एकाच विषयावरील असावेत असा काही नियम नाही.
आणि एका सूत्राचे म्हणाल, तर सुनील तांबे यांचे विविध विषयांवरील विचार हे नाही का एक सूत्र होऊ शकणार?
- विसोबा
’मोकळीक’ या नावाबद्दल वाचून मजा वाटली. मला वाटलं होतं की ही कोलाटकरांची ’जळती मोकळीक’ आहे. असो. आसाम, कृषि हे सारे विषय़ सुंदरच आहेत.-- पण मला त्यापूर्वी वाचायला आवडेल शाम मनोहरांवरचा तुमचा क्रिटीक.
ReplyDeleteThanks for these wonderful thought-interventions. Its a very different kind of 'narrative journalism'. Here the description is analytically composed and thus reveals a lot. I enjoy your style the most!- Dnyanada
विसोबा आणि ज्ञानदा यांचे आभार. पुस्तक लिहायचा संकल्प जाहीरपणे सोडला आहे त्यामुळे तो पूर्ण करावा लागेलच. २०११ त्यासाठीच आहे.
ReplyDeleteसुनील
I liked your blog , and detailed analysis you did of it.
ReplyDeleteI find it difficult to search for older, Popular posts , that you have referred in this post. My suggestion is add widget on left side , which shall show top 5 or 10 most popular posts on blog, it is available on blogger.
Thanks ,
With Regards
Santosh