Wednesday, 27 October 2010

अरूंधती रॉयः उपटसुंभ लेखिका

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही या अर्थाचं विधान केल्याबद्दल अरुंधती रॉय यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करता येईल काय याची चांचपणी सरकारी पातळीवर सुरु झाली आहे. एका देशाची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान हे दोन देश निर्माण करण्यात आले. याचा अर्थ भारत वा पाकिस्तान हे एका देशाचा भाग होते. अर्थातच काश्मीरही त्याच देशात होतं. काश्मीरची स्थिती नेपाळप्रमाणे नव्हती. काश्मीर भारताचा भाग आहे की पाकिस्तानचा यावरून दोन देशांमध्ये युद्ध, छुपं युद्ध, तह-चर्चा-वाटाघाटी सुरु आहेत. काश्मीरमधील फुटीरतावादी चळवळीमध्ये पाकिस्तानवादी आणि स्वतंत्र काश्मीरवारवादी असे दोन गट आहेत. असो.


अरुंधती रॉय यांच्या गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळाल्याने त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजावाजा होऊ लागला. या कादंबरीचं पद्धतशीर मार्केटिंग प्रकाशकाने केलं. त्यामुळे त्या कादंबरीचा जगातील अनेक देशात अनुवाद झाला. अरुंधती रॉय आज जे विचार मांडत आहेत त्यांचा मागमूसही या कादंबरीत नाही. ( कोणत्याही उत्पादनाप्रमाणेच पुस्तकाचंही मार्केटिंग करण्यात पाश्चात्य देशांनी चांगलीच प्रगती केली आहे. त्यामुळे सलमान रुश्दी, अरुंधती रॉय, अरविंद अडिगा, चेतन भगत यांच्यासारखे सामान्य लेखक आपल्या डोक्यावर चढून बसतात.) इंग्रजी भाषेतील कादंबरीला बुकर पुरस्कार दिला जातो. ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही अशा लेखकांनी इंग्रजी भाषेत केलेल्या लिखाणाला बुकर पुरस्कार देण्याची पद्धत इंग्रजी साम्राज्य लयाला गेल्यानंतर सुरु झाली. कॉमनवेल्थ ही संघटनाही याच सुमारास जन्माला आली. आपलं साम्राज्य संपलेलं असलं तरीही जागतिक अस्तित्व कायम राहावं या राजकीय डावपेचातून हे सांस्कृतिक राजकारण आकार घेऊ लागलं. आयर्लंड वगळता इंग्रजांच्या गुलामीतील बहुतेक सर्व राष्ट्रं या सांस्कृतिक राजकारणाला बळी पडली. असो.

अरुंधती रॉय या डाव्या विचाराच्या आयन रँड (भांडवलशाहीचं आणि टोकाच्या व्यक्तीवादाचं समर्थन करणारी समर्थ लेखिका म्हणून आयन रँड यांची ख्याती आहे. आयन रँड मूळची रशियन ज्यू. अमेरिके स्थलांतरीत झाल्यावर तिने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि कादंबरी लेखन केलं.) आहेत, अशी टीका आधुनिक भारताचे इतिहासकार, रामचंद्र गुहा यांनी नर्मदा आंदोलन जोमात सुरु असताना केली होती. सरदार सरोवर प्रकल्पावर अरुंधती रॉय यांनी लिहिलेल्या एका निबंधाची झाडा-झडती घेताना गुहा यांनी असं पुराव्यानिशी दाखवून दिलं की सदर निबंधांत अरुंधतीचं योगदान केवळ भाषा आणि शैलीचं आहे. निबंधातील सर्व मुद्दे इकॉनॉमी अँड पोलिटीकल विकली या मान्यवर नियतकालीकात काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका निबंधातून उचललेले आहेत, असा दावा गुहा यांनी केला होता. पर्यावरण आंदोलनाच्या इतिहासावरही गुहा यांनी दोन ग्रंथ लिहिलेले असल्याने त्यांचा या विषयातील अधिकार नाकारता येणार नाही. अरुंधती रॉय यांची राजकीय समज रा.स्व.संघाच्या कार्यकर्त्यापेक्षा अधिक नाही, अशी टीकाही गुहा यांनी केली होती. हिंदू या दैनिकातील स्तंभात गुहा यांनी अरुंधतीवर टीकेची तोफ डागली होती. त्यावेळी एन. राम फ्रंटलाइनचे संपादक होते. गुहा यांनी हिंदू दैनिकात केलेल्या टीकेसंबंधात अरुंधतीची मुलाखत एन. राम यांनी फ्रंटलाइनमध्ये प्रसिद्ध केली. फॉर द ग्रेटर कॉमन गुड या निबंधात आपण सरदार सरोवर प्रकल्पाबाबत आपण नवं संशोधन केलं आहे, नवा मुद्दा मांडला आहे असं अरुंधतीला याही मुलाखतीत सांगता आलं नाही. अर्थात गुहा यांच्यावर तिने भरपूर तोंडसुख घेतलं.

भारत या देशाची निर्मिती आणि जडण-घडणीची प्रक्रिया यासंबंधात अरुंधती पूर्णपणे अनभिज्ञ आहे हे तिच्या अनेक पुस्तकांवरून वा निबंधांवरून स्पष्ट होतं. अमेरिकन भांडवलशाही, साम्राज्यवाद आणि शासनसंस्था यांना टोकाचा विरोध, उपेक्षित आणि शोषित समाजघटकांच्या प्रश्नांशी एकरूप होण्याची तळमळ हे अरुंधतीचे गुण आहेत. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि निडरपणा यामुळे तिच्या व्यक्तिमत्वाला झळाळी प्राप्त झाली आहे. मात्र ती कोणत्याही समाजघटकाचं, संघटनेचं वा संस्थेचं प्रतिनिधीत्व करत नाही. नर्मदा बचाव आंदोलन, माओवादी चळवळ यांना तिच्यामुळे थोडीफार प्रसिद्धी मिळाली. अरुंधतीच्या विधानांची वा भाषणांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमं आवर्जून घेतात. त्यामुळे भारतातील इंग्रजी भाषेतील वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रंही तिच्या वादग्रस्त विधानांवर चर्चा करत असतात.

अरुंधती रॉय जरी दलित, उपेक्षित, शोषित समूहांच्या लढ्याला पाठिंबा देत असली तरीही हे समूह तिचे वाचक नाहीत. अर्थातच या समूहांचं प्रतिनिधीत्व ती करत नाही. (तसा दावाही त्यांनी केलेला नाही.) तिचा वाचकवर्ग आंतरराष्ट्रीय आहे. त्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे पण तो वर्ग उपेक्षित वा शोषित नाही. म्हणजे ज्या समूहाबद्दल अरुंधती बोलते आहे त्या समूहाशी तिचं नातं नाही. तिथे तिची ओळख इंग्रजी भाषेतील लेखिका अशी आहे. असे लेखक उपटसुंभ लेखक असतात. अशा लेखकांना भारतातील इंग्रजी प्रसारमाध्यमांमुळेच प्रसिद्धी मिळते. या माध्यमांचा बडेजाव असेपर्यंत राष्ट्रीय समस्या वा प्रश्न सोडवण्यात अडचणी येणारच कारण मिडिया आता केवळ निरीक्षकाची भूमिका निभावत नाही तर कर्त्याची भूमिका निभावत आहे. इंग्रजी माध्यमांचा बडेजाव कमी करण्यासाठी भारतीय भाषांमधील वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रं यांनी प्रादेशिक दृष्टीतून राष्ट्रीय हितसंबंधांची मांडणी करण्याची व्यापक दृष्टी त्यांनी अंगी बाणवायला हवी. असो.

5 comments:

  1. सुनील,
    अरुंधती रॉयची जात तुझ्या लेखी काय हे कळले.. पण तिने जे वक्तव्य केलं आहे - की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग कधीच नव्हता - याबाबत तुझे म्हणणे काय.. किंबहुना.. त्याहूनही महत्वाचे म्हणजे राष्ट्रवाद, देशद्रोह या संकल्पनांचा आजच्या संदर्भात अर्थ काय, याबाबत सध्या लिहिणं अधिक आवश्यक आहे.
    जाता जाता.. अरुंधतीच्या आउटलुकमधील नक्षलवाद्यांवरील लेखाला सुधन्वा देशपांडे यांनी दिलेले उत्तरही वाचनीय होते.

    ReplyDelete
  2. अरुंधती आयन रॅण्ड आहे यात शंका नाही. भाषा, आवेश आणि स्वत:च्या मूल्यांबद्दलचा आत्मविश्वास, सारखं आहे. ही सिगारेटी ओढते का? असो.

    तिचा प्रतिवाद गुहासारखाच करायला हवा. ती ज्यांची बाजू घेते, ते तिचे वाचक नाहीत आणि जे वाचक आहेत, त्यांना तिच्या कन्सर्न्स परक्या, हे लॉजिक स्मार्ट आहे. पण ती रोमॅंटिक असल्याचं स्वत:च कबूल करते. आदिवासींच्या समस्यांचा तिचा अभ्यास नसेल, पण ती कोट करते, त्या फ़ॅक्ट्स खोट्या का? मला माहीत नाही. तिचं आवाहन सरळ सरळ भावनिक आहे. आजच्या समाजाच्या एका मोठ्या भागाची ती कॉन्शन्सकीपर आहे. आदिवासींसारख्या ’मुक्या’ समाजघटकासाठी ती दबाव निर्माण करते आहे.

    बाय द वे, God of small things is a good novel. Well crafted, rich in native references and of course captivating language. Great first novel.

    आणि काश्मीर भारताचा भाग कसा झालं, हा इतिहास interesting आहे. त्यातला सर्वात interesting भाग हा, की चतुर लॉजिकपासून सुरुवात करून, काश्मीरविषयी शंका घेणे म्हणजे केवळ ’भारतियांच्या भावना दुखवणे’च नव्हे, तर जवळ जवळ blasphemyच, इथपर्यंत येण्याचा कांगावखोर कावा तपासायचा नाही का? काश्मीरला १९६५ की ७० पूर्वी मुख्यमंत्री नसे, पंतप्रधान असे, हे सगळेच विसरले बहुतेक.
    हेही असो.

    ReplyDelete
  3. I like Rushdie as a writer. Loved his 'Midnight's Children' and am fond of his 'Haroon and the Sea of Stories'..I don't think Arundhati Roy and Salman Rushdie could be in the same league. As a writer she is way too mediocre. I find her writing lacking in any original thought or political depth. Chomskian charity is not enough to make someone a thinking being. Reasonably fine style with pathetically secondhand content.

    Pushing people to have an opinion about Arundhati Roy is a great media game.

    hi 'kalavalyachi jaati' navhe..khoopach calculative 'baheri yenare antariche dhaave' ithe. - Dnyanada Deshpande

    ReplyDelete
  4. माझा ब्लॉग वाचा - अरुंधती रॉय – एक ढोंगी विचारवंत http://wp.me/HoXT

    ReplyDelete
  5. Sir, I think you must have read the answer Arundhati gave to Ram's criticism. Ram's says he has written tow books on ecology and doesn't count the people displaced by dams. Arundhati is the outcome of this so called democracy which sets people who have created crimes of the order of crores and crores of rupees free. She has a point. The dire state of affairs says it all.

    ReplyDelete