Blog Archive

Sunday, 4 October 2009

शिवसेना पुराणात मनसेची वांगी

शिवसेना स्थापन झाली १९६७ साली आणि मुंबई महापालिका पूर्णपणे तिच्या ताब्यात आली १९८५ साली। तेव्हापासून आजतागायत मुंबई महापालिकेवर सेना-भाजप युतीचाच झेंडा फडकत राह्यलाय. याचा साधा अर्थ असा की मराठी माणसाचा मुंबईच्या लोकसंख्येतील टक्का जसा कमी होऊ लागला तशी शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढत गेली. मुंबई महापालिकेत ९० टक्के कर्मचारी मराठी आहेत. पण मान्यताप्राप्त युनियन शिवसेनेची नाही. मुंबईच्या बेस्ट उपक्रमातही ९० टक्के कर्मचारी मराठी आहेत पण युनियन शिवसेनेची नाही. महाराष्ट्र शासनाच्या सुमारे २५ लाख कर्मचा-यांमध्ये ८५ टक्के मराठी आहेत पण तिथेही कर्मचारी संघटनांमध्ये शिवसेनेला स्थान नाही. मुंबईच्या गिरणीकामगारांमध्ये ८५ टक्के मराठी भाषक होते पण सेनेच्या युनियनला स्थान नव्हतं. ज्या उद्योगांमध्ये वा आस्थापनांमध्ये मराठी माणसाचा टक्का कमी तिथे शिवसेनेच्या युनियनची ताकद मोठी. जिथे आपण अल्पसंख्य आहोत तिथे मराठी माणूस आक्रमक होतो, बाहूबळाचा चमत्कार दाखवतो आणि सत्तेत पाय रोवतो. जिथे मराठी भाषक बहुसंख्य आहेत तिथे मात्र सेनेची मात्रा चालत नाही. आपणच मूळ शिवसेना आहोत असा दावा करणा-या राज ठाकरेंचीही लाइन हीच आहे. मराठी माणूस खतरे में अशी आरोळी देऊन, बाहुबळाचं प्रदर्शन करूनच राज ठाकरेंनी स्वतःचं स्थान निर्माण केलंय. बाळासाहेब ठाकरे यांनी जसं कायद्याच्या कक्षेबाहेर स्वतःचं समांतर सत्ताकेंद्र उभं केलं नेमका तोच मार्ग राज ठाकरेंनीही अवलंबला आहे. जया बच्चन, करण जोहर इत्यादी तालेवार लोक त्यांची माफी मागून स्वतःची सुटका करून घेऊ लागले आहेत.

मराठी माणसाचा न्यूनगंड हेच सेनेचं आणि आता मनसेचं इंधन आहे। म्हणूनच मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट मराठी लोकांना भावतो. न्यूनगंडांने पछाडलेला मराठी मध्यमवर्गीय नायक शिवाजी महाराज आपल्या पाठिशी उभे आहेत हे समजताच नरवीर होतो. हीच मराठी माणसाची फँटसी आहे. १९९० च्या विधनासभा निवडणुकांपासून शिवसेनेने महाराष्ट्र पादाक्रांत करायला सुरुवात केली. काँग्रेसच्या म्हणजे साखर सम्राटांच्या, शिक्षण सम्राटांच्या राजकारणाला मतदार कंटाळलेले होते. मध्यम जातींची तर या राजकारणाने गळचेपीच केली होती पण तरुण मराठा रक्तालाही वाव मिळत नव्हता. काँग्रेसमधल्या गटा-तटांनी ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, साखर कारखाना, दूध सोसायट्या, खरेदी-विक्री संघ, क्रेडीट सोसायट्या ताब्यात ठेवल्या होत्या. सत्तेच्या वर्तुळात शिरकाव करण्याची संधीच मराठेतर समाजला मिळत नव्हती. ठराविक घराणी सोडली तर इतर मराठा कुटुंबातल्या तरुणांनीही आपल्या राजकीय महत्वाकांक्षा दडपून टाकाव्या लागत होत्या. हे समूह मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे वळले. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा करिष्मा त्याला कारणीभूत होता. मराठा स्ट्राँगमन याचं मराठी भाषांतर होतं मर्द मराठा. ही उपाधी इंग्रजी वर्तमानपत्रांनी शरद पवारांना बहाल केली होती. परंतु हा मर्द मराठा बाळासाहेब ठाकरेंचा केसही वाकडा करू शकत नव्हता. शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी उखडली, दंगल केली, बाहुबळाचं उघड प्रदर्शन केलं, विधनासभेने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली, श्रीकृष्ण आयोगाने हिंदु-मुस्लिम दंगलीचा ठपका बाळासाहेंबावर ठेवला तरिही कोणत्याही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याने बाळासाहेबांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. बाळासाहेब ठाकरे कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत हाच त्यांचा करिष्मा होता. त्यामुळे केवळ मराठीच नाही तर अनेक समूहांना विशेषतः सत्ताकांक्षी समूहांना बाळासाहेबांचं आणि सेना या शब्दाचं आकर्षण होतं. पारशी सेनाही मुंबईत स्थापन झाली होती (अर्थात तिचा बाळासाहेबांशी संबंध नव्हता).

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघांनीही आपल्या पुतण्यांना आधी राजकारणात आणलं. पण आपला वारसा मात्र पुत्राला वा कन्येला द्यायचं ठरवलं. कुटुंबामध्ये आपल्याला वारसा हक्क मिळणार नाही हे ओळखूनच राजने लोकांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेचा राजकीय वारसा मिळवण्याचं राजकारण सुरु केलं. त्याने बाळासाहेबांचीच नेतृत्वशैली उचलली. म्हणजे बेधडक, बेलगाम विधानं करणं, फटकळपणे रेषेतून आणि शब्दांतून व्यंगचित्रं काढणं. ही शैली तरूणांनाच नव्हे तर प्रौढांनाही भावते. आपण समांतर सत्ता केंद्र आहोत हे ठसवण्याची एकही संधी तो वाया घालवत नाही. जेट एअरवेजने नोकर कपातीची घोषणा केल्यावर कर्मचा-यांनी राजकडे धाव घेतली. जेट एअरवेजच्या कर्मचा-यांमध्ये मराठी माणसांचा टक्का फारच कमी असेल पण राजने तात्काळ आवाज दिला आणि जेट एअरवेजने नोकर कपातीचा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं।

मनसेने काँग्रेसकडून सुपारी घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे। पण राजकारणात हे अटळ असतं. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवसेनाही वसंतसेना म्हणून ओळखली जात होतीच. त्यावेळी सेनेच्या मदतीने काँग्रेसने गिरणगावातला कम्युनिस्टांचा प्रभाव मोडून काढला होता. पण आता त्याच काँग्रेसला सेनेला ठेचण्यासाठी मनसे हाताशी आली आहे. अशी संधी साधूनच मनसेचा किल्ला मजबूत करायचा राज ठाकरे यांचा विचार आहे. शिवसेनेचं नवनिर्माण म्हणजे मनसे, अशीच राज ठाकरे यांची भूमिका आहे. तीच त्यांच्या पक्षाच्या नावातही प्रतिबिंबित होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून मराठी भाषक हाच एक मोठा मतदारसंघ तयार व्हायला सुरुवात झाली. या आंदोलनाच्या काळात यशवंतराव चव्हाणांसारखा नेता केवळ ६०० मतांच्या फरकाने विजयी झाला होता, एवढा पाठिंबा संयुक्त महाराष्ट्र समितीला मिळाला होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या नेत्यांना या मतदारसंघांची ताकद ध्यानी आली नाही आणि वैचारिक भूमिकांच्या खडकांवर समितीचं तारू फुटलं. शिवसेना नामक संघटनेसाठी एक पोलिटीकल स्पेस त्यामुळे तयार झाली. मनसेने याच मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. म्हणूनच शिवसेनेला मनसेचा कडवा विरोध आहे. बाटगा अधिक कडवा असतो. संयुक्त महाराष्ट्र समिती, शिवसेना आणि मनसे, मराठी माणसाचा कडवेपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

4 comments:

  1. Our inferiority complex fuels Sena, and now MNS. Totally agree with u. Same holds true, to some extent, about Savarakarite-Hindutva (vis a vis Muslims), I think. There the complex arises from awareness of history, no?

    ReplyDelete
  2. शिवसेना राजकीय पक्ष म्हणून उभे रहाण्याच्या प्रयत्नात आहे तर मनसेला राजकीय मान्यता नको असून दबावगट म्हणून अस्तित्व पुरे ठरेल असे वाटते. दबावगट म्हटल्यावर निर्णयांच्या जबाबदार्या टाळता येतील असा राज ठाकरे यांचा समज असावा.

    ReplyDelete
  3. जगात सगळीकडे धर्म, भाषा व संस्कृतीचा (भारताच्याबाबतीत आणखी एक घटक जातीं) वापर सत्ताकारणासाठी करुन घेण्यात आला हे खर आहे. मी आपल्या मताशी सहमत आहे. आपल्याकडे भाषावार प्रांतरचना करून या भाषिक अस्मितेची बीजे पेरली गेली. त्याचा उपयोग नेमका कसा करायचा हे त्यावेळच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील वैचारीक नेत्तृत्वाला कळलेच नाही. कारण आपण म्हटल्याप्रमाणे मराठी भाषकांचा मोठा मतदारसंघ तयार होत होता हेच बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करताना हेरले होते. एक मात्र नक्की हा मतदारसंघ टीकून ठेवण्यासाठी भाषिक अस्मिता जिवंत ठेवायची हेही त्यापाठीमागील कारण होते.

    आता हीच गोष्ट राज ठाकरे पुढे चालवित आहेत यात काहीच शंका नाही. त्यात या भाषिक सत्ताकारणातील राजकीय वारश्यांचा आपण केलेला उल्लेखही महत्वाचा आहे.

    ReplyDelete
  4. I feel MNS is moral booster for middle class lower middle class segment. They were looking out for charismatic personality which they got through Raj. I have seen the difference in marathi manoos travelling in local train, started talking in marathi now which he was hesitant earlier.

    ReplyDelete