बीटी कापसाच्या बियाण्याच्या जनुकामध्येच असा बदल करण्यात आला आहे की कापसाची बोंड खाणारी अळी या बियाण्यापासून तयार झालेल्या बोंडावर हल्ला करू शकत नाही. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात वाढ होते आणि उत्पादन खर्चात बचत होते. बीटी कापसाचं बियाणं भारतातमध्ये वादग्रस्त ठरलं आहे. या बियाण्याच्या किंमती आणि त्यावर होणारा अन्य खर्च यामुळे शेतकरी सावकारी पाशात अडकले आणि त्यामुळेच शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये कापूस उत्पादकांची संख्या सर्वाधिक आहे, असा दावा अनेक अभ्यासकांनी, आंदोलकांनी केला आहे. बियाण्यामध्ये जनुकीय बदल करणं पर्यावरणाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, असा नैतिक प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. अमेरिकेतल्या मोन्सॅटो कंपनीने बीटी कापसाचं बियाणं बाजारात आणल्याने या वादाला अर्थ-राजकीय परिमाणही मिळालं आहे. बीटी कापसाच्या बियाण्याचा शोध लागण्यापूर्वीही भारतातील कापूस उत्पादकांची स्थिती अन्य कोणत्याही शेतक-यासारखीच हलाखीची होती.
गहू वा धान यांना ओंब्या वा लोंब्या आल्या की ते रोपं पिवळी पडतात. (देवाजीने करूणा केली भाते पिकूनी पिवळी झाली... अशा ओळी म्हणूनच कवीला सुचल्या.) कापसाच्या पिकाचं तसं काही नसतं. बोंडं आल्यानंतरही कापसाचं झाडं वाढतच राहतं. कापसाचं ठोक पद्धतीने उत्पादन घेता यावं म्हणून कापसाच्या अनेक जाती माणसाने विकसीत केल्या. नैसर्गिक कापसाची सर्वात परिचित जात म्हणजे सावरीचा कापूस. सावरीच्या कापसालाच संस्कृतात श्याल्मली म्हणतात. सावरीच्या झाडापासून मिळणा-या कापसाचं व्यापारी तत्वावर उत्पादन करणं शक्य नाही. कोकणात आणि देशावरही परसात कापसाचं झाडं दिसायचं. तेही चांगलं ८-१० फूट उंचीचं असायचं. त्या कापसाच्या वाती वळल्या जायच्या. व्यापारी तत्वावर लागवड करण्यायोग्य चारच कापसाच्या जाती आहेत. त्यापैकी एक अमेरिकेत, एक आफ्रिकेत तर दोन भारतात आहेत. लागवडीयोग्य कापसाच्या शेकडो जाती गेल्या हजारो वर्षांमध्ये विकसीत करण्यात आल्या आहेत. मूळ चार जातींमधील गुणधर्मच या व्यापारी जातींमध्ये उतरले आहेत. लांब आणि मजबूत धागा हे अमेरिकन कापसाच्या जातीचं वैशिष्ट्य आहे. मध्यम आणि कमी मजबूत धागा हे आफ्रिकन कापसाच्या जातीचं वैशिष्ट्य तर आखूड आणि नाजूक धागा ही भारतीय कापसाच्या जातींची वैशिष्ट्यं आहेत. सुप्रसिद्ध ढाक्याची मलमल या आखूड आणि नाजूक धाग्यानेच विणली जायची.
हेरॉडोटस हा ग्रीक विद्वान आद्य इतिहासकार म्हणून ओळखला जातो. तो खैबरखिंड ओलांडून तेव्हाच्या हिंदुस्थानात आला होता. कापसाच्या सुतापासूनही कपडे विणता येतात हे नोंदवणारा तो पहिला पाश्चात्य विद्वान. भारतातले लोक ज्या लोकरीपासून सूत काढतात ती लोकर झाडावर लागते, असं त्याने नोंदवलं आहे. गूळ बनवण्याचा कारखाना पाह्यल्यावर भारतातले लोक गवतापासून मध बनवतात असं मेगॅस्थेनिस या ग्रीक प्रवाशाने नोंदवलं आहे. मेगॅस्थेनिस हा अलेक्झांडरसोबत भारतात आला होता. मेगॅस्थेनिसला वा हेरॉडोटसला फक्त ग्रीक भाषा येत असे. परंतु ग्रीस देशातून भारताताच्या वायव्य सीमेपर्यंत त्यांना कुठेही भाषेची अडचण जाणवली नाही म्हणजे मोठ्या प्रमाणावर ग्रीक लोक जगभर पसरलेले होते. कोणत्याही भारतीयाने प्राचीन काळात परदेशांची म्हणजे चीन, म्यानमार वा मलेशिया यांचीही वर्णनं लिहून ठेवलेली नाहीत. तूर्तास हे विषयांतर थांबवून पुन्हा कापूसकोंड्याच्या गोष्टीकडे वळूया.
कापसाचा शोध भारतात लागला, कापसाची लागवडही सर्वप्रथम भारतातच सुरु झाली आणि कापसापासून वस्त्रनिर्मितीही भारतातच सुरु झाली. चीनमध्ये रेशमाचा शोध लागला. चेंगीजखानाने मंगोलियापासून स्पेनपर्यंत मुलुखगिरी केली आणि सिल्क रूट सुरु केला. चीनमधील रेशीम आणि भारतातील सुती वस्त्रं पुढे याच मार्गाने युरोपात गेली. (चीनमधली सफरचंद आणि पीच ही फळंही सिल्क रुटनेच युरोपात गेली.) मात्र तरिही सुती वस्त्रांची बाजारपेठ मर्यादीतच होती. बाबरने तर बाबरनाम्यात असं लिहूनच ठेवलंय की भारतीय लोकांना पोषाखाची आवडच नाही. लाज राखणापुरतीच वस्त्रं ते कंबरेला गुंडाळतात म्हणजे अर्धनग्नच असतात. कापसाचा, सूत काढण्याचा, विणण्याचा शोध प्राचीन काळात लागूनही भारतीय लोक अंगभर वस्त्रं दीर्घकाळपर्यंत म्हणजे बाबरच्या आगमनापर्यंत वापरत नव्हते. आर्य चाणक्य वा कौटिल्य या जगातील पहिल्या अर्थशास्त्रज्ञाने लिहून ठेवलंय की अन्नधान्याच्या शेतीला अग्रक्रम द्यावा, त्यांनतर भाजी-फळे यांना प्राधान्य द्यावं आणि सर्वात शेवटी कापूस, ऊस अशा नगदी पिकांना पसंती द्यावी. म्हणजे गंगा-यमुनेच्या सुपीक खो-यातही कौटिल्य पोटापुरत्या शेतीलाच प्राधान्य देत होता. गरजा मर्यादीत ठेवा असं सांगणारा कौटिल्य हा बहुधा जगातील पहिला आणि शेवटचा अर्थशास्त्रज्ञ असावा.
भारतीय कापसाला युरोपात उदंड मागणी होती. तरिही कापसाचं व्यापारी उत्पादन आणि वस्त्रोद्योगाची वाढ भारतात जोमाने झाली नाही. ब्रिटीशांच्या आगमनानंतरही भारतीय सूती वस्त्रांची निर्यात युरोपात होत होती. किंबहुना या काळात भारत पक्क्या मालाची निर्यात करणारा देश होता. इंग्लडात औद्योगिक क्रांती झाल्यानंतर मात्र भारताच्या वस्त्रोद्योगाला उतरती कळा लागली. भारतातून कच्च्या मालाची अर्थात कापसाची निर्यात होऊ लागली आणि पक्क्या मालाची—कपड्याची आयात होऊ लागली. या शोषणातूनच भारतीय राष्ट्रवादाच्या आर्थिक अंगाची मांडणी दादाभाई नवरोजी यांनी केली. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. स्वदेशी आणि त्यानंतर खादी म्हणजेच कापूस आणि वस्त्रोद्योग प्रदीर्घकाळपर्यंत स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी होता. औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लडात आणि अन्य युरोपियन देशात भारतातून निर्यात होणारा कापूस देशी नव्हता तर अमेरिकन होता. कापूसकोंड्याच्या गोष्टीची सुरुवात तिथे झाली. स्वातंत्र्योत्तर काळातही या गोष्टीत फारसा बदल झाला नाही. कापूस उत्पादक शेतकरी आणि कापड उद्योगातील कामगार यांच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. दोन शतकं उलटली तरिही कापूसकोंड्याची गोष्ट सुरुच आहे.
टीप- जिज्ञासूंनी विविध संदर्भ उदा. हेरॉडोटसचा वा मॅगेस्थेनिसचा काळ, कापसाच्या मूळ चार जाती इत्यादी, स्वतःच शोधावेत. त्यासाठी विकीपिडिया किंवा इंटरनेटवरील अन्य वेबसाईटना भेटी द्याव्या किंवा ग्रंथांचा आधार घ्यावा.
कापूसकोंड्याच्या गोष्टीची सुरूवात तर झकास झालीय. कृ्षी शास्त्राबरोबरच कापसाचे राजकीय, आर्थिक आणि सामजिक संदर्भ उलगडणारी ही मांडणी नवीन आहे. कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखीच ही कापसामुळे होणा-या कोंडीची गोष्ट संपत नाही, या दोन्ही गोष्टी या शीर्षकातूनच ध्वनित होतात. पहिला भाग तर मस्तच जमला आहे. पुढल्या भागाविषयी उत्सुकता आहे. ते ही सविस्तर आले तर त्याचा खूप उपयोग होईल. कापसावर अशा स्वरूपाचे लिखाण मराठीत तरी कोणी केलेलं दिसत नाही. कापसाच्या सेंद्रिय शेती बाबत हिंदूच्या एका पत्रकाराने सखोल अभ्यास करून एक चांगला रिपोर्ट इंग्रजीत तयार केला होता. अर्थात तो बराचसा शास्त्रीय अंगाने जाणारा होता. सामाजिक संदर्भाच्या खोलात जायचं त्यांनी टाळलं होतं. त्यांच्या संशोधनाचा स्कोपच त्यांनी तसा ठेवला होता. असो. गरजा मर्यादीत ठेवा असं सांगणारा कौटिल्य हा बहुधा जगातील पहिला आणि शेवटचा अर्थशास्त्रज्ञ असावा, ही टिप्पणी/निरीक्षण मार्मिक आहे. कारण आम्हाला कॉलेजात जे अर्थशास्त्र शिकवलं होतं, त्याची सुरूवातच मुळी वॉन्टस् आर अनलिमिटेड या वाक्यापासूनच होती. ब्लॉगवरच्या या लेखनामुळे एक वेगळा पर्सपेक्टिव्ह मिळेल असं वाटतंय.
ReplyDeleteek number!!! kasali jabari mahiti aahe. sahich!!!
ReplyDeletemala kharach evadhe mahit navhate.
thank you!!!
Found this interesting history.
ReplyDeleteNow Americans have won several battles of Plassey. We are a colony