आणिबाणीनंतर राष्ट्र सेवा दलात दोन गट पडले. लोकशाही समाजवादी नागरिक घडवण्याचं कार्य सेवा दलाने करावं की लोकशाही समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते निर्माण करणं हे सेवा दलाचं कार्य आहे, या मुद्द्यावरून हे दोन गट पडले होते. आणिबाणीच्या काळात सेवा दलाच्या कार्यात अनेक तरूण कार्यकर्ते ओढले गेले. त्यांच्यावर अर्थातच जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या संपूर्ण क्रांतीच्या ना-याचा प्रभाव होता. समाजवादी चळवळीमध्ये आलेला हा तरूण प्रामुख्याने ग्रामीण भागातून आलेला होता. मात्र आणिबाणीनंतर समाजवादी पक्षाचं विसर्जन जनता पक्षामध्ये झाल्याने या तरूणांचा तेजोभंग झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांशी, संघटना काँग्रेस वा तत्सम विचाराच्या नेतेमंडळींशी त्यांची नाळ जुळत नव्हती. समाजवादी पक्ष अस्तित्वात होता त्यावेळी सेवा दलाच्या कार्याचं स्वरूप शैक्षणिक वा सांस्कृतिक असणं स्वाभाविक होतं मात्र समाजवादी पक्षाच्या विसर्जनानंतर सेवा दलाने राजकीय भूमिका घ्यावी, सामाजिक संघर्षात उतरावं याबाबत नवा तरूण आग्रही होता. विशेषतः जातीप्रथेच्या निर्मूलनासाठी सेवा दलाने सामाजिक संघर्षात उतरणं आवश्यक आहे, असं या गटाचं म्हणणं होतं. एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, बापूसाहेब काळदाते इत्यादी नेत्यांबद्दल तरूणांना आदर होता, आत्मीयता होती, मात्र समाजवादी चळवळीचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी या नेत्यांनी सेवा दलाच्या कार्यकक्षा वाढवाव्यात असं नव्या तरूणांचं म्हणणं होतं.
सेवा दलाच्या कार्याचं स्वरूप बदलण्याला समाजवादी आंदोलनातील अनेक नेत्यांचा विरोध होता. सेवा दल ही शाळा आहे. या संघटनेने सामाजिक वा राजकीय संघर्षात उतरू नये. या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या मुलांनी सामाजिक वा राजकीय काम करण्यासाठी कामगार संघटना, राजकीय पक्ष वा अन्य संघटनांमध्ये जावं आणि लोकशाही समाजवादी चळवळ वाढवावी असं बुजुर्ग नेत्यांचं म्हणणं होतं.
सेवा दला मुंबई विभागाने नव्या विचारांच्या समाजवादी तरूणांचं एक महाराष्ट्रव्यापी शिबिर आयोजित केलं होतं. त्यामध्ये मी मोहन गुंजाळला पहिल्यांदा पाह्यला. मोहन माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठा असावा. खादीचे कपडे, दाढी, काळा हसरा चेहेरा. अंगाने भक्कम आणि साधा सरळ माणूस. कोणालाही मदत करण्यास सदा तत्पर. संघर्ष कसा सामाजिक कार्य करताना संघर्ष कसा अपरिहार्य ठरतो हे सोदाहरण त्याने सांगितलं. तो येवल्याचा. जेपींच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या लोकसमिती या संघटनेत तो काम करायचा. शेतमजूर, भटके-विमुक्त यांच्यात तो काम करायचा. त्या शिबिरानंतर वर्ष-सहा महिन्यातच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर जो लाँगमार्च निघाला त्यात आम्हीही सामील होतो. नाशिकच्या सबजेलमध्ये आम्ही ८ दिवस होतो. तुरुंगात भाषणं, चर्चा, संवाद, खेळ आयोजित करण्यात मोहन आणि सुरेश पगारे यांचा पुढाकार असायचा.
मोहनची बायको निर्मला. ती पोस्टात नोकरीला होती. मोहन पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याने घर-संसाराची जबाबदारी तिनेच पेलली. मोहनच्या आईला कॅन्सर झाला. तिला मुंबईतल्या इस्पितळात दाखल करण्यासाठी मोहन येवल्याहून आला. तो टाटा कॅन्सर इस्पितळातच राह्यला. म्हणजे रस्त्यावरच. अनेक मित्र, कार्यकर्ते मुंबईत होते. त्यांना तो भेटला पण अन्य कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांबरोबरच तो राह्यला. टाटा कॅन्सर रुग्णालयाने कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना रोजगार देण्याचीही व्यवस्था केली होती. त्यामुळे जेवणाचा वगैरे खर्च सुटायचा. प्यूनचं काम करून तो आईची शूश्रूषा करायचा. टाटा कॅन्सर हॉस्पीटलाच्या ह्या सेवेबाबत त्याने मुंबईच्या एका वर्तमानपत्रात लेख लिहून त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.
येवल्याच्या सेवा दलाच्या गटाने मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादाची कास धरली. समाजवादी चळवळीकडून तो गट सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाकडे सरकला. समतेची स्थापना करायची तर भक्कम तत्वज्ञानावर आधारित राजकीय पक्षाची गरज आहे. मार्क्सवादाला फुले-आंबेडकरवादाची जोड दिली तरच असं तत्वज्ञान निर्माण होऊ शकतं, अशी या गटाची धारणा होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडलेले कॉ. शरद पाटील यांनी मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद या तत्वज्ञानाची पायाभरणी केली. धुळ्याच्या आदिवासी क्षेत्रात ते काम करायचे. या विचारधारेनुसार भारतातील क्रांतीचा नायक आदिवासी होता. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षात गेल्यावर मोहनही धुळ्याला काम करायला गेला. त्यांनतर माझा आणि त्याचा संबंधही कमी झाला. या काळात एकदा तो भेटला तेव्हा गप्पा मारताना मी त्याला म्हटलं, तुमच्या पक्षाच्या तत्वज्ञानाविषयी मला वाद घालायचा नाही पण भारतात आदिवासींचं लोकसंख्येतलं प्रमाण ५ ते ६ टक्के असावं, एवढ्या अल्पसंख्येने असलेला समूह क्रांतीचं नेतृत्व कसं करू शकेल. माझ्या प्रश्नामुळे मोहन किंचितही विचलीत झाला नव्हता. तो हाडाचा कार्यकर्ता होता. वैचारीक वादात त्याचा रस केवळ प्रयोजनापुरता होता. कार्यकर्ता असल्याने नेता मिळाला की तो आश्वस्त होत असे. कदाचित् त्यामुळेच तो शरद जोशींच्या शेतकरी संघटनेकडे आकृष्ट झाला. संघटन कौशल्याच्या जोरावर तो शेतकरी संघटनेचा राज्यपातळीवरील नेताही झाला. विधानसभेची निवडणूकही त्याने शेतकरी संघटनेच्या तिकीटावर आणि जनता दलाच्या चिन्हावर लढवली. येवला मतदारसंघातून. त्याच्या पोस्टरवर मोहन गुंजाळ (पाटील) असं नाव होतं. मोहन लोकप्रिय होता पण निवडणूकीच्या राजकारणात त्याची डाळ शिजली नाही. त्या निवडणूकीनंतर मोहनची भेट झाल्याचं मला आठवत नाही. दोन महिन्यांपूर्वी येवल्याला गेलो होतो अर्जुन कोकाटे भेटला. शिवाजी गायकवाडही होता. खूप वर्षांनी आम्ही भेटलो. पण खूप माणसांच्या गराड्यात होतो. मोहनची चौकशी केली. पण तो गावात नव्हता त्यामुळे त्याला भेटायचं राहून गेलं. एकदा सवड काढून काढून येवल्याला ये, असं अर्जुन म्हणाला.
बुधवारी (१४ ऑक्टोबरला) रात्री मोहनचं निधन झालं. संजीव सानेचा एसएमएस आला. अरूण ठाकूर आणि अर्जुनला मी फोन केला. सात-आठ दिवस मोहन हॉस्पीटलातच होता. झोपेतच त्याने शेवटचा श्वास घेतला. मोहन आणि सुरेश दोघांचा प्रवास समाजवादी चळवळीकडून सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाकडे तिथून शेतकरी संघटना असा झाला. मोहन त्यानंतर मध्यममार्गी राजकारणात स्थिरावला. सुरेशचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं. दोघेही सपाटून वाचन करणारे, संघटनकुशल कार्यकर्ते होते. आपणही कुणाचे तरी रोल मॉडेल आहोत हे त्यांना कधीच कळलं नाही. अनुयायांना सहकारी बनवणारे हे दोघे नेत्याच्या शोधात होते. त्यांच्या कल्पनेतला आदर्श नेता त्यांना कधीच गवसला नाही.
No comments:
Post a Comment