Tuesday, 29 September 2009

बाजारातली तूर २

हरित क्रांती होण्याअगोदर तूर आणि गव्हाच्या उत्पादनात फारसा फरक नव्हता. हरित क्रांतीनंतर गव्हाचं उत्पादन झपाट्याने वाढलं. म्हणजे जवळपास पाच पटीने वाढलं. सिंचनाची व्यवस्था झाली, दर एकरी अधिक उत्पादन देणा-या गव्हाची बियाणं शेतक-यांना मिळाली, सरकारी दराने गव्हाची खरेदी सुरु झाली. गव्हाच्या उत्पादनाची आणि विक्रीची जोखीम सरकारने उचल्याने, गव्हाच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. याउलट डाळींची परिस्थिती गंभीरच राह्यली. परिणामी डाळींच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली नाही.
पावसाळ्यामुळे म्हणजेच मान्सूनमुळे कोणत्याही पशुखाद्याचा पुरवठा ठोक पुरवठा होत नाही त्यामुळेच भारतात मांसाहारापेक्षा शाकाहार सामान्यांना परवडतो. म्हणूनच प्रथिनांची गरज डाळींद्वारे भागवली जाते. डाळींमध्ये तूरडाळ सर्वाधिक लोकप्रिय आहे. कारण हे पिक जवळपास कोणत्याही हवामानात येतं. काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि मणिपूरपासून कच्छपर्यंत प्रत्येक राज्यात तूरीची लागवड कमी-अधिक प्रमाणात होत असते. मात्र मार्केटेबल सरप्लस असं तूरीचं उत्पादन कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येच होतं. तूर हे खरीपाचं पिक आहे. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला या पिकाची पेरणी होते आणि पावसाळा संपल्यावर त्याची काढणी होते. तूर हे पिक पावसाच्या पाण्यावर घेतलं जातं. अर्थातच सिंचनाची व्यवस्था नसते. अगदी संरक्षित पाणीही या पिकाच्या वाट्याला येत नाही. त्यामुळे तूरीचं दर हेक्टरी उत्पादन जास्तीत जास्त ७ क्विंटल येतं. त्यातच तूर हे सहा महिन्याचं पिक आहे. काही जाती तर १० महिन्यांच्या आहेत.
तूर हे कोरडवाहू पिक आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनानुसार त्याच्या पेरणीच्या आणि काढणीच्या तारखा प्रत्येक राज्यात बदलत जातात. मान्सून पहिल्यांदा पोचतो केरळला. तिथे तूरीचं वरकड उत्पादन नसल्याने त्यानंतरच्या राज्यात म्हणजे कर्नाटक आणि आंध्रमध्ये सर्वात प्रथम तुरीची पेरणी होते. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या क्रमाने तुरीची पेरणी होते. कर्नाटक आणि आंध्रमधली तूर पहिल्यांदा बाजारात येते. तिला दर बरा मिळतो. परंतु कोणत्या का कारणाने या राज्यातली तूर यायला उशीर झाला की महाराष्ट्रातून आवक सुरु झाल्याने तुरीचे भाव पडतात. महाराष्ट्रामागोमाग गुजरात त्यानंतर मध्य प्रदेशातून आवक सुरु झाल्याने तुरीला चांगला भाव मिळणं अवघड असतं. उत्तर प्रदेशातून तुरीची आवक सुरु होते तोवर आंध्र आणि कर्नाटकातून रब्बी डाळींची मुख्यतः चण्याची, उडदाची आवक सुरु होते. सरकारने जाहीर केलेला हमीभाव खूपच तुटपुंजा असतो. म्हणजे बाजारपेठेतल्या दरापेक्षा भरपूर कमी असतो. त्यामुळे सरकारी भावाला तुरीची खरेदी-विक्री होतच नाही. गेली दोन वर्षं आंध्र प्रदेशने तूरीचा हमीभाव ५०० रुपयांनी वाढवून दिला. जेणेकरून शेतक-यांना तुरीचं उत्पादन घेण्यासाठी उमेद यावी. केंद्राने जाहीर केलेला हमीभाव २००० रुपये क्विंटल त्यामध्ये राज्य सरकारने ५०० रुपयांनी वाढ केली. जेणेकरून हंगाम सुरु होताना शेतक-यांना चांगला दर मिळावा. याचा अर्थ असा की तुरीला चांगला भाव मिळत नाही. भाव मिळत नसल्याने तीन महिन्यात तयार होणा-या तुरीच्या जातींचा प्रसार होत नाही. प्रसार झाला तरी शेतकरी त्यांच्या देखभालीवर फारसा खर्च करत नाहीत. परिणामी तूरीचं उत्पादन कधीही पुरेसं होत नाही. म्यानमारसारखे देश तुरीचं उत्पादन केवळ भारतीय बाजारपेठेसाठीच करतात. तूरीचं सर्वाधिक उत्पादन आणि सेवन भारतातच होतं. भारतच तूरडाळीचा सर्वात मोठा आयातदार आहे. वेगवेगळ्या राज्यांतून वेगवेगळ्या वेळी सुरु होणारी आवक आणि आयात यामुळे तूर हे नगदी पिक होण्यावरच मर्यादा येतात. त्यामुळे अर्थातच तुरीचं उत्पादन वाढत नाही.
त्यातच म्यानमार वा चार-दोन आफ्रिकी देशातही तुरीच्या उत्पादनाला फटका बसला की मागणी जास्त पण पुरवठा कमी असल्याने तुरीच्या किंमती वाढतात. अशा परिस्थितीत रास्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचा बाजारपेठेतला हस्तक्षेप आवश्यकच ठरतो। तूर डाळीच्या किंमती ८०-९० रुपये किलो झाल्यावर सरकारने हस्तक्षेपाचा निर्णय घेतला। सरकारचा हस्तक्षेप म्हणजे नोकरशाहीचाच हस्तक्षेप ठरतो। त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करायचा असेल तर केवळ धाडी घालून वा केसेस दाखल करून तो प्रश्न सुटणार नाही। त्यासाठी नव्या मार्गाचाच अवलंब करावा लागेल। म्हणजे नवी सिस्टीम आणावी लागेल।
तरच बाजारातली तूर रास्त दरात घरात येईल।

टीपः जिज्ञासू वाचकांनी विविध नियकालिकं, वेबसाईटस्, अहवाल आणि ग्रंथ, संदर्भ तसेच आकडेवारी, संख्याशास्त्रीय माहितीसाठी पहावेत।

Monday, 28 September 2009

बाजारातली तूर -- १

भारतातली शेती पावसाच्या भरवंशावर असते, हे वाक्य शाळेपासून मनावर बिंबवलं जातं। वस्तुतः कोणत्याही देशातली शेती पावसावरच अवलंबून असते कारण शेतीसाठी आणि पिण्यासाठी आवश्यक असणारं पाणी आकाशातच तयार होतं. जमिनीत पाणी तयार होण्याची नैसर्गिक यंत्रणा कुठेही अस्तित्वात नाही. मान्सून वा मोसमी वा-यांवर भारतातली शेती अवलंबून असते असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. मोसमी वारे वा मान्सून हा शब्द अरबांनी भारतीय उपखंडाची ओळख झाल्यावर प्रचलित केला. आपल्याकडे “नेमेचि येतो मग पावसाळा”, म्हणजे ‘पावसाळा’ हाच शब्द होता. मान्सून हा शब्दच परदेशी असल्याने तो लहरी असतो हे गृहितकही परदेशीच आहे. मान्सून लहरी असता तर भारत हा शेतीप्रधान देश राहिलाच नसता. अन्नधान्याची वाढती गरज पुरवण्यासाठी पावसाने जे वेळापत्रक पाळायला हवं ते पाळलं जात नाही म्हणून मान्सूनला लहरी म्हणण्याचा प्रघात रुढ झाला आहे.
शेतीप्रधान ही संज्ञाही तपासून पाह्यला हवी. शेतीप्रधान या शब्दामध्ये पिकांचं वैविध्य अभिप्रेत नाही. केवळ शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा वाटा हे दोन मुद्दे विचारात घेऊन एखादा देश शेतीप्रधान आहे की नाही हे ठरवलं जातं. औद्योगिक क्रांती होईपर्यंत जगातील अनेक देश शेतीप्रधान होते. युरोप कदाचित व्यापार प्रधान असावा. शेतीवर गुजराण होईल एवढं उत्पादनच तिथे त्या काळात होत नव्हतं. पिकांची विविधताही फारशी नव्हती. मान्सूनमुळेच भारतामध्ये विविध प्रकारची शेती आणि पिकं आहेत. युरोप वा अमेरिकेसारखी केवळ चार-दहा पिकांची शेती भारतात होत नाही. धान्य, डाळी, तेलबिया, भाज्या, फळं, दूध, मांस, मासे अशा कोणत्याही खाद्यान्नामध्ये भारतात जेवढी विविधता आहे तेवढी क्वचितच अन्य कोणत्या देशात असेल. मान्सूनच्या नैसर्गिक वेळापत्रकाप्रमाणे जगण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विविध पिकं आणि खाद्यान्न भारतातल्या समूहांनी विकसीत केली. कमोडिटी मार्केटच्या परिभाषेत याला हेजिंग म्हणतात. अमेरिकेत गहू, मका, सोयबीन या तीनच पिकांमध्ये स्पर्धा असते. या उलट भारतात गहू, धान (धानाच्या अनेक जाती आहेत), ज्वारी, बाजरी, मका, डाळी, सोयबीन, भुईमूग, करडई, सूर्यफूल अशी अनेक पिकं घेतली जातात. विविधता आहे म्हणूनच दर एकरी उत्पादन कमी आहे. किंवा दर एकरी उत्पादन कमी आहे म्हणूनच विविधता आहे.
शेतीमालाचं ठोक उत्पादन नसल्यामुळे आपल्याकडचा अन्न प्रक्रिया उद्योगही प्रामुख्याने घरगुती वा कौटुंबिक पातळीवरचा आहे। राज्यच नव्हे तर प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार स्वैपाकाच्या पद्धती, चवी आपल्याकडे आहेत। त्यामुळे आहारशास्त्राचे अनेक नियम आपल्या खाण्या-पिण्याला लागू होत नाहीत. कारण आधुनिक आहारशास्त्राला आपल्या देशातील अनेक खाद्यान्नांचे गुणधर्मच ठाऊक नाहीत. खाद्यान्नांच्या किंमती त्यांच्यातील पोषणमूल्यांवर ठरतात अशी आधुनिक अर्थातच अमेरिकन धारणा आहे. भारतामध्ये मात्र हे सूत्र उलटंपालटं होऊन जातं. उदाहरणार्थ डाळी. प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी डाळी आहारात आल्या. प्रथिनांचं सर्वाधिक प्रमाण उडदामध्ये असतं। त्यानंतर मूग, त्यानंतर तूर आणि सर्वात शेवटी चणा। मात्र मेदाचं प्रमाण चण्यामध्ये सर्वाधिक असतं। त्यामुळेच तूरडाळ सर्वसामान्यांना परवडणारी होती. या वर्षी मात्र तूरडाळीच्या किंमती चणाडाळीपेक्षा दुप्पट आहेत. मात्र त्यामुळे चणाडाळीचा खप वाढला नाही. लोकांना महाग तूरडाळच हवी आहे. भारतीय जीवन तथाकथित कमोडिटी मार्केटच्या चौकटीत पूर्णपणे बंदिस्त होऊ शकत नाही.

टीपः जिज्ञासू वाचकांनी विविध नियकालिकं, वेबसाईटस्, अहवाल आणि ग्रंथ, संदर्भ तसेच आकडेवारी, संख्याशास्त्रीय माहितीसाठी पहावेत।

Sunday, 27 September 2009

चौकटीबाहेरचे चिंतन

प्रिय किशोर,
बोलणं आणि ऐकणं स्केल-अप केलं की लिहिणं-वाचणं होतं. बोलताना ऐकणारा साक्षात समोर असतो. तो आपल्याला ओळखत असो वा नसो. लिहिताना मात्र वाचकाच्या प्रतिमेला उद्देशून आपण लिहितो. निवडक पळशीकर या पुस्तकाची तू लिहिलेली प्रस्तावना वाचताना तू माझ्याशी बोलतो आहेस हे मला कळलं.
व्यक्ती, विचारवंत, विचारव्यूह आणि मांडणीची शैली म्हणून वसंत पळशीकरांची ओळख तू अतिशय नेमकेपणाने करून दिली आहेस. परिक्षेला बसणारा विद्यार्थीच सर्व मुद्दे तपशीलात लिहून दाखवू शकतो. सर्वसाधारण वाचक आपल्याला जे ठाऊक आहे त्याला दुजोरा देणारे मुद्दे ध्यानात ठेवतो तर चोखंदळ वाचक आपल्या ठाऊक असलेल्या मुद्द्यांचे संदर्भ ताडून पहातो आणि वेगळे मुद्दे नोंदवून ठेवतो. वसंत पळशीकरांच्या निबंध संग्रहाला तू लिहिलेल्या प्रस्तावनेत यापैकी प्रत्येक वाचकाला काही ना काही मिळेलच.
पळशीकरांच्या निबंधांची निवड करण्याचा पेच तू मांडला आहेसच मात्र तो ब-याच अंशी सोडवलाही आहेस. तो पूर्णपणे सोडवणं खुद्द पळशीकरांनाही जमणार नाही एवढं लिखाण त्यांनी केलं आहे. हे अवघड काम दिलेल्या वेळेत पूर्ण करून पळशीकरांचं विचारधन पुढच्या पिढीच्या हाती सोपवण्याचं महत्वाचं काम तू केलंयस. लोकवाङमयगृह आणि सुनील कर्णिकचे त्यासाठी आभारच मानायला हवेत.
निवडलेल्या निबंधांची साक्षेपी ओळख करून दिल्यामुळे पळशीकरांचा विचारव्यूह त्या काळातील सामाजिक-राजकीय संदर्भात समजून घेण्यास मदत होते. पळशीकर ज्या काळात लिहित होते त्या काळात शासनाच्या हस्तक्षेपाने राजकीय-सामाजिक-आर्थिक पुनर्रचना केली पाहिजे या विचाराला सर्वसाधारणपणे मान्यता होती. पळशीकरांनी मात्र शासनापेक्षा लोकांचा सहभाग हा या पुनर्रचनेचा केंद्रबिंदू मानला. हा तू मांडलेला मुद्दा अन्य कोणी विचारवंताने पळशीकरांच्या संबंधात नोंदवल्याचं मला ठाऊक नाही. संपूर्ण पळशीकर ग्रंथरुपात उपलब्ध नाही. विविध नियतकालीकांमधील शेकडो लेख मिळवणं वाचकाला शक्य नाही, त्यामुळे निवडक पळशीकर हाच पळशीकरांच्या साहित्याचा दस्तऐवज होईल. (भा. ल. भोळेने संपादित केलेले वसंत पळशीकरांचे जमातवादासंबंधातील लेख ग्रंथरूपात उपलब्ध आहेतच. ते महत्वाचे आहेत मात्र ते एकाच विषयाशी संबंधीत आहेत.)
विसाव्या शतकात विकसीत झालेल्या समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यात गांधी विचाराची मांडणी आणि विस्तार पळशीकरांनी केला असं माझं आकलन आहे. नर्मदा बचाव आंदोलन आणि त्यानुषंगाने उपस्थित झालेले अनेक मुद्दे यासंबंधातही पळशीकर मूलगामि मांडणी करू शकले. त्यांच्या पिढीच्या अनेकांना ते शक्य झालं नाही.
नानासाहेब गोरे, स. ह. देशपांडे आणि ज. वि. पवार यांच्याशी पळशीकरांचे वाद झाले असा उल्लेख तू केला आहेस. ज. वि. पवारांसोबत झालेला वाद माझ्या वाचनात नाही. स.ह. देशपांडेंच्या सोबत झालेला वाद भारतातील हिंदु-मुस्लिम समस्येची मांडणी कशी करावी या संबंधातील होता. सेक्युलर आणि पुरोगामि विचारवंतांनी केलेल्या मांडणीतील उणिवांचा फायदा उठवत, स.ह. देशपांडेंनी हिंदुत्ववादी मांडणीची गरज अधोरेखित केली होती. ग्रंथापेक्षा लोकजीवन-लोकसंस्कृती यांना केंद्रस्थानी ठेवून पळशीकरांनी त्यांचा प्रतिवाद केला होता. या अर्थाने तो निव्वळ वैचारीक वाद होता. नानासाहेब गोरे हे केवळ वैचारिक वादात नव्हते कारण ते एका पक्षाचे नेते होते. त्यांनी वैचारिकतेसोबतच कार्यक्रमाचाही मुद्दा उपस्थित केला आणि त्यामुळे पळशीकर दोन पावलं मागे सरल्याचं मला स्मरतं। साता-याला झालेल्या लोकशाही समाजवाद या विषयावरील चर्चेत पळशीकरांनी मांडलेल्या टिपणाच्या संदर्भात प्रकाश बाळनेही नेमका हाच म्हणजे कार्यक्रमाचा मुद्दा उपस्थित केला होता। पळशीकरांनी केलेल्या वाद-विवादांचा आढावा कदाचित् पानांच्या मर्यादेमुळे तुला घेता आला नसावा. परंतु पुढच्या आवृत्तीत त्याचा समावेश करता आला तर उत्तम.
या पुस्तकाच्या आणि प्रस्तावनेच्या निमित्ताने तुला आपला वाचक आणि विषयही गवसलेला आहे. त्यामुळेच आता दणकून लिखाण करायला हवंस।
कळावे,
सुनील तांबे



निवडक वसंत पळशीकर
चौकटीबाहेरचे चिंतन
संपादक- किशोर बेडकिहाळ
प्रकाशन- लोकवाङमय गृह

Wednesday, 23 September 2009

लॅपटॉपवर सत्यजित राय-- २

रांड, सांड, सिढी, संन्यासी
उनसे बचे तो सेवा करे काशी

अच्युतराव पटवर्धनांच्या अंत्यसंस्कारासाठी वाराणसीला गेलो होतो तेव्हा या ओळी मी ऐकल्या. रत्नाकर पांडे या काँग्रेसी नेत्याकडून. मात्र त्यावेळी वाराणसी शहरात जायला वेळ नव्हता. त्यानंतर ब-याच वर्षांनी मी आणि सतीश तांबे वाराणसीला गेलो होतो. तेव्हा या ओळींची प्रचिती आली. छोट्या गल्ल्यांमध्ये निवांत उभे असलेले वळू, दगडी पाय-यांचे घाट, यात्रेकरूंचा पिच्छा पुरवणारे पंडे वा संन्यासी आणि गंगापूजन करणा-या विधवा बायकांचे तांडे. काशी ही मृत्युची नगरी आहे. अनेक जण तिथे शेवटचा श्वास घेण्यासाठी येतात. अपराजितो या चित्रपटात सत्यजित रायने ओपूच्या आईची कहाणी सांगताना वाराणसी हे शहर एक पात्र म्हणून उभं केलंय. वाराणसीचं असं दर्शन अन्य कोणत्याही चित्रपटात घडत नाही.
अपूर्वचे वडील बायको-मुलाला घेऊन बंगालातून वाराणसीला येतात. तिथे गंगाकिनारी एका घाटावर ते बंगाली विधवांना पोथी वाचून दाखवायचे. त्यावर मिळणा-या दक्षिणेवर कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. वाराणसीच्या गल्ली-बोळांमध्ये ओपू खेळायचा. वडलांचा मृत्यु होतो. आई एका श्रीमंताघरी घरकाम करू लागते. लहानगा ओपू घरमालकाच्या हुक्क्यामधे निखारे भरताना ती पाहते आणि मुलाच्या भवितव्याची चिंता तिच्या चेहे-यावर स्पष्ट दिसते. आता इथे काम करायचं नाही असं ती मनोमन ठरवते. बंगालात आपल्या दूरच्या नातेवाईकाकडे ती राह्यला जाते. तिथे ओपूची शाळा सुरु होते. त्याला विज्ञानाची गोडी लागते. शालांत परिक्षेत तो जिल्ह्यातून दुसरा येतो. पुढच्या शिक्षणासाठी कोलकत्याला शिकायला जायचं ठरवतो. ओपू दूर जाणार या कल्पनेनेच आईचा जीव कासावीस होतो. पण तरीही ती त्याला अनुमति देते. पै पै करून साठवलेली पुंजी त्याला देते. ओपूला स्कॉलरशिप मिळालेली असते. हेडमास्तरही त्याला मदत करतात. एका प्रिटिंग प्रेसमध्ये काम करून तो कॉलेजचं शिक्षण घेऊ लागतो. सुटीत गावी आईला भेटायला जातो. एक दिवस घरी राहतो. सकाळी लवकर उठून कोलकत्याला जाणारी रेल्वे पकडायची असते. तो अजून काही काळ घरी असावा असं आईला वाटत असतं. ती त्याला पहाटे उठवत नाही. त्याला जाग येते तेव्हा उशीर झालेला असतो. तो आईवर चिडतो. धुसफूस करत कपडे भरतो आणि स्टेशनवर जातो. तिकीट काढतो. आगगाडी येते. तेव्हा त्याला आईची आठवण येते. तो माघारी जातो. एक दिवसानंतर तो कोलकत्याला जातो. इथे आई आजारी पडते. वातामध्ये ओपू घरी आल्याचा तिला भास होतो. शेजारीण ओपूला कार्ड टाकते. ओपू धावत घरी येतो. तोवर सर्व संपलेलं असतं. ओपू झाडाखाली बसून अश्रू गाळतो आणि कोलकत्याला जायला निघतो.
या चित्रपटातला काळ खूपच मोठा आहे. अनेक स्थळं आहेत. त्यामुळे असेल कदाचित् पण प्रत्येक टप्प्यावर एडिटिंगने चित्रपटला गती दिलीय. ओपूचे वडील रात्री शेवटचा श्वास घेतात आणि दुस-या शॉटमध्ये कबुतरांचा थवा आभाळात झेप घेताना दिसतो. गंगेच्या घाटावरून आकाशात रेघोट्या ओढणारे कबुतरांचे थवे दिसतात. आई ओपूला घेऊन बंगालात परत जाते तेव्हा रेल्वेच्या खिडकीत ती बसलेली असते. तिच्या चेहे-यावरचे बदलणारे भाव आणि तिच्या नजरेने टिपलेली पळत्या झाडांची, गावांची, निसर्गाची दृष्यं काही क्षणात आपल्याला उत्तर भारतातून बंगालात घेऊन जातात. सत्यजित रायचे चित्रपट पाह्यले की पंचेद्रियांच्या संवेदना तीक्ष्ण होतात; आपले अनुभव, नातेसंबंध परिसराशी, निसर्गाशी घट्ट जुळलेले असतात त्यांना असलेल्या वैश्विक परिमाणाचं भान येतं.
अपराजितो मी लॅपटॉपवर पाह्यला. कानात इअरफोन घातले की पूर्ण एकाग्र होऊन चित्रपट पाहता येतो. थिएटरमध्येही आपण एकटेच असतो. तो एकटेपणा समूहातला असतो. समूहातल्या प्रत्येकाचा चित्रपटाचा अनुभव आणि आकलन वेगळं असतं. चित्रपट संपल्यावर एकमेकांशी चर्चा, गप्पा होतातच. त्यातून कलाकृतीचं आकलन अधिक समृद्ध होण्याची शक्यता असते. लॅपटॉपवर चित्रपट पाह्यला तर ही मौज मिळत नाही.

लॅपटॉपवर सत्यजित राय १

चारुलता हा सत्यजित रायचा सिनेमा मी फक्त एकदाच पाह्यला होता. त्यावेळी रिळं लावताना काही तरी गडबड झाली होती. अर्थात तरीही त्याची मजा कमी झाली नव्हती. त्यानंतर चारूलता बघायचा राहून गेला. त्यातलं एक गाणं... ओ बिदेशिनी... अंधुकसं आठवत होतं आणि चारुलता बागेत झोपाळ्यावर बसून अमोलशी बोलत असते तो शॉट मनात ठसला होता. रविंद्रनाथांच्या नष्टनीड या कथेवर हा चित्रपट बेतलेला आहे. ही कथा कित्येक वर्षांपूर्वी म्हणजे शाळेत असताना वाचली होती. पण नीट आठवत होती. मध्यंतरी पुण्याहून मुंबईला येताना सतीश तांबेकडे गेलो होतो. त्याच्याकडे सत्यजित रायच्या चित्रपटांच्या डिव्हिडी होत्या. कोपरखैरणेहून लोअर परेलला ऑफिसात जाईपर्यंत तास-दीड तास लागणार. तेवढ्या वेळात चारुलता पाहता येईल असं मनात आलं म्हणून त्या घेतल्या.

मोटारीत बसल्यावर मी चारुलताची डिव्हीडी लावली. ऑफिसला जाईपर्यंत चित्रपट बघत होतो. मोटारीत गाणी ऐकायला मजा येते. खिडकीच्या काचा बंद केल्या एसी सुरु केला आणि म्युझिक लावलं की खिडक्यांमधून गुंडाळल्या जाणा-या चित्रांना अर्थ प्राप्त होतो. चित्रपटच सुरु होतो. मोटारीत मागच्या सीटवर बसून वीतभर पडद्यावर डोळे एकाग्र करायला विशेष श्रम घ्यायला लागतात. मोटारीच्या वेगाने चित्रपट पळावा असं वाटतं. मोटारीतल्या किंवा बसमधल्या पडद्यावर एक्शन पट पाह्यला मजा येते. कारण दृष्यांचे बारकावे टिपण्याची गरज नसते. अर्थातच चारुलता पाहताना मजा आली नाही. हिरमोड झाला.

दोन-तीन दिवसांनी कामानिमित्त भोपाळला जायचं होतं. सकाळी सहा वाजताचं विमान पकडायचं म्हणजे पाच वाजता विमानतळावर पोचायचं. भल्या पहाटे उठायचं. विमान इंदूरमार्गे भोपाळला जाणार होतं. इंदूर येईपर्यंत डुलक्या घेत होतो. इंदूरला विमान चाळीस मिनिटं थांबतं. बाहेर तर जाता येत नाही. म्हणून लॅपटॉप काढला आणि चारुलताची डिव्हीडी लावली. भोपाळ येईपर्यंत तीच पहात बसलो. सिनेमा लॅपटॉपवर पाह्यला मजा येते. मागेपुढे करत प्रत्येक क्षणाचा दृकश्राव्य अनुभव घेता येतो. चित्रपट आणि आपण यांच्यामध्ये कोणताच अडथळा येत नाही. लॅपटॉपवर कानात इअरफोन घालून चित्रपट बघणं हे वाचनासारखं आहे. तुम्ही अगदी एकटे होता.

नष्टनीड ही रविंद्रनाथांची कथा. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ही कथा घडते. भूपती हा जमीनदारपुत्र. कोलकात्यात त्याचा वाडा असतो. त्याला खाण्यापिण्याची ददात नसते. त्याने स्वतःला एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या कामात गुंतवून घेतलेलं असतं. वाड्यातच त्याने प्रेस टाकलेला असतो. भारताचं आणि इंग्लडचं राजकारण, लोकशाही, कायदाचं राज्य या विषयांमध्येच तो पूर्ण बुडालेला असतो. इंग्लडच्या निवडणुकांमध्ये हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष यांच्यापैकी कोणता पक्ष सत्तेवर आला तर भारताला हितकारक ठरेल यावर तो आणि त्याचे मित्र चर्चा करायचे. पैजा लावायचे. त्याची पत्नी चारुलता. भूपतीला तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. त्याबद्दल तो अनेकदा शरमिंदाही व्हायचा. तिला बंगाली साहित्यात गोडी असते. भूपतीचा चुलत का मावसभाऊ—अमोल, कोलकत्याला येतो. भूपतीकडेच राहतो. त्याला बंगाली साहित्यात रुची असते. गतीही असते. भूपती त्याला गळ घालतो--चारुलताला बंगाली साहित्यात रुची आहे, पण मी तिला मार्गदर्शन करू शकत नाही, तू ते काम कर. अमोल आणि चारुलताची गट्टी जमते. चारुलताचं भूपतीवर प्रेम असतं, निष्ठा असते आणि अमोलशी असलेले संबंध कमालीचे उत्कट असतात. अमोलला मात्र त्याची कल्पना नसते.

चारुलताचा भाऊ उनाड असतो. भूपतीला वाटतं त्याच्यावर कोणी कसली जबाबदारी टाकलेली नाही. म्हणून तो असा आहे. भूपती त्याला बोलावतो आणि वर्तमानपत्राचा मॅनेजर बनवतो. हा मॅनेजर प्रेसच्या नावावर कर्ज काढून खिशात टाकतो आणि पोबारा करतो. भूपतीला हे समजतं तेव्हा तो खचतो. मेव्हण्याने आपला विश्वासघात केला याच अतीव दुःख त्याला होतं. अमोलही मद्रासला मित्राकडे जातो आणि चारुलताला धक्का बसतो. अमोलमुळेच ती लिखाण करायला लागते. विमनस्क झालेला भूपती घरी येतो तेव्हा त्याला अमोलच्या नावाने आकांत करणारी चारुलता दिसते. तो मोडून पडतो.

ही गोष्ट रविंद्रनाथांच्या जीवनातली आहे. सुनील बंदोपाध्यायची पहिली जाग ही कादंबरी (म्हणजे तिचा अनुवाद) गेल्या वर्षीच मी वाचली. तिच्यामध्ये बंगालच्या प्रबोधन युगाचं चित्रण आहे. त्यामध्ये रविंद्रनाथ आणि त्यांच्या वहिनीचे—बोउठनचे संबंध किती उत्कट होते याचं चित्रण आहे. रविंद्रनाथांचे बंधू जमीनदारीचा व्याप बघायचे, नाटकं लिहायचे, प्रवासी वाहतुकीसाठी त्यांनी एक बोटही बांधून घेतली होती आणि फिरंगी बोटवाल्यांशी स्पर्धा सुरु केली होती. ते मोठे उद्यमशील होते. रविंद्रनाथ, त्यांचे बंधू आणि बंधूंची पत्नी हे गंगेवर नौकाविहार करत असत, रविंद्रनाथ गाणी म्हणत. बोउठनची रविंद्रनाथांबरोबर गट्टी होती. रविंद्रनाथांचं लग्न झाल्यावर त्यांच्या आणि बोउठनच्या गाठीभेटी कमी होतात. त्यातच रविंद्रनाथ साहित्यिक वर्तुळात ओढले जातात. पती अनेक व्यापात आणि दीरही दुरावलेला. बोउठनचा एकटेपणा आणि तगमग वाढते. एकदा बोट कुठेतरी अडकून पडते आणि रविंद्रनाथांचे बंधू बोउठनला दिलेला शब्द पाळू शकत नाहीत. ती कमालीची दुखावली जाते आणि आत्महत्या करते. तिच्यात आणि आपल्यात किती अंतर होतं याचा साक्षात्कार रविंद्रनाथांच्या बंधूंना तिच्या मृत्युनंतर होतो. ते कमालीचे दुःखी होतात,
असा तपशील कादंबरीत आहे.

चारुलता या चित्रपटाची नायिका माधवी मुखर्जी. तिच्या अभिनयाला दाद द्यावी तेवढी थोडी. त्यानंतर ती रायच्या कोणत्या चित्रपटात चमकली की नाही ठाऊक नाही. सत्यजित रायचे तिच्याबरोबरही नाजूक संबंध होते. बायकोने घटस्फोटाची धमकी दिली तेव्हा सत्यजित रायने त्या संबंधांपासून काडीमोड घेतला सत्यजित रायच्या पत्नीने सांगितलं. “मी घटस्फोट मागितला तेव्हा सत्यजित रायच्या डोळ्यात अश्रू आले. तो माझ्या पायावर कोसळला आणि त्याने क्षमा मागितली,” असं रायच्या पत्नीने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. राय हयात असताना वा त्याचं निधन झाल्यानंतरही माधवी मुखर्जीने या संबंधांबाबत कोणतंही सनसनाटी विधान केलं नाही. इंग्लडच्या युवराजाची पत्नी लेडी डायना हिची काही प्रेम प्रकरणं तिच्या मृत्युनंतर प्रकाशात आली. एका प्रियकराने तर डायनाने त्याला लिहिलेल्या पत्रांचा लिलावच केला. तीच गत मायकेल जॅक्सनच्या मृत्युनंतर झाली. त्याच्याही चारित्र्याचे धिंडवडे त्याच्या मित्रानेच काढले. जॅक्सनची मुलं वस्तुतः माझीच आहेत, हवं तर डीएनए टेस्ट करा असं त्याने वर्तमानपत्रांना सांगितलं. भारतीय संस्कृती या संबंधात खूपच प्रगल्भ आहे असं दिसतं.

थिएटरमध्ये पाह्यलेला चित्रपट मोटारीत बघताना कंटाळा आला तर लॅपटॉपवर बघताना त्या चित्रपटातल्या आणि चित्रपटाबाहेरच्या अनेक जागा नव्याने कळल्या. विमानाची चाकं धावपट्टीवर झेपावली तेव्हा मी लॅपटॉप बंद केला.

Sunday, 20 September 2009

स्पोर्टस् बार २


स्पोर्टस् बार ऐसपैस आहे. सिलींग खूप उंच आहे. कापड गिरणीच्या इमारतीच्या रचनेत बदल करायला परवानगी मिळाली नाही. म्हणून सिलींगला काळा वा प्रकाश शोषून घेणारा रंग देण्यात आलाय. तोच रंग भिंतींनाही आहे. त्यामुळे नजर आपोआपच भिंतींवर ठिकठिकाणी लावलेल्या प्लाझमा टिव्हींवर हिंडत राहते. वेगवेगळे स्पोर्टस चॅनेल त्यावर सुरु असतात. त्यांची नरडी दाबलेली असल्याने त्यातून आवाज फुटत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या खेळांची दृष्यं तुमचं लक्ष वेधून घेतात. कुस्त्या, फुटबॉल, टेनिस, क्रिकेट, गोल्फ आणि जाहिराती यांचा अखंड प्रवाह त्यांच्यावर सुरु असतो. एक भलामोठा स्क्रीन आहे. त्यावरही कोणता तरी स्पोर्टस् चॅनेल सुरु असतो. बारमध्ये एक पूल टेबल आहे. भिंतीवरच्या निशाणावर डार्ट मारायचा खेळ आहे. टेबलावरच बुद्धिबळाचा पट असतो. एका कोप-यात एक पिंजरा आहे. तिथे जाळीत बॉल टाकण्याचा खेळ आहे. एका कोप-यात साउंड सिस्टीम आहे. तिथे एक डीजे आणि त्याचे एक-दोन मदतनीस असतात. इंग्रजी पॉप म्युझिक सुरु असतं. आवाज एवढा मोठा की गप्पा मारणं शक्यच नसतं. पहिल्यांदा तिथे गेलो तेव्हा मी भांबावून गेलो. कोणाची ओळख करून घ्यायची तर त्याच्या कानात ओरडून नाव सांगायचं. त्यातच एखाद्या फिरंगीशी बोलत असलो तर आणखी पंचाईत व्हायची. संगीताच्या गदारोळात उच्चार कळायचे नाहीत. एखादी बीअर, स्नॅक्स, सहका-यांसोबत हाय-हॅलो की झाली पार्टी.
बीअर वा व्हिस्की प्यायची तर जवळच्या मित्रांसोबत निवांत गप्पा मारायच्या. अनुभवांची देवघेव करायची. नंतर जेवण म्हणजे क्लायमॅक्स, अशी माझी पार्टीची कल्पना होती. स्पोर्टस बारमध्ये येणारी तरूणाई ट्रेकिंग करणारी नाही, आपण जिथे राहतो तिथल्या समाजाशी जुळलेली नाही. ते ना गणपती उत्सवात असतात ना दहीकाल्यामध्ये. धमाल करायला म्हणजे नाच, गाणं, पिणं, खाणं एकाच ठिकाणी करायला ते स्पोर्टस बारमध्ये येतात. कंपन्यांमधले मॅनेजर बहुसंख्येने तरूण असतात. म्हणजे तिशीच्या आसपासचे. दिवसभर काम करून शिणलेले असतात. मिटिंग्जमध्ये वर्किंग लंच असतो. शुक्रवारी वा विक डे ला ऑफिसातल्या सहका-यांसोबत ते पार्टी करतात. तेव्हा ड्रिंक्स, स्नॅक्स आणि म्युझिक. मोठी पार्टी असेल तर डान्स. अशा पार्ट्या टिम बिल्डींगचाही भाग असतात. त्यामुळे पार्टीतही ही माणसं फॉर्मलच असतात. भारतीय संगीत वा नृत्य या ढाच्यात बसत नाही.
आमच्या बाजूच्या टेबलवर दोन मित्र बीअरचे एक-दोन घुटके घेऊन डार्ट मारत होते. निशाणाच्या मध्यबिंदूवर डार्ट मारण्यासाठी त्यातला एकजण इरेस पडला होता. हाताच्या पोझिशन्स बदलून तो निशाणा साधण्याचा प्रयत्न करत होता. निशाणावर डार्ट आदळला की किती गुण मिळाले ते इलेक्ट्रॉनिक बोर्डावर झळकत असे. बीअरचं प्रमाण वाढत गेलं तसा त्यांच्यातल्या एकाचा डार्ट मारण्याचा उत्साह संपला. दुसराही थकला होता पण त्याचा उत्साह कमी झाला नव्हता.
त्यांच्या पलिकडे पूल टेबल होतं. दोन जण तिथे खेळत होते. आमच्या तरुणपणी या खेळाला बिलीअर्डस् म्हणायचे. आता पूल म्हणतात. (पूर्वी लिफ्ट असायची. आताही लिफ्टच असते पण तिला एलेव्हेटर म्हणतात. जाहिरात विभागाला रिस्पॉन्स म्हणतात.) माझ्या समोरच्या टिव्हीवर गोल्फ सुरु होता. बिलीअर्डस आणि गोल्फ अधून-मधून बघत मी गप्पा मारत होतो. गुरुवारी स्पोर्टस बारमध्ये गाण्याचीही संधी मिळते. म्हणजे पाश्चात्य गाण्यांची एक यादी आहे. त्या गाण्यांच्या सिड्या लावतात. त्यातला माणसाचा आवाज ऐकू येणार नाही फक्त वाद्यसंगीत ऐकू येईल अशी व्यवस्था करतात. गाण्याचे शब्द सबटायटल्स सारखे पडद्यावर उमटतात. ते ज्या क्रमाने आणि पॉजने उच्चारायचे तसे हायलाइट होतात. गाणं म्हणणा-याने पडद्यावर बघत गाणं म्हणायचं. हा झकास प्रकार होता. त्यामुळे मला गाण्याचे शब्द कळणं सोपं गेलं. पहिलं गाणं त्यांच्या डीजेनेच म्हटलं. त्यानंतर एका मुलाने म्हटलं. रणजित पाश्चात्य संगीताचा शौकीन. पियानो वाजवणारा, संगीत रचना करणारा. त्याला हुआफ्रीदने आग्रह केला. रणजितने आढेवेढे न घेता गाणं म्हटलं. फ्रँक सिनात्राचं, स्ट्रेन्जर्स इन द नाइट. प्रेमावरचं रोमँटिकच गाणं. रणजितच्या गाण्याचं जोरदार स्वागत झालं. गाणं संपल्यावर अनेकांनी टाळ्या वाजवल्या. खास लोकाग्रहास्तव रणजितने आणखी एक गाणं म्हटलं. तेही फ्रँक सिनात्राचंच.
मी पडद्यावर गोल्फ आणि बारमध्ये बिलीअर्ड आलटून-पालटून बघत होतो. निघताना म्हणालो, गोल्फचं मैदान छोटं करण्यासाठी पूल टेबलचा शोध कोणीतरी लावला असावा. पूल टेबलही खूप जागा खातं म्हणून कॅरम बोर्ड आला असावा. सर्वांनी या कॉमेंटला दाद दिली. मी म्हटलं गोल्फ आणि बिलीअर्डची गंमत अशी की, they put balls in the holes सर्वजण गोरेमोरे झाले. पण हसले. मी एक पाऊल पुढे जाऊन म्हटलं.... and that too with the stick या वाक्यावर मात्र जोरात हसणं त्यांनी टाळलं. ऑफिसातल्या सहका-यांबरोबरच्या पार्टीत असा जोक मारणं बहुधा असभ्य समजलं जात असावं. या पार्ट्यांमध्ये कोमट विनोदाचा अधून-मधून शिडकावा करायचा असतो. तमाशातला रांगडेपणा इथे चालत नाही.

Saturday, 19 September 2009

स्पोर्टस बार १

सहा महिने झाले पण ऑपरेशन्स टीमचे मॅनेजर एकत्र जमलेले नव्हते. एक प्रॉडक्ट मॅनेजर बंगलोरला असायचा, तर दुसरा पुण्याला. कंटेट ऑपरेशन्स हेड चंडीगडला तर हेड ऑफ ऑपरेशन्स आणि प्रोग्रॅम मॅनेजर आज पुण्याला तर उद्या कोलकत्याला, परवा चंडीगड वा भोपाळ, असे हिंडत असायचे. कस्टमर सपोर्ट मॅनेजर नुक्ताच टीममध्ये सामील झाला होता. पुढच्या सहा महिन्याची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी सर्व मॅनेजर्सची दोन दिवसांची मिटिंग मुंबईला होती. सकाळी नऊ वाजता सुरु झालेली मिटिंग संध्याकाळी साडेसात-आठ पर्यंत चालायची. मिटींगचा शीण घालवण्यासाठी रात्री आम्ही फिनिक्स मिल कंपाऊंडमधल्या स्पोर्टस बारमध्ये गेलो.
फिनिक्स मिल लोअर परेलला होती. तुळशी पाइप रोडला. तुळशी पाइप रोडचं अधिकृत नाव—सेनापती बापट मार्ग. तुळशी तलावातून मुंबईला पाणी पुरवठा करणारे भलेमोठे पाइप माहीमची खाडी पार केल्यावर भूमिगत होतात त्यांच्यावरून जो रस्ता जातो तो तुळशीपाइप रोड. मिलच्या समोरच्या रस्त्यावर कामगारांच्या चाळी. शिवसेनेचे नेते दत्ताजी नलावडे तिथेच राह्यचे. अजूनही त्यांनी तिथली खोली विकलेली नसावी. गेली कित्येक वर्षं त्यांचं कार्यक्षेत्र तेच आहे. दत्ताजी फार पूर्वी सेवादलात वगैरे होते. साठच्या दशकात शिवसेनेत गेले. ते राह्यचे त्या चाळीतली एक खोली गणेशने भाड्याने घेतली होती. खोली दुस-या मजल्यावर होती. तिला एक पोटमाळाही होता. खोलीत त्याने ऑफीस थाटलं होतं. तो डीटीपीची, प्रिटींगची सटर-फटर काम घ्यायचा. पोटमाळ्यावर झोपायचा. सकाळ-संध्याकाळ जेवणाचा डबा मागवायचा. चहा-नाश्ता टपरीवर करायचा.
१९८१ सालच्या गिरणीसंपानंतर मुंबईतल्या गिरणीकामगारांचं कंबरडं मोडलं. संपाचा फायदा घेऊन मालकांनी गिरण्या बंद करण्याचाच सपाटा लावला. संपापूर्वी मुंबईत जवळपास ६० गिरण्या आणि अडीच लाख कामगार होते. आता त्यापैकी चार-दोन गिरण्या उरल्या असतील. माझा मित्र दत्ता इस्वलकर त्यावेळी मॉडर्न मिलमध्ये नोकरीला होता. यथावकाश ती गिरणीही बंद पडली. १९८८ साली दत्ताने मला त्याच्या कामात ओढलं. आम्ही दोघांनी मिळून वस्त्रोद्योग धोरणावर एक टिपण तयार केलं. त्यातूनच पुढे बंद गिरणी कामगार संघर्ष समिती निर्माण झाली. गिरणीकामगारांमध्ये काम करणा-या विविध पक्षांच्या युनियनना एकत्र आणून आम्ही एक परिषद घेतली होती. साथी बगाराम तुळपुळे परिषदेचे अध्यक्ष होते. डॉ. दत्ता सामंत, कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनीही या परिषदेला हजेरी लावली. हातमाग, यंत्रमाग, सूत गिरण्या, कापडगिरण्या यांना सामावून घेणा-या वस्त्रोद्योग धोरणाची भारताला गरज आहे. या धोरणामध्ये कामगारांना न्याय मिळेल अशी तरतूद हवी. तसं झालं तरच बेकारी आणि कामगारांचं शोषण या समस्यांची उकल होऊ शकेल, अशी मांडणी बगारामनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली होती.
अर्थात सरकारने या मागणीला प्रतिसाद दिला नाही. बंद गिरणी कामगार संघर्ष समिती ही नव्याने स्थापन झालेली संघटना होती. नव्या वस्त्रोद्योग धोरणाच्या मागणीसाठी संघटीत शक्ती उभी करण्याचं सामर्थ्य त्यावेळी या संघटनेकडे नव्हतं. बंद पडलेल्या गिरण्यातील कामगारांची देणी मालकांनी चुकती करावीत यासाठी समितीने संघर्ष सुरु केला. दत्ता, विठ्ठल घाग आणि त्यांचे अन्य सहकारी हे आंदोलन नेटाने चालवू लागले. बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर कामगारांचाही हक्क आहे, हा मुद्दा हाती घेऊन त्यांनी लढाई पुढे नेली. त्यांना कामगारांची साथ मिळाली. या आंदोलनाशी मी जवळून संबंधीत होतो.

त्याकाळातच फिनिक्स मिल बंद झाली. मिलच्या कंपाऊंडमध्ये मॉल, स्पोर्टस बार आणि त-हेत-हेची, रुचीरुचीची रेस्त्रां उभी राहू लागली. गंमत म्हणजे बोलिंग ऍली वगैरे खेळांच्या केंद्राला कामगारांचं करमणूक केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली होती. बंद गिरणी कामगार संघर्ष समितीने फिनिक्स मिलमध्ये जी नवी डेव्हलपमेंट सुरु झाली त्याच्या विरोधात आंदोलन छेडलं होतं. विक्रम गोखलेने त्यांना पाठिंबा दिला होता. तो त्यांच्या धरण्यात सामील झाला होता.
गिरण्यांच्या जमिनीवर टोलेजंग, अत्याधुनिक इमारती उभ्या राह्यल्या आहेत. तिथे देशी-विदेशी कंपन्यांची ऑफिसं आहेत. देशाचा विकासदर झपाट्याने वर जातोय हे तिथे गेल्यावर पटतं. म्हणून तर या एरियाला आता अप्पर वरळी म्हणा अशी मागणी कधीतरी झाली होती. लोअर परेल या नावावर गिरणगावाचा ठसा आहे. तो पुसून टाकावा म्हणून ही मागणी कोणीतरी केली म्हणे. मागणी कोणी केली, कधी केली हे ठाऊक नाही पण मराठी वर्तमानपत्रांनी मात्र तिच्या विरोधात आघाडी उघडली होती.
तुळशी पाइप रोडवरच्या कॉर्पोरेट पार्कांना गरीब चाळींचा वेढा पडलाय. अजूनही तिथे सनमिल कंपाऊंडसारखी स्वेट शॉप्स आहेत. चार-चार फुटावर चहाची टपरी आणि सिग्रेटची दुकानं आहेत. सकाळी अनेक नाक्यांवर पोहे, उपमा, शिरा यांचे स्टॉल लागतात. कमी भांडवलात चालणारे हे व्यवसाय चाळीतल्या मराठी लोकांच्या ताब्यात आहेत. “माझंही दारिद्र्याचं स्वतंत्र शेत आहे”, या सत्तरच्या दशकात नामदेव ढसाळने लिहिलेल्या ओळी आजही ताज्या वाटतात.
यावर्षी गोकुळष्टामीच्या दिवशी पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कमधले अनेक जण हंडी फोडण्याचा सोहळा पाह्यला बाहेर आले होते. व्होल्वो बसमधून एक गोविंदा आला. त्यांनी मानवी इमला रचायला सुरुवात केली. चाळीतल्या चार-दोन घरांतून दोन-तीन बादल्या पाणी टाकण्यात आलं. चार-पाच पाण्याचे फुगे कोणीतरी फेकले. त्यांच्या पाठोपाठ दोन ट्रकांमधून दुसरा गोविंदा आला. बसमधल्या गोविंदाला हंडी फोडता आली नाही तर दुसरा गोविंदा रस्त्यावर उतरणार होता. आमच्या आणि इतर कंपन्यांमधले पंजाबी, उत्तर भारतीय, दाक्षिणात्य, बंगाली, बिहारी स्त्री-पुरुष उत्सुकतेने हंडी फोडण्याचा सोहळा बघत होते. हंडी फुटल्यावर त्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. वोल्वोतल्या गोविंदाने हंडी फोडून झाल्यावर दुस-या दिशेला कूच केलं. ट्रकातला गोविंदाही शांतपणे निघून गेला.
हॅव यू प्लेड धिस, असं काही जणांनी मला विचारलं. मी हो म्हटल्यावर, त्यांना चक्क माझा हेवा वाटला. पण मी अशा प्रोफेशनल गोविंदा पथकात नव्हतो, असं त्यांना सांगण्यात अर्थ नव्हता. त्यांना ठाऊक असलेला गोविंदा हाच होता.

Friday, 18 September 2009

ओ कोलकता....


मुंबईहून कोलकत्याला आल्यावर दारिद्र्याचा धक्का बसतो. गरीब इमारती, गरीब माणसं, सार्वजनिक वाहतुकीची गरीब वाहनं. डगडगणारी ट्राम, हाताने ओढायच्या रिक्षा, सायकल रिक्षा, तीन चाकी स्कूटर रिक्षा, बसेस. सर्व काही गरीब. रस्त्यावरच्या टप-यांवर मिळणारे खाद्यपदार्थही गरीब. मुंबईत कामाठीपु-यात युसूफ नावाचा आमचा कार्यकर्ता-मित्र होता. तो फेरीवाला होता. फळं विकायचा. युसूफला भेटायला जायचो तेव्हा तो गाडीवर केळी, सफरचंद वगैरे विकत असायचा. त्याच्या गाडीवरही कधी पाह्यली नव्हती अशी गरीब, साल काळी पडलेली मऊ केळी कोलकत्यात गरीब लोक विकत घेत होते. महागाई वाढली हे खरंच आहे पण मुंबईच्या माणसासाठी कोलकता स्वस्तच. सकाळी नाश्त्याला तीन कचोरी (म्हणजे पु-याच) भाजी, एक हलवा पुरी खाल्ली. केवळ पाच रुपयात. मुंबईत वडापावलाही सहा रुपये मोजायला लागतात. मुंबईतल्या कष्टकरी माणसालाही एक अभिमान असतो, गुर्मी असते. सर्वसाधारणपणे श्रीमंत लोकही गरीबांशी आदर राखून बोलतात. ही गुर्मी वा अभिमान त्या शहराचा म्हणजे त्या शहराच्या अर्थव्यवस्थेचा असावा. कोलकत्यात दीनवाणी गरीबी आहे.
संध्याकाळी प्रेस क्लबला गेलो. तोही गरीबच भासला. सर्वजण बंगालीत बोलत होते. पवन लोकल न्यूज चॅनेलचा ब्युरो चिफ आहे. तो मारवाडी आहे. पण त्याचा, त्याच्या वडलांचा जन्म कोलकत्याचा. वडीलांची चक्की होती. ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता. त्यांना समाजकार्याची, राजकारणाची हौस. धंदा नोकरांवर सोपवून ते या कामातच व्यस्त असायचे. परिणामी धंदा बुडाला. त्यांनी आपला एक गाळा एका हिंदी पेपरला भाड्याने दिला. तिथे पवन नोकरीला लागला. जाहिराती गोळा करणं वगैरे सटरफटर कामं करायचा. बंगाली आणि हिंदी दोन्ही भाषा अवगत असल्याने त्याला अनुवादासाठी बसवला. तिथे त्याला बातमीदारी कळली. म्हणून मी रांकेला लागलो असं तो म्हणाला. त्याआधी मी गुंडागर्दी म्हणा वा राजकारण म्हणा त्या लायनीत होतो, काँग्रेसमध्ये होतो. आंदोलनात बस किंवा इतर वाहनांना आगी लावायचो, असं तो सांगत होता. राजस्थानात हवेली आहे आमची. तिथे वर्षातून एकदा जातो. सकाळी जाऊन संध्याकाळी परत. पण तिथे गेल्यावर छाती अभिमानाने भरून येते. आपलं गाव, आपली हवेली अजून आहे, हाच मोठा दिलासा असतो.
त्याचा चेला नवीन. तो आझमगढचा. त्याला जमिनीचा ओढा. पेरणीची सुरुवात करताना लहान मुलांच्या हाताने काही दाणे टाकतात. लहान मुलांना अहंकार नसतो त्यामुळे पिक चांगलं येतं, अशी श्रद्धा आहे, असं तो सांगत होता. आपल्या हाताचा गुण चांगला आहे, असा त्याला विश्वास होता. प्रेस क्लबमध्ये मी लावलेली झाडं किती जोमदार वाढली आहेत पहा, असं म्हणून तो मला त्या झाडांकडे घेऊन गेला. आपल्याला शेती करता येत नाही याचं त्याला भारी वैषम्य वाटत होतं. आता शेतात मी अनवाणी चालू शकत नाही. दहा बिघे जमीन आहे आमची. आम्ही तीन पिकं घ्यायचो. आता काकांना एवढी जमीन कसता येत नाही. ते पोटापुरता गहू पिकवतात असं सांगत होता. त्याचे आई-वडील कोलकत्यातच स्थायिक झाले होते.
पार्कस्ट्रीट म्हणजे कोलकत्याचा सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट. मुंबईतल्या फोर्ट वा काळा घोडा एरियासारखा. ब्रिटीशकाळाच्या खाणाखुणा अभिमानाने मिरवणारा. पार्कस्ट्रीटवर तीन चाकी स्कूटर रिक्षांना बंदी आहे. हात रिक्षा, सायकल रिक्षाही नाहीत. फक्त टॅक्सी. बहुतेक टॅक्सी एम्बॅसिडर. पिवळ्या रंगाच्या. किमान भाडं २२ रुपये. पार्क स्ट्रीटवर चार-पाच पिढ्यांपासूनची रेस्त्रां वा दुकानं आहेत. तिथे कोलकत्याचं समृद्ध रुप दिसतं. तिथं एक रेस्त्रां फक्त इलशा (हिलसा) माशाच्या पदार्थांसाठीच प्रसिद्ध आहे. अशी अनेक रेस्त्रां असतील. आमच्यापैकी प्रत्येकजण कोलकत्याच्या दारिद्र्याबद्दल म्हणजे दारिद्र्याचं जे दर्शन घडलं त्याबद्दल भरभरून बोलत होता. एक जण कल्याणला राहणारी होती. दुसरा लखनऊचा तर तिसरा पुण्याचा. मी म्हटलं आपण कोणत्या शहरातून आलोय हे विसरलो तर कोलकता तुम्हाला आवडायला लागेल. कोलकता गरीब भासलं तरी स्वच्छ आहे. मजूरांची संख्या खूप असल्यामुळे असेल किंवा अन्य कारणांमुळे असेल कोलकत्यात फ्लेक्सचे बॅनर फारच कमी दिसतात. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर ही शहरं राजकारण्यांच्या भल्यामोठ्या फोटोंनी घाण करून टाकली आहेत. सॉल्ट लेकच्या दिशेला नवं कोलकता साकारतंय ते नवी मुंबईसारखं आखीव-रेखीव आहे. कोलकत्यापासून ५० किलोमीटर्सवरचं कलोनी टाऊन ऐसपैस, शांत, हिरवंगार आहे.
मी कोलकत्याहून नदिया जिल्ह्यात गेलो. गावं हिरवीगार होती. धान, ताग, ऊस, सर्व प्रकारचा भाजीपाला,

पेरू, आंबा यांच्या बागा होत्या. वर्षाला तिथे तीन पिकं घेतात. शेतमजूर मिळत नाहीत त्यामुळे निंदणी-खुरपणीची कामं अडून राहतात. त्यामुळे दोन वर्षांपासून हर्बीसाइडचा खप वाढलाय. प्रत्येक घरात किमान एक मोबाइल फोन आहे. बिधान चंद्र कृषी विद्यापीठात सुदीप नावाचा एक तरूण भेटला. त्याच्या वडलांनी पश्चिम बंगालमध्ये आम्रपाली ही आंब्याची जात लोकप्रिय केली. ज्या मूळ झाडावरून त्यांनी कलमं केली ते २५ वर्षांचं जुनं झाड त्यांनी अजूनही आपल्या शेतात जपलेलं आहे. मागच्या महिन्यात मलिहाबादला गेलो होतो तेव्हा आम्रपाली जातीचे आंबे तिथे होते. यावर्षी दशेरी आंब्याने दगा दिला होता म्हणे. सुदीपचे वडील आणि तो दोघांचाही मोठ्या उद्योगांना विरोध. सुपीक जमीन असताना तिथे उद्योग कशासाठी उभारायचे, असा त्याचा प्रश्न होता. बागा वा फार्म विकसीत करणं हाच सुदीपच्या वडलांचा व्यवसाय आहे. साहजिकच त्यांची सहानुभूती ममता बानर्जींना आहे. महिन्याभरात निवडणूका लागल्या तर मार्क्सवाद्यांचा पराभव होईल, असं सुदीप म्हणत होता.
प्रेस क्लबच्या इलेक्शन होत्या त्यामुळे पवन, नवीन किंवा सर्व पत्रकार तोच विषय बोलत होते. तृणमूल आणि सीपीएम हे दोन गट या इलेक्शनमध्येही होते. इथे राजकीय जाणिवा विलक्षण प्रगल्भ आहेत. बंगाली सिनेमा असो वा क्रिडा क्षेत्र, त्या त्या क्षेत्रातले दिग्गज राजकीय भूमिका घेतात. म्हणजे या किंवा त्या पार्टीच्या बाजून उभे राहतात. सौरव गागुंली सीपीएमच्या बाजूने बोलतो. नट-नट्या ममता बॅनर्जीला खुला पाठिंबा देतात. हॉलीवूड वरून मुंबईतल्या हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलीवूड म्हणण्याचा प्रघात पडला. कोलकत्यातल्या बंगाली चित्रपटसृष्टीला टॉलीवूड म्हणतात. टॉलीवूडमध्ये मिथुन चक्रवर्ती हे मोठं नाव आहे. दाक्षिणात्य मारधाड चित्रपटांच्या बंगाली आवृत्या इथे विलक्षण लोकप्रिय आहेत.
मला अशोक शहाणेने सांगितलेला किस्सा आठवला. तो शंभू मित्रांकडे गेला होता. भारतीय बैठकीवर ऐसपैस बसून किंवा लोळत त्यांच्या गप्पा चालू होत्या. दरवाजा वाजला, शंभू मित्रांना उठायला नको म्हणून अशोकने जाऊन दरवाजा उघडला. एक इसम विचारत होता, शंभू मित्रा आहेत का. कोण आलंय, कशासाठी भेटायचं अशी जुजबी चौकशी अशोक करणार होता, तेवढ्यात शंभू मित्रांचा आवाज आला, म्हणून तो इसम आत आला. उभा राहून तो इसम त्यांच्याशी अदबीने बोलत होता. शंभू मित्रांनी त्याला बसायलाही सांगितलं नाही आणि त्याच्या विनंतीला वा प्रस्तावाला दोनदा नकार दिला. दुस-यांदा आवाज चढवून. निरुपायाने तो इसम निघून गेला. तो गेल्यावर अशोकने विचारलं कोण होता तो इसम, तर शंभू मित्रा म्हणाले, बुद्ध...बुद्धदेव. त्यावेळी ते राज्य सरकारात सांस्कृतिक मंत्री होते आता ते मुख्यमंत्री आहेत. आता शंभू मित्रा नाहीत. कोलकत्यात आता ना डाव्या विचाराचा दबदबा आहे की बाजारपेठेचा गवगवा.

Thursday, 17 September 2009

मलिहाबाद


मैलोन मैल पसरलेल्या आंब्याच्या बागा. इतर झाडांचीही गर्दी. “हिरवा चारा बैल माजले..” या ओळींची आठवण यावी असं गवत. मान्सून केवळ नावालाच या वर्षी बरसला. हवेत दमटपणा कमालीचा आणि पाऊस नव्हता। त्यामुळे अंग घामेजून गेलं.
शब्बीरभाई लखनौचे बिल्डर. त्यांनी तिकडे एक बाग खरेदी केली ३५ लाख रुपयांना.दोन वर्षांपूर्वी. त्या जमिनीची आजची किंमत ५५ लाख रुपये असल्याचं सांगतात. आंब्याची बाग मोठी असेल तर तिची देखभाल करणं कठीण होतं. अनेकांनी आंब्याच्या बागा विकून बिल्डर लाइनमध्ये पैसे गुंतवले, असं अहमदउल्ला सांगत होता. आंब्याच्या बागा हाच मलिहाबादचा व्यवसाय आहे. नर्सरी, आंब्यांच्या बागांची देखभाल, आंब्याच्या झाडांना लागणा-या रसायनांची विक्री, आंब्याचा व्यापार, वाहतूक यावर हजारो लोकांची उपजिवीका चालते. लखनऊ आता काकोरीपर्यंत पोचलं आहेच. तिथून मलिहाबाद काही किलोमीटरवर आहे. मलिहाबादला शाळा नाही की हॉस्पिटलही नाही. रोज लोकांना लखनऊला पळावं लागतं.
अहमदउल्लांचं खानदान मलिहाबादी. शब्बीरभाईं म्हणाले अहमदउल्ला आणि त्यांच्या बिरादरीतल्या कोणत्याही माणसाकडे पाह्यल्यावरच कळतं की ते मलिहाबादी आहेत. अहमदउल्लाच्या आंब्याच्या बागा आहेत त्याशिवाय आडत आहे, आंब्याचा व्यापारही आहे. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद अनेक शहरात अहमदउल्ला दशहरी आंबे पाठवतो. सौदी अरेबियातही पाठवतो. अहमद उल्लाचे आजोबा स्वातंत्र्यलढ्यात होते. त्यांना तीन महिने अंधारकोठडीत ठेवलं होतं. कोठडी अशी की त्यांना एकतर उभं राहवं लागेल किंवा बसता येईल. झोपता येणार नाही. काही वर्षांपूर्वीचे त्यांचं निधन झालं. सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
अशफाक उल्ला खान हे क्रांतीकारक याच प्रदेशातले. ते हिदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारक संघटनेचे कार्यकर्ते होते. सशस्त्र संघर्ष करूनच हिंदुस्थान स्वतंत्र होऊ शकतो अशी या गटाची धारणा होती. शस्त्रांसाठी पैसे हवेत म्हणून सरकारी खजिना लुटण्याची कल्पना रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्ला खान यांची. ९ ऑगस्ट १९२५ रोजी, शहाँजहापूर-लखनऊ ट्रेनवर या गटाने दरोडा घातला. फक्त सरकारी खजिना लुटला. एकाही प्रवाशाच्या सामानाला त्यांनी हात लावला नाही. चंद्रशेखर आझादही काकोरी कटात होते. त्यांच्यावर जबाबदारी होती लुटलेला खजिना घेऊन जाण्याची. सायकलवर चांदीच्या नाण्यांचं पोतं लादून पॅडल मारत ते लखनऊला गेले. या प्रकरणात चौघांना फाशीची शिक्षा झाली. अशफाक उल्ला, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि राजेंद्र लाहिरी. सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिलमें है, देखना हैं जोर कितना बाजूए कातील में है, हे गीत रामप्रसाद बिस्मिलनी लिहीलं. या चार हुतात्म्यांचं स्मारक काकोरीला आहे. अशफाक उल्ला पठाण होते. राजेंद्र आणि रामप्रसाद ब्राह्मण तर रोशन सिंग ठाकूरह होते.
अशफाकउल्ला हे पठाण. मलिहाबाद-काकोरी या पट्ट्यात अनेक पठाण कुटुंबं कित्येक पिढ्यांपासून स्थिरावली आहेत. एम आर खान हा समाजवादी चळवळीतला कार्यकर्ताही मलिहाबादचा. तो म्हणाला त्यांचं कुटुंब म्हणे ७०० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातून मलिहाबादला स्थलांतरीत झालं. मलिहाबादला आंब्याची लागवड या पठाणांनीच सुरु केली. दशेरी आंब्याची जात त्यांनीच विकसीत केली. लखनऊच्या नबाबांनी या बागांना आश्रय दिला म्हणून तिथे आंब्याच्या बागा फुलल्या आणि पठाणांची बिरादरी स्थिरावली.
शब्बीरभाई जाफरचे चाचा. जाफर शिया मुसलमान. लखनवी चिकनकारी, लखनवी कबाब, लखनवी बिरयानीचं त्याला भयंकर कौतुक. उर्दू शेर संवादात पेरताना, अर्ज किया आहे वगैरे बोलून पेश करतो. बोलण्याची अदब आणि दिखावा थेट कायस्थासारखा आणि आव ब्राह्मणाचा. मी म्हटलं कुर्तुल ऐन हैदर यांच्या कथा-कादंब-यांमध्ये लखनऊचं वर्णन येतं. तिथल्या स्थळांचं, हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन यांच्या सहजीवनाचं इत्यादी. तर तो म्हणाला कुर्तुल ऐन हैदर त्याच्या कुटुंबातीलच. कुर्तुल ऐन हैदर शिया होत्या हे तेव्हा मला कळलं. काल रात्री मोटारीतून जाताना कुण्या मशिदीजवळ लग्नाचा समारंभ होता त्यामुळे थोडावेळ आमची मोटार ट्रॅफिकमध्ये अडकली. हळूहळू पुढे जात होती. खास लग्नाचे पोशाख केलेले स्त्री-पुरुष दिसले. बुरखा घातलेली एकही बाई नव्हती. ड्रायव्हर म्हणाला किसी शिया की शादी है. म्हणजे ती मशिदही शियांचीच असावी. शिया जास्त कल्चर्ड असतात असं अभिषेक सिंगही सांगत होता. सुन्नींच्या लग्नात मंडपात पोचायला उशीर झाला तर हाडकांच्या ढिगावरूनच चालावं लागतं, असं तो म्हणाला. शियांमध्ये शिक्षणाचं त्यातही उच्च शिक्षणाचं प्रमाण खूप आहे. ते व्यापार-उद्योग वा नोकरीच वरच्या पदावर ते असतात. त्या उलट सुन्नी. तो सर्वहारा वर्ग आहे. शिक्षणाचं प्रमाण कमी, दारिद्र्य भीषण. जाफर वा त्याचे चाचाजी भाजप आणि काँग्रेस या दोन ध्रुवांवर हेलकावत असत. चुकूनही मायावती वा मुलायम सिंग यांच्याबद्दल बोलत नसत. जाफर तर वाजपेयीजींना पंडितजीच म्हणायचा (जातीने वाजपेयी कायस्थ आहेत.). जाफरचा फेवरिट ड्रायवर, शर्मा. म्हणजे ब्राह्मण. जाफरच्या चाचाजींचा निष्ठावंत सेवकही ब्राह्मणच होता. ते त्याला पंडीतजी म्हणूनच पुकारायचे. पंडितजी वॉचमनच्या गणवेशात हातात लाठी घेऊन त्यांच्यासोबत सावलीसारखा असायचा. जाफरचा म्हणजे आमचा ड्रायव्हर शर्माजी. हिंदू लिबरल आहेत तीच कशी चूक झाली, बुद्ध आणि महावीर यांच्या अहिंसेच्या संदेशामुळे कसं देशाचं नुकसान झालं वगैरे तो सांगत होता. गुजरातमध्ये मुसलमानांना धडा शिकवला ते उत्तम झालं. आता तोच धडा देशभर गिरवला पाहिजे, असं काय काय बोलत होता. त्याचे विचार ऐकत लखनऊच्या विमानतळावर पोचलो.

रघू दंडवते


रघू दंडवते गेला. सोमवारी सकाळी सतीश तांबेचा फोन आला, त्याने सांगितलं. त्यानंतर जयंत धर्माधिकारीचा एसएमएस आला. मी नाशिकला होतो. इखलाखशी चर्चा करतानाच सतीशचा फोन आला होता. त्यानंतर सतीशशी बोललो. मनोज होताच. त्याच्याबरोबर मार्केट इंटेलिजन्स द्राक्ष उत्पादकांना कसा उपयोगी पडतो त्यावर चर्चा वगैरे. मग द्राक्ष बागायतदार संघाचं अधिवेशन. कामातच गुंतून गेलो. रघुचं निधन झाल्याची बातमी जवळपास विसरुनच गेलो.
संगमनेरहून पुण्याला जाताना रघूची आठवण झाली. त्याची साधी, सोपी आकृती, प्रेमळ चेहेरा, बोलण्याची ढब आठवली आणि स्वतःशीच हसलो. त्याची काही वाक्यंही जशीच्या तशी आठवली. मग सतीशला फोन केला. रघूच्या आठवणी उगाळण्यासाठी चार-दोन दिवसात भेटायला हवं.
अशोक आणि रघू दोघेही सिनिक. त्यांच्या सिनिसिझममध्ये त्रागा नाही. मौज आहे. काही वर्षांपूर्वी जयंत धर्माधिकारी, नंदू धनेश्वर, संजीव साबडे, अशोक, सतीश तांबे, हेमू, मी, विजय, अरुण केळकर, मेघनाद कुलकर्णी असे काहीजण जमलो होतो. कपिल पाटील त्यावेळी "आज दिनांक" काढायचा तर निखिलचं "आपलं महानगर" सुरु होतं. नंदू निखिलची खूप तारीफ करत होता. रघु म्हणाला, कपिल आणि निखिल दोघांचेही पेपर चालले पाहिजेत. त्यांच्या पाया पडा हवं तर पण सांगा की पेपर बंद करू नका. का म्हणून विचारलं तर रघु म्हणाला, अरे तुमचं "दिनांक" बंद पडलं म्हणून तर हे भिकारचोट पेपर काढायला लागले. आता ह्यांची वर्तमानपत्रं बंद पडली तर आणखी कोणीतरी अडाणचोट पुढे येतील त्यापेक्षा हे बरे.
गप्पांच्या ओघात दिनांकचा ताळेबंद माडणं सुरुच होतं. अरुण केळकर म्हणाला, .......या एका कारणासाठी जयंतला शंभर गुन्हे माफ करायला हवेत. रघु म्हणाला ते ठिकाय. गुन्हे का माफ केले हे सांगितलंत आता ते १०० गुन्हे सांगा.
मधू (नाना) दंडवतेंवर बायपास सर्जरी झाली होती. रघुवरही झाली होती. मी नानांच्या घरी गेलो. खादीचे स्टार्चचे कपडे चढवून नाना भेटायला येणा-या लोकांशी बोलायला तयारीत बसले होते. तिथे अशोकही आला होता. नाना त्यावेळी खासदार नव्हते. त्यावेळी वर्तमानपत्रातून खासदारांच्या हक्कांबाबत काही चर्चा सुरु होती. नाना अर्थातच त्या विषयावर बोलू लागले. राज्यघटनेचे संदर्भ, आजपर्यंतचे पायंडे वगैरे सांगत। रघू एका चटईवर लेंगा-शर्ट घालून बसला होता. तो म्हणाला, अरे अशोक आमचा नाना खासदार झाल्यापासून नेहमी खासदारांच्या बाजूनेच बोलत असतो. लोकांच्या बाजूने बोलतच नाही. नानाही हसायला लागले.
रघू आणि अशोक यांच्यात एक कॉमन होतं ते म्हणजे जात, धर्म, देश, भाषा, प्रांत यांच्या अभिमानाच्या बिंदूवर ते प्रश्नचिन्ह लावत असत. शिवाजी म्हटलं की रघू म्हणायचा मराठ्यांच्या राज्यापेक्षा आमच्या नगरकडल्या मुसलमानांच्या राजवटी ब-या होत्या की. मुसलमान राजांनी लोकहिताची काय कामं केली हेही सांगायचा. महाराष्ट्राने अभिमान कोणाचा बाळगायचा, संतांचा की शिवाजीचा असा प्रश्न तो आणि अशोक करत असत. रामजन्मभूमीच्या आंदोलनाबद्दल रघू म्हणायचा, बाबरी मशिद पाडली कोणी याचा अजून छडा लागलेला नाही. भाजप, विहिंप वा रास्वसंघ कोणीच कबूल करत नाही की त्यांनी मशिद पाडली. सरकार वा न्यायालयानेही मशिद कोणी पाडली, याबद्दल काहीही मतप्रदर्शन केलेलं नाही. १९९२ साली मशिद पाडण्यात आली, त्याचं व्हिडीओ चित्रण वगैरेही आहे पण झाल्या प्रकाराला कोण जबाबदार आहे हेच अजून समजलेलं नाही, हे गौडबंगालच आहे, असं तो म्हणायचा.
रघूच्या बोलण्याची पद्धत खास होती. पुटपुटल्यासारखं तो बोलायचा. कोणताही महत्वाचा मुद्दा तो अगदी सामान्यपणे सांगायचा. त्याच्या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ बनवण्याची जबाबदारी अरुण कोलटकरने घेतली. संग्रहाचं नाव त्याने विचारलं तर रघू म्हणाला नावाचा आणि कवितांचा काय संबंध. उदाहरणार्थ वडलांनी माझं नाव रघू ठेवलं. माझा त्या नावाच्या अर्थाशी काही संबंध नाही। रघू अरूणलाही असा पेचात टाकायचा. वादात त्याला रस नसायचा. शेरेबाजी मात्र सतत चाललेली असायची. विजय तेंडुलकर म्हणजे गुलशन नंदासारखाच आहे, असं सहजपणे म्हणून जायचा. त्यातल्या त्यात विजयाबाई (विजया मेहता) मात्र अजून सेवादलवाली आहे, अशी पुस्ती जोडायचा. कोणतेही दाखले देताना तो म्हणायचा हे सर्व ऐकीव आहे बरं का.
रघूच्या नावावर अनेक ऐकीव गोष्टी आहेत. मुल्ला नसरुद्दीन अशा ऐकीव गोष्टींमधूनच साकार होतो. तो खरा होता की नाही, त्या पात्राचा निर्माता कोण या प्रश्नांची उत्तरं विकीपिडीयातही मिळत नाही। आपण जुन्या काळात असतो तर रघूचीही दंतकथा तयार झाली असती.