भारतातली शेती पावसाच्या भरवंशावर असते, हे वाक्य शाळेपासून मनावर बिंबवलं जातं। वस्तुतः कोणत्याही देशातली शेती पावसावरच अवलंबून असते कारण शेतीसाठी आणि पिण्यासाठी आवश्यक असणारं पाणी आकाशातच तयार होतं. जमिनीत पाणी तयार होण्याची नैसर्गिक यंत्रणा कुठेही अस्तित्वात नाही. मान्सून वा मोसमी वा-यांवर भारतातली शेती अवलंबून असते असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. मोसमी वारे वा मान्सून हा शब्द अरबांनी भारतीय उपखंडाची ओळख झाल्यावर प्रचलित केला. आपल्याकडे “नेमेचि येतो मग पावसाळा”, म्हणजे ‘पावसाळा’ हाच शब्द होता. मान्सून हा शब्दच परदेशी असल्याने तो लहरी असतो हे गृहितकही परदेशीच आहे. मान्सून लहरी असता तर भारत हा शेतीप्रधान देश राहिलाच नसता. अन्नधान्याची वाढती गरज पुरवण्यासाठी पावसाने जे वेळापत्रक पाळायला हवं ते पाळलं जात नाही म्हणून मान्सूनला लहरी म्हणण्याचा प्रघात रुढ झाला आहे.
शेतीप्रधान ही संज्ञाही तपासून पाह्यला हवी. शेतीप्रधान या शब्दामध्ये पिकांचं वैविध्य अभिप्रेत नाही. केवळ शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा वाटा हे दोन मुद्दे विचारात घेऊन एखादा देश शेतीप्रधान आहे की नाही हे ठरवलं जातं. औद्योगिक क्रांती होईपर्यंत जगातील अनेक देश शेतीप्रधान होते. युरोप कदाचित व्यापार प्रधान असावा. शेतीवर गुजराण होईल एवढं उत्पादनच तिथे त्या काळात होत नव्हतं. पिकांची विविधताही फारशी नव्हती. मान्सूनमुळेच भारतामध्ये विविध प्रकारची शेती आणि पिकं आहेत. युरोप वा अमेरिकेसारखी केवळ चार-दहा पिकांची शेती भारतात होत नाही. धान्य, डाळी, तेलबिया, भाज्या, फळं, दूध, मांस, मासे अशा कोणत्याही खाद्यान्नामध्ये भारतात जेवढी विविधता आहे तेवढी क्वचितच अन्य कोणत्या देशात असेल. मान्सूनच्या नैसर्गिक वेळापत्रकाप्रमाणे जगण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विविध पिकं आणि खाद्यान्न भारतातल्या समूहांनी विकसीत केली. कमोडिटी मार्केटच्या परिभाषेत याला हेजिंग म्हणतात. अमेरिकेत गहू, मका, सोयबीन या तीनच पिकांमध्ये स्पर्धा असते. या उलट भारतात गहू, धान (धानाच्या अनेक जाती आहेत), ज्वारी, बाजरी, मका, डाळी, सोयबीन, भुईमूग, करडई, सूर्यफूल अशी अनेक पिकं घेतली जातात. विविधता आहे म्हणूनच दर एकरी उत्पादन कमी आहे. किंवा दर एकरी उत्पादन कमी आहे म्हणूनच विविधता आहे.
शेतीमालाचं ठोक उत्पादन नसल्यामुळे आपल्याकडचा अन्न प्रक्रिया उद्योगही प्रामुख्याने घरगुती वा कौटुंबिक पातळीवरचा आहे। राज्यच नव्हे तर प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार स्वैपाकाच्या पद्धती, चवी आपल्याकडे आहेत। त्यामुळे आहारशास्त्राचे अनेक नियम आपल्या खाण्या-पिण्याला लागू होत नाहीत. कारण आधुनिक आहारशास्त्राला आपल्या देशातील अनेक खाद्यान्नांचे गुणधर्मच ठाऊक नाहीत. खाद्यान्नांच्या किंमती त्यांच्यातील पोषणमूल्यांवर ठरतात अशी आधुनिक अर्थातच अमेरिकन धारणा आहे. भारतामध्ये मात्र हे सूत्र उलटंपालटं होऊन जातं. उदाहरणार्थ डाळी. प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी डाळी आहारात आल्या. प्रथिनांचं सर्वाधिक प्रमाण उडदामध्ये असतं। त्यानंतर मूग, त्यानंतर तूर आणि सर्वात शेवटी चणा। मात्र मेदाचं प्रमाण चण्यामध्ये सर्वाधिक असतं। त्यामुळेच तूरडाळ सर्वसामान्यांना परवडणारी होती. या वर्षी मात्र तूरडाळीच्या किंमती चणाडाळीपेक्षा दुप्पट आहेत. मात्र त्यामुळे चणाडाळीचा खप वाढला नाही. लोकांना महाग तूरडाळच हवी आहे. भारतीय जीवन तथाकथित कमोडिटी मार्केटच्या चौकटीत पूर्णपणे बंदिस्त होऊ शकत नाही.
टीपः जिज्ञासू वाचकांनी विविध नियकालिकं, वेबसाईटस्, अहवाल आणि ग्रंथ, संदर्भ तसेच आकडेवारी, संख्याशास्त्रीय माहितीसाठी पहावेत।
चौरस आहार ही कल्पना अमेरिकन शेतीखात्याने शेतमालाच्या उठावाला वेग यावा म्हणून मांडली. तिचा पोषणमूल्यांशी संबंध नाही हे
ReplyDeleteआपल्याला माहीत आहे काय
शेतमालाला रास्त भाव मिळत नाही, हे सुध्दा पिकांचे एकरी उत्पादन (उत्पादकता) कमी असण्याचे एक मुख्य कारण आहे. वावरात भरगच्च पीक बघून सटी-सहामासी खेड्यात जाणा-या शहरी लोकांना जसा एक रोमॅन्टिक आनंद होतो, तसा प्रत्यक्ष शेतक-याला होत नाही. कारण या पिकाची बाजारात काय वासलात लागणार या चिंतेने तो पोखरलेला असतो. ब-याच शहरी लोकांना मात्र वाटतं की शेतकरी अडाणी-अज्ञानी-आळशी असतो, त्याला नवीन तंत्रज्ञानाविषयी अनास्था, उदासीनता असते त्यामुळे उत्पादकता वाढत नाही. असो. हा वेगळा विषय आहे.
ReplyDeleteटीप मार्मिक आहे. एरवी या विषयावर जे लेख येत असतात (मराठीत तरी) त्यातल्या बहुतांश लेखांमध्ये नुसत्या आकडेवारीचाच मारा असतो. दुस-या भागाची वाट पाहत आहोत.