Sunday, 20 September 2009

स्पोर्टस् बार २


स्पोर्टस् बार ऐसपैस आहे. सिलींग खूप उंच आहे. कापड गिरणीच्या इमारतीच्या रचनेत बदल करायला परवानगी मिळाली नाही. म्हणून सिलींगला काळा वा प्रकाश शोषून घेणारा रंग देण्यात आलाय. तोच रंग भिंतींनाही आहे. त्यामुळे नजर आपोआपच भिंतींवर ठिकठिकाणी लावलेल्या प्लाझमा टिव्हींवर हिंडत राहते. वेगवेगळे स्पोर्टस चॅनेल त्यावर सुरु असतात. त्यांची नरडी दाबलेली असल्याने त्यातून आवाज फुटत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या खेळांची दृष्यं तुमचं लक्ष वेधून घेतात. कुस्त्या, फुटबॉल, टेनिस, क्रिकेट, गोल्फ आणि जाहिराती यांचा अखंड प्रवाह त्यांच्यावर सुरु असतो. एक भलामोठा स्क्रीन आहे. त्यावरही कोणता तरी स्पोर्टस् चॅनेल सुरु असतो. बारमध्ये एक पूल टेबल आहे. भिंतीवरच्या निशाणावर डार्ट मारायचा खेळ आहे. टेबलावरच बुद्धिबळाचा पट असतो. एका कोप-यात एक पिंजरा आहे. तिथे जाळीत बॉल टाकण्याचा खेळ आहे. एका कोप-यात साउंड सिस्टीम आहे. तिथे एक डीजे आणि त्याचे एक-दोन मदतनीस असतात. इंग्रजी पॉप म्युझिक सुरु असतं. आवाज एवढा मोठा की गप्पा मारणं शक्यच नसतं. पहिल्यांदा तिथे गेलो तेव्हा मी भांबावून गेलो. कोणाची ओळख करून घ्यायची तर त्याच्या कानात ओरडून नाव सांगायचं. त्यातच एखाद्या फिरंगीशी बोलत असलो तर आणखी पंचाईत व्हायची. संगीताच्या गदारोळात उच्चार कळायचे नाहीत. एखादी बीअर, स्नॅक्स, सहका-यांसोबत हाय-हॅलो की झाली पार्टी.
बीअर वा व्हिस्की प्यायची तर जवळच्या मित्रांसोबत निवांत गप्पा मारायच्या. अनुभवांची देवघेव करायची. नंतर जेवण म्हणजे क्लायमॅक्स, अशी माझी पार्टीची कल्पना होती. स्पोर्टस बारमध्ये येणारी तरूणाई ट्रेकिंग करणारी नाही, आपण जिथे राहतो तिथल्या समाजाशी जुळलेली नाही. ते ना गणपती उत्सवात असतात ना दहीकाल्यामध्ये. धमाल करायला म्हणजे नाच, गाणं, पिणं, खाणं एकाच ठिकाणी करायला ते स्पोर्टस बारमध्ये येतात. कंपन्यांमधले मॅनेजर बहुसंख्येने तरूण असतात. म्हणजे तिशीच्या आसपासचे. दिवसभर काम करून शिणलेले असतात. मिटिंग्जमध्ये वर्किंग लंच असतो. शुक्रवारी वा विक डे ला ऑफिसातल्या सहका-यांसोबत ते पार्टी करतात. तेव्हा ड्रिंक्स, स्नॅक्स आणि म्युझिक. मोठी पार्टी असेल तर डान्स. अशा पार्ट्या टिम बिल्डींगचाही भाग असतात. त्यामुळे पार्टीतही ही माणसं फॉर्मलच असतात. भारतीय संगीत वा नृत्य या ढाच्यात बसत नाही.
आमच्या बाजूच्या टेबलवर दोन मित्र बीअरचे एक-दोन घुटके घेऊन डार्ट मारत होते. निशाणाच्या मध्यबिंदूवर डार्ट मारण्यासाठी त्यातला एकजण इरेस पडला होता. हाताच्या पोझिशन्स बदलून तो निशाणा साधण्याचा प्रयत्न करत होता. निशाणावर डार्ट आदळला की किती गुण मिळाले ते इलेक्ट्रॉनिक बोर्डावर झळकत असे. बीअरचं प्रमाण वाढत गेलं तसा त्यांच्यातल्या एकाचा डार्ट मारण्याचा उत्साह संपला. दुसराही थकला होता पण त्याचा उत्साह कमी झाला नव्हता.
त्यांच्या पलिकडे पूल टेबल होतं. दोन जण तिथे खेळत होते. आमच्या तरुणपणी या खेळाला बिलीअर्डस् म्हणायचे. आता पूल म्हणतात. (पूर्वी लिफ्ट असायची. आताही लिफ्टच असते पण तिला एलेव्हेटर म्हणतात. जाहिरात विभागाला रिस्पॉन्स म्हणतात.) माझ्या समोरच्या टिव्हीवर गोल्फ सुरु होता. बिलीअर्डस आणि गोल्फ अधून-मधून बघत मी गप्पा मारत होतो. गुरुवारी स्पोर्टस बारमध्ये गाण्याचीही संधी मिळते. म्हणजे पाश्चात्य गाण्यांची एक यादी आहे. त्या गाण्यांच्या सिड्या लावतात. त्यातला माणसाचा आवाज ऐकू येणार नाही फक्त वाद्यसंगीत ऐकू येईल अशी व्यवस्था करतात. गाण्याचे शब्द सबटायटल्स सारखे पडद्यावर उमटतात. ते ज्या क्रमाने आणि पॉजने उच्चारायचे तसे हायलाइट होतात. गाणं म्हणणा-याने पडद्यावर बघत गाणं म्हणायचं. हा झकास प्रकार होता. त्यामुळे मला गाण्याचे शब्द कळणं सोपं गेलं. पहिलं गाणं त्यांच्या डीजेनेच म्हटलं. त्यानंतर एका मुलाने म्हटलं. रणजित पाश्चात्य संगीताचा शौकीन. पियानो वाजवणारा, संगीत रचना करणारा. त्याला हुआफ्रीदने आग्रह केला. रणजितने आढेवेढे न घेता गाणं म्हटलं. फ्रँक सिनात्राचं, स्ट्रेन्जर्स इन द नाइट. प्रेमावरचं रोमँटिकच गाणं. रणजितच्या गाण्याचं जोरदार स्वागत झालं. गाणं संपल्यावर अनेकांनी टाळ्या वाजवल्या. खास लोकाग्रहास्तव रणजितने आणखी एक गाणं म्हटलं. तेही फ्रँक सिनात्राचंच.
मी पडद्यावर गोल्फ आणि बारमध्ये बिलीअर्ड आलटून-पालटून बघत होतो. निघताना म्हणालो, गोल्फचं मैदान छोटं करण्यासाठी पूल टेबलचा शोध कोणीतरी लावला असावा. पूल टेबलही खूप जागा खातं म्हणून कॅरम बोर्ड आला असावा. सर्वांनी या कॉमेंटला दाद दिली. मी म्हटलं गोल्फ आणि बिलीअर्डची गंमत अशी की, they put balls in the holes सर्वजण गोरेमोरे झाले. पण हसले. मी एक पाऊल पुढे जाऊन म्हटलं.... and that too with the stick या वाक्यावर मात्र जोरात हसणं त्यांनी टाळलं. ऑफिसातल्या सहका-यांबरोबरच्या पार्टीत असा जोक मारणं बहुधा असभ्य समजलं जात असावं. या पार्ट्यांमध्ये कोमट विनोदाचा अधून-मधून शिडकावा करायचा असतो. तमाशातला रांगडेपणा इथे चालत नाही.

No comments:

Post a Comment