Saturday, 19 September 2009

स्पोर्टस बार १

सहा महिने झाले पण ऑपरेशन्स टीमचे मॅनेजर एकत्र जमलेले नव्हते. एक प्रॉडक्ट मॅनेजर बंगलोरला असायचा, तर दुसरा पुण्याला. कंटेट ऑपरेशन्स हेड चंडीगडला तर हेड ऑफ ऑपरेशन्स आणि प्रोग्रॅम मॅनेजर आज पुण्याला तर उद्या कोलकत्याला, परवा चंडीगड वा भोपाळ, असे हिंडत असायचे. कस्टमर सपोर्ट मॅनेजर नुक्ताच टीममध्ये सामील झाला होता. पुढच्या सहा महिन्याची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी सर्व मॅनेजर्सची दोन दिवसांची मिटिंग मुंबईला होती. सकाळी नऊ वाजता सुरु झालेली मिटिंग संध्याकाळी साडेसात-आठ पर्यंत चालायची. मिटींगचा शीण घालवण्यासाठी रात्री आम्ही फिनिक्स मिल कंपाऊंडमधल्या स्पोर्टस बारमध्ये गेलो.
फिनिक्स मिल लोअर परेलला होती. तुळशी पाइप रोडला. तुळशी पाइप रोडचं अधिकृत नाव—सेनापती बापट मार्ग. तुळशी तलावातून मुंबईला पाणी पुरवठा करणारे भलेमोठे पाइप माहीमची खाडी पार केल्यावर भूमिगत होतात त्यांच्यावरून जो रस्ता जातो तो तुळशीपाइप रोड. मिलच्या समोरच्या रस्त्यावर कामगारांच्या चाळी. शिवसेनेचे नेते दत्ताजी नलावडे तिथेच राह्यचे. अजूनही त्यांनी तिथली खोली विकलेली नसावी. गेली कित्येक वर्षं त्यांचं कार्यक्षेत्र तेच आहे. दत्ताजी फार पूर्वी सेवादलात वगैरे होते. साठच्या दशकात शिवसेनेत गेले. ते राह्यचे त्या चाळीतली एक खोली गणेशने भाड्याने घेतली होती. खोली दुस-या मजल्यावर होती. तिला एक पोटमाळाही होता. खोलीत त्याने ऑफीस थाटलं होतं. तो डीटीपीची, प्रिटींगची सटर-फटर काम घ्यायचा. पोटमाळ्यावर झोपायचा. सकाळ-संध्याकाळ जेवणाचा डबा मागवायचा. चहा-नाश्ता टपरीवर करायचा.
१९८१ सालच्या गिरणीसंपानंतर मुंबईतल्या गिरणीकामगारांचं कंबरडं मोडलं. संपाचा फायदा घेऊन मालकांनी गिरण्या बंद करण्याचाच सपाटा लावला. संपापूर्वी मुंबईत जवळपास ६० गिरण्या आणि अडीच लाख कामगार होते. आता त्यापैकी चार-दोन गिरण्या उरल्या असतील. माझा मित्र दत्ता इस्वलकर त्यावेळी मॉडर्न मिलमध्ये नोकरीला होता. यथावकाश ती गिरणीही बंद पडली. १९८८ साली दत्ताने मला त्याच्या कामात ओढलं. आम्ही दोघांनी मिळून वस्त्रोद्योग धोरणावर एक टिपण तयार केलं. त्यातूनच पुढे बंद गिरणी कामगार संघर्ष समिती निर्माण झाली. गिरणीकामगारांमध्ये काम करणा-या विविध पक्षांच्या युनियनना एकत्र आणून आम्ही एक परिषद घेतली होती. साथी बगाराम तुळपुळे परिषदेचे अध्यक्ष होते. डॉ. दत्ता सामंत, कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनीही या परिषदेला हजेरी लावली. हातमाग, यंत्रमाग, सूत गिरण्या, कापडगिरण्या यांना सामावून घेणा-या वस्त्रोद्योग धोरणाची भारताला गरज आहे. या धोरणामध्ये कामगारांना न्याय मिळेल अशी तरतूद हवी. तसं झालं तरच बेकारी आणि कामगारांचं शोषण या समस्यांची उकल होऊ शकेल, अशी मांडणी बगारामनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली होती.
अर्थात सरकारने या मागणीला प्रतिसाद दिला नाही. बंद गिरणी कामगार संघर्ष समिती ही नव्याने स्थापन झालेली संघटना होती. नव्या वस्त्रोद्योग धोरणाच्या मागणीसाठी संघटीत शक्ती उभी करण्याचं सामर्थ्य त्यावेळी या संघटनेकडे नव्हतं. बंद पडलेल्या गिरण्यातील कामगारांची देणी मालकांनी चुकती करावीत यासाठी समितीने संघर्ष सुरु केला. दत्ता, विठ्ठल घाग आणि त्यांचे अन्य सहकारी हे आंदोलन नेटाने चालवू लागले. बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर कामगारांचाही हक्क आहे, हा मुद्दा हाती घेऊन त्यांनी लढाई पुढे नेली. त्यांना कामगारांची साथ मिळाली. या आंदोलनाशी मी जवळून संबंधीत होतो.

त्याकाळातच फिनिक्स मिल बंद झाली. मिलच्या कंपाऊंडमध्ये मॉल, स्पोर्टस बार आणि त-हेत-हेची, रुचीरुचीची रेस्त्रां उभी राहू लागली. गंमत म्हणजे बोलिंग ऍली वगैरे खेळांच्या केंद्राला कामगारांचं करमणूक केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली होती. बंद गिरणी कामगार संघर्ष समितीने फिनिक्स मिलमध्ये जी नवी डेव्हलपमेंट सुरु झाली त्याच्या विरोधात आंदोलन छेडलं होतं. विक्रम गोखलेने त्यांना पाठिंबा दिला होता. तो त्यांच्या धरण्यात सामील झाला होता.
गिरण्यांच्या जमिनीवर टोलेजंग, अत्याधुनिक इमारती उभ्या राह्यल्या आहेत. तिथे देशी-विदेशी कंपन्यांची ऑफिसं आहेत. देशाचा विकासदर झपाट्याने वर जातोय हे तिथे गेल्यावर पटतं. म्हणून तर या एरियाला आता अप्पर वरळी म्हणा अशी मागणी कधीतरी झाली होती. लोअर परेल या नावावर गिरणगावाचा ठसा आहे. तो पुसून टाकावा म्हणून ही मागणी कोणीतरी केली म्हणे. मागणी कोणी केली, कधी केली हे ठाऊक नाही पण मराठी वर्तमानपत्रांनी मात्र तिच्या विरोधात आघाडी उघडली होती.
तुळशी पाइप रोडवरच्या कॉर्पोरेट पार्कांना गरीब चाळींचा वेढा पडलाय. अजूनही तिथे सनमिल कंपाऊंडसारखी स्वेट शॉप्स आहेत. चार-चार फुटावर चहाची टपरी आणि सिग्रेटची दुकानं आहेत. सकाळी अनेक नाक्यांवर पोहे, उपमा, शिरा यांचे स्टॉल लागतात. कमी भांडवलात चालणारे हे व्यवसाय चाळीतल्या मराठी लोकांच्या ताब्यात आहेत. “माझंही दारिद्र्याचं स्वतंत्र शेत आहे”, या सत्तरच्या दशकात नामदेव ढसाळने लिहिलेल्या ओळी आजही ताज्या वाटतात.
यावर्षी गोकुळष्टामीच्या दिवशी पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कमधले अनेक जण हंडी फोडण्याचा सोहळा पाह्यला बाहेर आले होते. व्होल्वो बसमधून एक गोविंदा आला. त्यांनी मानवी इमला रचायला सुरुवात केली. चाळीतल्या चार-दोन घरांतून दोन-तीन बादल्या पाणी टाकण्यात आलं. चार-पाच पाण्याचे फुगे कोणीतरी फेकले. त्यांच्या पाठोपाठ दोन ट्रकांमधून दुसरा गोविंदा आला. बसमधल्या गोविंदाला हंडी फोडता आली नाही तर दुसरा गोविंदा रस्त्यावर उतरणार होता. आमच्या आणि इतर कंपन्यांमधले पंजाबी, उत्तर भारतीय, दाक्षिणात्य, बंगाली, बिहारी स्त्री-पुरुष उत्सुकतेने हंडी फोडण्याचा सोहळा बघत होते. हंडी फुटल्यावर त्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. वोल्वोतल्या गोविंदाने हंडी फोडून झाल्यावर दुस-या दिशेला कूच केलं. ट्रकातला गोविंदाही शांतपणे निघून गेला.
हॅव यू प्लेड धिस, असं काही जणांनी मला विचारलं. मी हो म्हटल्यावर, त्यांना चक्क माझा हेवा वाटला. पण मी अशा प्रोफेशनल गोविंदा पथकात नव्हतो, असं त्यांना सांगण्यात अर्थ नव्हता. त्यांना ठाऊक असलेला गोविंदा हाच होता.

1 comment:

  1. Good stuff! My father used to work at New City Mills in Chinchpokli since before I was born. In 1981, during the strike, we came back to Nagpur from Mumbai for a couple of years. We returned around 1983 and stayed there till 1991.

    I've been inside the mill and witnessed their workings first hand, thanks to some very helpful workers there who gave me a guided tour.

    I was very young then. But I still distinctly remember the defeaning noise, the smell of steam, chemicals, the unbearable heat, cotton lint covering almost every inch of the factory area, the lovely potato bhajiya that the workers treated me to.I also remember the stream of people marching to work from Chinchpokli station, just as the sun began to rise in the horizon. This post brought back all those memories again.

    That trip had also made me realise how important the mills were to the making of Mumbai itself. The 1980s strike did break the back of the textile industry. By the time we left Mumbai, it was well into a state of irreversible decline.

    The two mills in Nagpur, Empress and Model Mills, also closed down one by one. My father worked in Model Mills until it closed down on 31st December 2003. Perhaps that took some part of him away too. He passed away exactly 45 days later.

    ReplyDelete