Thursday, 17 September 2009

मलिहाबाद


मैलोन मैल पसरलेल्या आंब्याच्या बागा. इतर झाडांचीही गर्दी. “हिरवा चारा बैल माजले..” या ओळींची आठवण यावी असं गवत. मान्सून केवळ नावालाच या वर्षी बरसला. हवेत दमटपणा कमालीचा आणि पाऊस नव्हता। त्यामुळे अंग घामेजून गेलं.
शब्बीरभाई लखनौचे बिल्डर. त्यांनी तिकडे एक बाग खरेदी केली ३५ लाख रुपयांना.दोन वर्षांपूर्वी. त्या जमिनीची आजची किंमत ५५ लाख रुपये असल्याचं सांगतात. आंब्याची बाग मोठी असेल तर तिची देखभाल करणं कठीण होतं. अनेकांनी आंब्याच्या बागा विकून बिल्डर लाइनमध्ये पैसे गुंतवले, असं अहमदउल्ला सांगत होता. आंब्याच्या बागा हाच मलिहाबादचा व्यवसाय आहे. नर्सरी, आंब्यांच्या बागांची देखभाल, आंब्याच्या झाडांना लागणा-या रसायनांची विक्री, आंब्याचा व्यापार, वाहतूक यावर हजारो लोकांची उपजिवीका चालते. लखनऊ आता काकोरीपर्यंत पोचलं आहेच. तिथून मलिहाबाद काही किलोमीटरवर आहे. मलिहाबादला शाळा नाही की हॉस्पिटलही नाही. रोज लोकांना लखनऊला पळावं लागतं.
अहमदउल्लांचं खानदान मलिहाबादी. शब्बीरभाईं म्हणाले अहमदउल्ला आणि त्यांच्या बिरादरीतल्या कोणत्याही माणसाकडे पाह्यल्यावरच कळतं की ते मलिहाबादी आहेत. अहमदउल्लाच्या आंब्याच्या बागा आहेत त्याशिवाय आडत आहे, आंब्याचा व्यापारही आहे. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद अनेक शहरात अहमदउल्ला दशहरी आंबे पाठवतो. सौदी अरेबियातही पाठवतो. अहमद उल्लाचे आजोबा स्वातंत्र्यलढ्यात होते. त्यांना तीन महिने अंधारकोठडीत ठेवलं होतं. कोठडी अशी की त्यांना एकतर उभं राहवं लागेल किंवा बसता येईल. झोपता येणार नाही. काही वर्षांपूर्वीचे त्यांचं निधन झालं. सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
अशफाक उल्ला खान हे क्रांतीकारक याच प्रदेशातले. ते हिदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारक संघटनेचे कार्यकर्ते होते. सशस्त्र संघर्ष करूनच हिंदुस्थान स्वतंत्र होऊ शकतो अशी या गटाची धारणा होती. शस्त्रांसाठी पैसे हवेत म्हणून सरकारी खजिना लुटण्याची कल्पना रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्ला खान यांची. ९ ऑगस्ट १९२५ रोजी, शहाँजहापूर-लखनऊ ट्रेनवर या गटाने दरोडा घातला. फक्त सरकारी खजिना लुटला. एकाही प्रवाशाच्या सामानाला त्यांनी हात लावला नाही. चंद्रशेखर आझादही काकोरी कटात होते. त्यांच्यावर जबाबदारी होती लुटलेला खजिना घेऊन जाण्याची. सायकलवर चांदीच्या नाण्यांचं पोतं लादून पॅडल मारत ते लखनऊला गेले. या प्रकरणात चौघांना फाशीची शिक्षा झाली. अशफाक उल्ला, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि राजेंद्र लाहिरी. सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिलमें है, देखना हैं जोर कितना बाजूए कातील में है, हे गीत रामप्रसाद बिस्मिलनी लिहीलं. या चार हुतात्म्यांचं स्मारक काकोरीला आहे. अशफाक उल्ला पठाण होते. राजेंद्र आणि रामप्रसाद ब्राह्मण तर रोशन सिंग ठाकूरह होते.
अशफाकउल्ला हे पठाण. मलिहाबाद-काकोरी या पट्ट्यात अनेक पठाण कुटुंबं कित्येक पिढ्यांपासून स्थिरावली आहेत. एम आर खान हा समाजवादी चळवळीतला कार्यकर्ताही मलिहाबादचा. तो म्हणाला त्यांचं कुटुंब म्हणे ७०० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातून मलिहाबादला स्थलांतरीत झालं. मलिहाबादला आंब्याची लागवड या पठाणांनीच सुरु केली. दशेरी आंब्याची जात त्यांनीच विकसीत केली. लखनऊच्या नबाबांनी या बागांना आश्रय दिला म्हणून तिथे आंब्याच्या बागा फुलल्या आणि पठाणांची बिरादरी स्थिरावली.
शब्बीरभाई जाफरचे चाचा. जाफर शिया मुसलमान. लखनवी चिकनकारी, लखनवी कबाब, लखनवी बिरयानीचं त्याला भयंकर कौतुक. उर्दू शेर संवादात पेरताना, अर्ज किया आहे वगैरे बोलून पेश करतो. बोलण्याची अदब आणि दिखावा थेट कायस्थासारखा आणि आव ब्राह्मणाचा. मी म्हटलं कुर्तुल ऐन हैदर यांच्या कथा-कादंब-यांमध्ये लखनऊचं वर्णन येतं. तिथल्या स्थळांचं, हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन यांच्या सहजीवनाचं इत्यादी. तर तो म्हणाला कुर्तुल ऐन हैदर त्याच्या कुटुंबातीलच. कुर्तुल ऐन हैदर शिया होत्या हे तेव्हा मला कळलं. काल रात्री मोटारीतून जाताना कुण्या मशिदीजवळ लग्नाचा समारंभ होता त्यामुळे थोडावेळ आमची मोटार ट्रॅफिकमध्ये अडकली. हळूहळू पुढे जात होती. खास लग्नाचे पोशाख केलेले स्त्री-पुरुष दिसले. बुरखा घातलेली एकही बाई नव्हती. ड्रायव्हर म्हणाला किसी शिया की शादी है. म्हणजे ती मशिदही शियांचीच असावी. शिया जास्त कल्चर्ड असतात असं अभिषेक सिंगही सांगत होता. सुन्नींच्या लग्नात मंडपात पोचायला उशीर झाला तर हाडकांच्या ढिगावरूनच चालावं लागतं, असं तो म्हणाला. शियांमध्ये शिक्षणाचं त्यातही उच्च शिक्षणाचं प्रमाण खूप आहे. ते व्यापार-उद्योग वा नोकरीच वरच्या पदावर ते असतात. त्या उलट सुन्नी. तो सर्वहारा वर्ग आहे. शिक्षणाचं प्रमाण कमी, दारिद्र्य भीषण. जाफर वा त्याचे चाचाजी भाजप आणि काँग्रेस या दोन ध्रुवांवर हेलकावत असत. चुकूनही मायावती वा मुलायम सिंग यांच्याबद्दल बोलत नसत. जाफर तर वाजपेयीजींना पंडितजीच म्हणायचा (जातीने वाजपेयी कायस्थ आहेत.). जाफरचा फेवरिट ड्रायवर, शर्मा. म्हणजे ब्राह्मण. जाफरच्या चाचाजींचा निष्ठावंत सेवकही ब्राह्मणच होता. ते त्याला पंडीतजी म्हणूनच पुकारायचे. पंडितजी वॉचमनच्या गणवेशात हातात लाठी घेऊन त्यांच्यासोबत सावलीसारखा असायचा. जाफरचा म्हणजे आमचा ड्रायव्हर शर्माजी. हिंदू लिबरल आहेत तीच कशी चूक झाली, बुद्ध आणि महावीर यांच्या अहिंसेच्या संदेशामुळे कसं देशाचं नुकसान झालं वगैरे तो सांगत होता. गुजरातमध्ये मुसलमानांना धडा शिकवला ते उत्तम झालं. आता तोच धडा देशभर गिरवला पाहिजे, असं काय काय बोलत होता. त्याचे विचार ऐकत लखनऊच्या विमानतळावर पोचलो.

No comments:

Post a Comment