चारुलता हा सत्यजित रायचा सिनेमा मी फक्त एकदाच पाह्यला होता. त्यावेळी रिळं लावताना काही तरी गडबड झाली होती. अर्थात तरीही त्याची मजा कमी झाली नव्हती. त्यानंतर चारूलता बघायचा राहून गेला. त्यातलं एक गाणं... ओ बिदेशिनी... अंधुकसं आठवत होतं आणि चारुलता बागेत झोपाळ्यावर बसून अमोलशी बोलत असते तो शॉट मनात ठसला होता. रविंद्रनाथांच्या नष्टनीड या कथेवर हा चित्रपट बेतलेला आहे. ही कथा कित्येक वर्षांपूर्वी म्हणजे शाळेत असताना वाचली होती. पण नीट आठवत होती. मध्यंतरी पुण्याहून मुंबईला येताना सतीश तांबेकडे गेलो होतो. त्याच्याकडे सत्यजित रायच्या चित्रपटांच्या डिव्हिडी होत्या. कोपरखैरणेहून लोअर परेलला ऑफिसात जाईपर्यंत तास-दीड तास लागणार. तेवढ्या वेळात चारुलता पाहता येईल असं मनात आलं म्हणून त्या घेतल्या.
मोटारीत बसल्यावर मी चारुलताची डिव्हीडी लावली. ऑफिसला जाईपर्यंत चित्रपट बघत होतो. मोटारीत गाणी ऐकायला मजा येते. खिडकीच्या काचा बंद केल्या एसी सुरु केला आणि म्युझिक लावलं की खिडक्यांमधून गुंडाळल्या जाणा-या चित्रांना अर्थ प्राप्त होतो. चित्रपटच सुरु होतो. मोटारीत मागच्या सीटवर बसून वीतभर पडद्यावर डोळे एकाग्र करायला विशेष श्रम घ्यायला लागतात. मोटारीच्या वेगाने चित्रपट पळावा असं वाटतं. मोटारीतल्या किंवा बसमधल्या पडद्यावर एक्शन पट पाह्यला मजा येते. कारण दृष्यांचे बारकावे टिपण्याची गरज नसते. अर्थातच चारुलता पाहताना मजा आली नाही. हिरमोड झाला.
दोन-तीन दिवसांनी कामानिमित्त भोपाळला जायचं होतं. सकाळी सहा वाजताचं विमान पकडायचं म्हणजे पाच वाजता विमानतळावर पोचायचं. भल्या पहाटे उठायचं. विमान इंदूरमार्गे भोपाळला जाणार होतं. इंदूर येईपर्यंत डुलक्या घेत होतो. इंदूरला विमान चाळीस मिनिटं थांबतं. बाहेर तर जाता येत नाही. म्हणून लॅपटॉप काढला आणि चारुलताची डिव्हीडी लावली. भोपाळ येईपर्यंत तीच पहात बसलो. सिनेमा लॅपटॉपवर पाह्यला मजा येते. मागेपुढे करत प्रत्येक क्षणाचा दृकश्राव्य अनुभव घेता येतो. चित्रपट आणि आपण यांच्यामध्ये कोणताच अडथळा येत नाही. लॅपटॉपवर कानात इअरफोन घालून चित्रपट बघणं हे वाचनासारखं आहे. तुम्ही अगदी एकटे होता.
नष्टनीड ही रविंद्रनाथांची कथा. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ही कथा घडते. भूपती हा जमीनदारपुत्र. कोलकात्यात त्याचा वाडा असतो. त्याला खाण्यापिण्याची ददात नसते. त्याने स्वतःला एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या कामात गुंतवून घेतलेलं असतं. वाड्यातच त्याने प्रेस टाकलेला असतो. भारताचं आणि इंग्लडचं राजकारण, लोकशाही, कायदाचं राज्य या विषयांमध्येच तो पूर्ण बुडालेला असतो. इंग्लडच्या निवडणुकांमध्ये हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष यांच्यापैकी कोणता पक्ष सत्तेवर आला तर भारताला हितकारक ठरेल यावर तो आणि त्याचे मित्र चर्चा करायचे. पैजा लावायचे. त्याची पत्नी चारुलता. भूपतीला तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. त्याबद्दल तो अनेकदा शरमिंदाही व्हायचा. तिला बंगाली साहित्यात गोडी असते. भूपतीचा चुलत का मावसभाऊ—अमोल, कोलकत्याला येतो. भूपतीकडेच राहतो. त्याला बंगाली साहित्यात रुची असते. गतीही असते. भूपती त्याला गळ घालतो--चारुलताला बंगाली साहित्यात रुची आहे, पण मी तिला मार्गदर्शन करू शकत नाही, तू ते काम कर. अमोल आणि चारुलताची गट्टी जमते. चारुलताचं भूपतीवर प्रेम असतं, निष्ठा असते आणि अमोलशी असलेले संबंध कमालीचे उत्कट असतात. अमोलला मात्र त्याची कल्पना नसते.
चारुलताचा भाऊ उनाड असतो. भूपतीला वाटतं त्याच्यावर कोणी कसली जबाबदारी टाकलेली नाही. म्हणून तो असा आहे. भूपती त्याला बोलावतो आणि वर्तमानपत्राचा मॅनेजर बनवतो. हा मॅनेजर प्रेसच्या नावावर कर्ज काढून खिशात टाकतो आणि पोबारा करतो. भूपतीला हे समजतं तेव्हा तो खचतो. मेव्हण्याने आपला विश्वासघात केला याच अतीव दुःख त्याला होतं. अमोलही मद्रासला मित्राकडे जातो आणि चारुलताला धक्का बसतो. अमोलमुळेच ती लिखाण करायला लागते. विमनस्क झालेला भूपती घरी येतो तेव्हा त्याला अमोलच्या नावाने आकांत करणारी चारुलता दिसते. तो मोडून पडतो.
ही गोष्ट रविंद्रनाथांच्या जीवनातली आहे. सुनील बंदोपाध्यायची पहिली जाग ही कादंबरी (म्हणजे तिचा अनुवाद) गेल्या वर्षीच मी वाचली. तिच्यामध्ये बंगालच्या प्रबोधन युगाचं चित्रण आहे. त्यामध्ये रविंद्रनाथ आणि त्यांच्या वहिनीचे—बोउठनचे संबंध किती उत्कट होते याचं चित्रण आहे. रविंद्रनाथांचे बंधू जमीनदारीचा व्याप बघायचे, नाटकं लिहायचे, प्रवासी वाहतुकीसाठी त्यांनी एक बोटही बांधून घेतली होती आणि फिरंगी बोटवाल्यांशी स्पर्धा सुरु केली होती. ते मोठे उद्यमशील होते. रविंद्रनाथ, त्यांचे बंधू आणि बंधूंची पत्नी हे गंगेवर नौकाविहार करत असत, रविंद्रनाथ गाणी म्हणत. बोउठनची रविंद्रनाथांबरोबर गट्टी होती. रविंद्रनाथांचं लग्न झाल्यावर त्यांच्या आणि बोउठनच्या गाठीभेटी कमी होतात. त्यातच रविंद्रनाथ साहित्यिक वर्तुळात ओढले जातात. पती अनेक व्यापात आणि दीरही दुरावलेला. बोउठनचा एकटेपणा आणि तगमग वाढते. एकदा बोट कुठेतरी अडकून पडते आणि रविंद्रनाथांचे बंधू बोउठनला दिलेला शब्द पाळू शकत नाहीत. ती कमालीची दुखावली जाते आणि आत्महत्या करते. तिच्यात आणि आपल्यात किती अंतर होतं याचा साक्षात्कार रविंद्रनाथांच्या बंधूंना तिच्या मृत्युनंतर होतो. ते कमालीचे दुःखी होतात,
असा तपशील कादंबरीत आहे.
चारुलता या चित्रपटाची नायिका माधवी मुखर्जी. तिच्या अभिनयाला दाद द्यावी तेवढी थोडी. त्यानंतर ती रायच्या कोणत्या चित्रपटात चमकली की नाही ठाऊक नाही. सत्यजित रायचे तिच्याबरोबरही नाजूक संबंध होते. बायकोने घटस्फोटाची धमकी दिली तेव्हा सत्यजित रायने त्या संबंधांपासून काडीमोड घेतला सत्यजित रायच्या पत्नीने सांगितलं. “मी घटस्फोट मागितला तेव्हा सत्यजित रायच्या डोळ्यात अश्रू आले. तो माझ्या पायावर कोसळला आणि त्याने क्षमा मागितली,” असं रायच्या पत्नीने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. राय हयात असताना वा त्याचं निधन झाल्यानंतरही माधवी मुखर्जीने या संबंधांबाबत कोणतंही सनसनाटी विधान केलं नाही. इंग्लडच्या युवराजाची पत्नी लेडी डायना हिची काही प्रेम प्रकरणं तिच्या मृत्युनंतर प्रकाशात आली. एका प्रियकराने तर डायनाने त्याला लिहिलेल्या पत्रांचा लिलावच केला. तीच गत मायकेल जॅक्सनच्या मृत्युनंतर झाली. त्याच्याही चारित्र्याचे धिंडवडे त्याच्या मित्रानेच काढले. जॅक्सनची मुलं वस्तुतः माझीच आहेत, हवं तर डीएनए टेस्ट करा असं त्याने वर्तमानपत्रांना सांगितलं. भारतीय संस्कृती या संबंधात खूपच प्रगल्भ आहे असं दिसतं.
थिएटरमध्ये पाह्यलेला चित्रपट मोटारीत बघताना कंटाळा आला तर लॅपटॉपवर बघताना त्या चित्रपटातल्या आणि चित्रपटाबाहेरच्या अनेक जागा नव्याने कळल्या. विमानाची चाकं धावपट्टीवर झेपावली तेव्हा मी लॅपटॉप बंद केला.
No comments:
Post a Comment